आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटपेक्षा देश महत्त्वाचा; पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच!, चेतन शर्मा यांचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - माझ्यासाठी क्रिकेटपेक्षा देश महत्त्वाचा आहे. क्रिकेट चालूच राहील. देश हा अभिमानाचा, सन्मानाचा विषय आहे. देशाबाबत तडजोड शक्य नाही. अापल्या देशाचा अभिमान असलाच पाहिजे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत सीमेवर तणाव सुरू आहे. आपल्या देशातील तमाम लोकांना पाकसोबत क्रिकेट नको असेल तर ते मुळीच होऊ नये, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी व्यक्त केले.

औरंगाबादेत एका क्रिकेट अकादमीच्या उद््घाटनासाठी चेतन शर्मा आले असता त्यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना हे मत व्यक्त केले.

मियाँदादचा तो षटकार अजून आठवतो का, असे विचारले असता, चेतन शर्माने म्हटले, “मियाँदादने मारलेला १९८६ मधील तो षटकार हा खेळाचा एक भाग होता. भारत-पाक क्रिकेट हे फक्त खेळ राहत नाही. तमाम देशासाठी तो भावनिक विषय असतो. मला तो क्षण विसरायचा असला तरीही लोक मला ते विसरू देत नाहीत,’ असे चेतन शर्मा यांनी म्हटले. सध्या क्रिकेटचे व्यावसायिकीकरण झाले आहे, त्यामुळे खेळाडूला भरपूर पैसा, प्रसिद्धी मिळते. खेळाडूचे भविष्य सुरक्षित होते. देशांतर्गत क्रिकेट खूप महत्त्वाचे असून एका मोठ्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले जाते. यानंतर खेळाडूसाठी संधी आपणहून चालून येते,असेही त्यांनी नमूद केले.
धोनीचा मान राखावा
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेटसाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्याने जवळपास सर्व ट्रॉफी भारताला मिळवून दिल्या आहेत. त्याचा योग्य मान राखला जायला हवा. एक ना एक दिवस प्रत्येकाला क्रिकेट सोडावेच लागणार आहे. सध्या धोनीच्या नेतृत्वाखाली भारत चांगली कामगिरी करतो, सामने जिंकत आहे. त्याचे नेतृत्व काढण्याचा प्रश्न येत नाही. विराट कोहलीदेखील चांगला आहे. भविष्याचा तोच नेता आहे. दुसरीकडे कसोटी संघात युवा खेळाडूंचा भरणा असल्याने पुनरागमन करणाऱ्या गौतम गंभीरवर निश्चित दबाव असेल. असे असले तरीही वयाचा व खेळाचा संबंध नसतो. हार्दिक पंड्या चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येऊ शकतो. कपिलदेवने त्याला कॅप दिली आणि त्याची स्तुती केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

इंग्लंडविरुद्ध मालिका कठीण
आगामी इंग्लंडविरुद्धची मालिका संघर्षपूर्ण होईल, मात्र भारत जिंकेल. इंग्लंड सध्या बांगलादेशविरुद्ध खेळत असल्याने त्यांना फिरकी खेळपट्टीचा अनुभव मिळत आहे. बांगलादेशवरुन थेट भारतात मालिकेसाठी येत असल्याने त्याचा चांगला अभ्यास झालेला असेल. इंग्लंडची टीम मजबूत असल्याने भारताला चांगले आव्हान मिळेल, असेही ते म्हणाले.

लोढा समिती योग्यच
सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटच्या हिताचा विचार करूनच लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचा आदेश दिला आहे. मला लोढा समितीच्या शिफारशी चुकीच्या वाटत नाहीत. कामात पारदर्शकता असणे, एक व्यक्ती अधिक दिवस पदावर राहू नये, खेळाडूंना संधी देणे अशा चांगल्या गोष्टी शिफारशींत आहेत, असे त्यांनी म्हटले. बीसीसीआयने मला गेल्या २० वर्षांत कोणत्याही प्रकारच्या कामाची जबाबदारी दिलेली नाही. एक खेळाडू १५-२० वर्षे मैदानावर आयुष्य घालवतो. एक उत्तम खेळाडू उत्तम प्रशासक होईलच असे नाही. ही दोन्ही कामे भिन्न आहेत, असेही त्यांनी म्हटले.
बातम्या आणखी आहेत...