आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Capacity In Sharad Pawar To Become Chairman Of BCCI

अध्यक्षपदाची आशा अनेकांना; मात्र क्षमता शरद पवार यांच्यात !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगमोहन दालमिया यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेली बीसीसीआय अध्यक्षपदाची खुर्ची पटकावण्यासाठी अनेकांमध्ये चढाओढ लागली असली, तरी त्या पदासाठीची योग्यता व अनुभव असलेली एकच व्यक्ती सध्या सर्वांच्या नजरेसमोर आहे; ती व्यक्ती म्हणजे शरद पवार. शरद पवार यांच्याव्यतिरिक्त त्या खुर्चीत बसण्याची क्षमता एन. श्रीनिवासन यांच्यात आहे. अनुराग ठाकूर यांनी कितीही उड्या मारल्या, तरीही त्यांची झेप व पोच बीसीसीआय अध्यक्षांच्या क्षमतेची नाही, हे सध्या त्यांचा सचिवपदाचा कारभार पाहिल्यानंतर अनेक सदस्यांना उमगले आहे.
अनुराग ठाकूर यांनी विशेष सर्वसाधारण सभेची सूचना देईपर्यंत अनेक गोष्टी स्पष्ट होऊ लागतील. सर्वोच्च न्यायालयाने एन. श्रीनिवासन यांना या बैठकीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली तर निश्चितच ते आपली ‘हॅट’ निवडणूक रिंगणात टाकतील, यात शंका नाही. कारण पूर्व विभागातच श्रीनिवासन यांचे अनेक छुपे समर्थक आहेत.
मात्र, बीसीसीआयमधील सध्याच्या घोळ, श्रीनिवासन प्रकरण, आयपीएल भ्रष्टाचार आणि भावी आव्हाने यांना सामोरे जाण्याची क्षमता, अनुभव आणि पोच असणारी दुसरी एकमेव व्यक्ती ही शरद पवार आहे.
दालमिया यांच्या निधनामुळे पवार यांना बीसीसीआयचे भरकटणारे जहाज सावरण्यात रस आहे. अरुण जेटली यांचे मन वळवण्यात अमित शहा यशस्वी ठरले, तर पवारांचा मार्ग मोकळा होईल. त्याच वेळी न्यायालयाकडून श्रीनिवासन यांनी हिरवा कंदील मिळाल्यास जेटली यांनाही श्रीनिवासन यांना रोखण्यासाठी पवारांच्या बाजूने कदाचित मत टाकावे लागेल. माजी अध्यक्षांपैकी शशांक मनोहर सध्या अध्यक्षपद भूषवण्यास राजी नाहीत.