आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी सरस की कोहली.. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर होणार नेतृत्वावर शिक्कामोर्तब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या दोघांच्या खांद्यावर सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची सामुदायिक जबाबदारी आहे. महेंद्रसिंग धोनीने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्याने कोहलीकडे कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. तर धोनी अजूनही वन डे आणि टी 20 संघाचा कर्णधार आहे.दोघांच्या शैलीमध्ये मग ती फलंदाजीची असो किंवा नेतृत्त्वाची मोठा फरक आहे. त्यामुळेच या दोघांबाबत नेहमीच तुलना आणि चर्चा होत राहते. दक्षिण आफ्रिकेच्या 72 दिवसांच्या भारत दौऱ्यात भारत 3 टी 20, पाच वन डे आणि चार कसोटी असे भरपूर सामने खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत या दोघांच्या नेतृत्वाची थेट तुलना होणार हे नक्की.

धोनीने निवृत्तीची घोषणा केली तेव्हापासून किंबहुना त्याच्या काही महिन्यांआधीपासूनच कोहलीकडे नवा कर्णधार म्हणून पाहिले जात असल्याच्या चर्चा होता. धोनीने निवृत्ती जाहीर करत त्यासाठी मार्ग करून दिला. पण धोनीने केवळ कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली. वन डे आणि टी 20 वर लक्ष केंद्रीत करायचे असल्याचे धोनीने सांगितले. एवढेच काय पण विश्वचषकातील भारताचे आव्हान संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत जेव्हा त्याला निवृत्ती आणि कर्णधारपदाचा राजीनामा देण्याबाबत प्रश्न विचारले तेव्हा त्याने तसे काहीही करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. एका पराभवाने कर्णधारावर प्रश्नचिन्हं उपस्थित केले जाऊ शकत नाही, असे धोनीने म्हणाला. तसेच निवृत्तीचे सांगायचे तर कदाचित मी पुढचा वर्ल्डकपही खेळू शकतो असे सूतोवाच त्याने केले. त्यामुळे वन डे आणि टी 20 चे कर्णधारपद धोनी एवढ्या सहजरित्या सोडणार नसल्याचे स्पष्ट होते. किमान पुढल्या वर्षी होणाऱ्या टी 20 विश्वचषकापर्यंत तरी तशा काहीही शक्यता नाहीत.

विश्वचषकानंतर भारतीय संघाने बांगलादेश आणि झिम्बाब्वेच्या विरोधात मालिका खेळल्या पण तसे पाहता ह दोन्ही संघ कमकुवत होते. तसेच या मालिकांमध्ये मोठ्या खेळाडुंना विश्रांतीही देण्यात आली होती. त्यामुळे विश्वचषकानंतर दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या मालिकेतच भारतीय संघाला शक्ती आजमावता येणार आहे. त्यात प्रथमच एकाच देशाच्या विरोधात टी 20 सह वन डे आणि कसोटी सामने होत असल्याने धोनी आणि कोहली यांच्या नेतृत्वाची झलक पाहायला मिळणार आहे. एकाच संघाच्या विरोधात वेगवेगळी शैली असलेले हे कर्णधार कशा प्रकारे संघाची रणनीती आखतात ही मोठी उत्सुकता सध्या आहे. वन डे, टी 20 मध्ये कॅप्टन कूल माही आणि कसोटीमध्ये आक्रमक कोहली अशी एक अनोखी जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल.

प्रत्येक कर्णधाराला त्याच्यानंतर येणाऱ्या वारसदारासाठी जागा रिकामी करून द्यावीच लागते. त्याचप्रमाणे धोनीनंतर कोहलीने भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व हाती घेतले आहे. दोघांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या फरक असले तरी, दोघांचाही उद्देश देशाला क्रिकेटच्या शिखरावर पोहोचवणे हेच आहे. धोनीनंतर कोहली त्याची ही पंरपरा सुरू ठेवेल हीच आशा सर्व क्रिकेट चाहत्यांना आहे.

धोनी भारतीय संघाचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. अगदी कपिल, गांगुली आणि अझहरसारख्या माजी कर्णधारांनीही त्याला तसी पावती दिली आहे. त्यामुळे कोहलीसमोर तसे तगडे आव्हान आहे. कोहलीला कर्णधार पदाचा तो दर्जा टिकवण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. कोहली आणि धोनीमध्ये बराच वेगळेपणा आहे. या दोघांच्या नेतृत्वाची झलक आपल्याला आगामी दोन महिन्यांत पाहायला मिळणार आहे. त्याआधी या दोघांच्या
गुणवैशिष्यांचा तुलनात्मक आढावा पाहुयात.
पुढील स्लाइड्सवर वाचा, धोनी आणि कोहली यांच्यातील प्रमुख मुद्यांवरील तुलना