आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्यापेक्षाही काेहली यशस्वी; टीम इंडिया इतिहास रचेल, महेंद्रसिंग धोनीला विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारपासून वनडे मालिका, पुण्याच्या मैदानावर सराव करताना महेंद्रसिंग धाेनी. - Divya Marathi
रविवारपासून वनडे मालिका, पुण्याच्या मैदानावर सराव करताना महेंद्रसिंग धाेनी.
मुंबई - सध्याचा भारतीय संघ तरुण आहे. एवढ्या अल्पावधीत अनेक कसोटी, एकदिवसीय सामने खेळला आहे. प्रत्येक वेळी कठीण परिस्थितीतून तावून-सुलाखून बाहेर विजयी होऊन परतला आहे. तिन्ही फाॅर्मेटमध्ये विराट हा माझ्यापेक्षाही यशस्वी अाहे. त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखाली सध्या खेळत असलेला क्रिकेट संघ भारतीय क्रिकेटमध्ये नवा, देदीप्यमान अध्याय लिहील असे भाकीत शुक्रवारी, मावळता कप्तान महेंद्रसिंग धोनी याने पुणे येथे पत्रकारांशी बोलताना केले. येत्या रविवारपासून भारत अाणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात हाेणार अाहे.  
‘या संघातील बहुतांश खेळाडू एकाच वयोगटातील आहेत. म्हणजे ते आणखी १० ते १२ वर्षे एकत्र खेळतील. आपल्याकडे सध्या उत्तम वेगवान, मध्यमगती गोलंदाजांची मोठी फळी सज्ज आहे, जी कोणत्याही वातावरणात उत्तम कामगिरी करू शकते.  फलंदाजही उत्तम कामगिरी करणारे आहेत, जे विराटला उत्तम संधी देतात,’असे धाेनी म्हणाला.  
 दहा वर्षांच्या कप्तानपदाच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करतानाच धोनीने किमान भारतात तरी दोन कप्तानांची  कल्पना रुजणारी नाही, असे सांगितले.  संघासाठी सर्वच प्रकारात एकच कप्तान असणे संयुक्तिक आहे. म्हणूनच मी एका वर्षाच्या कसोटी नेतृत्वाचा अनुभव असलेल्या विराटसाठी नेतृत्व सोडले. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी खेळून निवृत्त होण्यापेक्षा त्या स्पर्धेचा अनुभव विराटला व्हावा, अशी इच्छा होती. 
 
पुढचा विचार करून कृती
ऑस्ट्रेलियात मालिका पूर्ण होण्याआधी नेतृत्व व कसोटी क्रिकेट सोडले. कारण विराटला नेतृत्वाची संधी देणे हा हेतू होताच, शिवाय यष्टिरक्षक वृद्धिमान साहाला आत्मविश्वास देणेही महत्त्वाचे होते. नेहमी पुढचा विचार करून कृती करायला हवी.
 
काेहलीवर काैतुकाचा वर्षाव
-कोणताही यष्टिरक्षक हा अधिकृत उपकप्तान असो वा नसो, तो संघाचा उपकप्तानच असतो. कारण त्यालाच यष्टीपाठून अधिक गोष्टी पाहता येतात, अवलोकन करता येते. त्यामुळे तोच कप्तानाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो.  
- मला विराटला सल्ला देण्याच्या नेमक्या वेळा अचूक जपायला लागतील. मी दिलेले सर्वच सल्ले विराटने ऐकले पाहिजेत या मताचा मी नाही. तसेच मी सांगितलेली प्रत्येक गोष्ट करायलाच हवी असे त्यानेही समजू नये. मात्र विराटला हवा तेव्हा सल्ला मी देईन.  
- २००४ मध्ये पदार्पण केले. २००७ मध्ये कप्तान झालो. तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास समाधानकारक व सुखकर तसाच कधी-कधी कष्टप्रद होता. मात्र मी पूर्णपणे समाधानी आहे.  
-  गरजेनुसार मी फलंदाजी केली. अधिक काळ खाली खेळलो. कारण वनडेत शेवटी वेगात धावा काढणे किंवा परिस्थितीनुरूप खेळ करणे महत्त्वाचे असते. नवोदित खेळाडूवर त्या परिस्थितीत दडपण येते. म्हणून मी तरुण खेळाडूंना नेहमी वर खेळण्याची संधी देत होतो. मी खाली खेळल्यामुळे माझ्या धावा कमी झाल्या असतीलही; पण मिळालेले विजय महत्त्वाचे आहेत.  
- सीनियर्ससोबत खेळलो, त्यानंतर नवोदितांना घेऊन संघाच्या जडणघडणीच्या कालखंडातही खेळलो. त्या कालावधीत कोणतीही गोष्ट झाली नाही याची खंत वाटली नाही.  
- कप्तान असताना प्रत्येक खेळाडूला हाताळणे कठीण काम होते. प्रत्येकाला हाताळायला मार्ग व प्रकारही वेगळा असतो. काही जणांना बोललेले कळते. काहींना डोळे वटारले की काम होते. काहींना, त्यापेक्षा जालीम डोस द्यावा लागतो. मात्र सरतेशेवटी प्रत्येक खेळाडूला आत्मविश्वास देणे हे महत्त्वाचे असते.  
- आमच्या करारामध्ये कप्तानाने  सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलले पाहिजे, अशी अट आहे. ती मूर्खपणाची आहे. खरे तर कप्तानाने कसोटीच्या आदल्या दिवशी व कसोटी संपल्यानंतर पत्रकारांशी बोलणे योग्य आहे.