लंडन/नवी दिल्ली- इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषक २०१७ मध्ये शनिवारी भारतीय महिला संघाने शानदार प्रदर्शन करताना न्यूझीलंडविरुद्ध करा किंवा मराच्या सामन्यात विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिला संघाने सेमीफायनल प्रवेश निश्चित केला. या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने शतक ठोकले. हे मितालीच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये सहावे शतक ठरले. आता भारतीय महिला संघासमोर गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे सेमीफायनलमध्ये आव्हान असेल. या विजयानंतर क्रिकेट जगतातील दिग्गजांनी भारतीय महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव केला. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, संजय मांजरेकर, मोहंमद कैफ यांनी सोशल मीडिया साइट िट्वटरवर खेळाडूंचे अभिनंदन केले.
टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कोच वीरेंद्र सेहवागने म्हटले की, विजयासाठी खूप खूप अभिनंदन. वेदा कृष्णमूर्ती आणि राजेश्वरीने शानदार खेळ केला, असे त्याने म्हटले. माजी खेळाडू समालोचक संजय मांजरेकरने म्हटले की, ‘भारतीय महिला संघाने खूपच शानदार फलंदाजी केली. अप्रतिम.’ भारताचा माजी सलामीवीर आणि डावखुरा फलंदाज गौतम गंभीरने म्हटले की, ‘अभिनंदन टीम इंडिया वुमेन्स. शानदार खेळलात. आता सेमीफायनलसाठी शुभेच्छा.’
मिताली राजचे उत्तर
मितालीने िट्वट करून उत्तर दिले. ती म्हणाली, ‘संघाकडून शानदार प्रदर्शन आणि जोरदार उत्तर. २ सामने गमावल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीच्या सामन्यासाठी जागा पक्की केली.’ यानंतर क्रीडामंत्री विजय गोयल यांनी िट्वट करून मितालीचे अभिनंदन केले. मितालीने दुपारी पुन्हा एक िट्वट केले. ‘जिद्द आणि टीमवर्कमुळे सर्वसाधारण महिलांचा संघ आता अजेय बनला आहे. हा संघ विजेता बनू शकतो. आता सेमीफायनलवर लक्ष,’ असे तिने म्हटले.