आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीच्या हृदयाचे ठोके वाढले; खेळताना दबाव आल्याची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ९० कसोटी, २६५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि ५० ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या छातीत बुधवारी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना धडधडत होतं. संघव्यवस्थापनातील गुरुस्थानी मानणार्‍या आपल्या ज्येष्ठांशी बोलताना धोनीने चक्क याची कबुली दिली. तो म्हणत होता, ‘चौथ्या क्रमांकावर पहिल्यांदाच खेळत नव्हतो, परंतु या वेळी मीडिया, भारतीय क्रिकेटप्रेमी आणि प्रशासन यांना मी अपयशी ठरलो तर काय वाटेल याचे दडपण होते. चौथा क्रमांक मी हट्टाने मागून घेतला होता.’

धोनीने एकदा स्वत:शी ठरवले की तो ती गोष्ट पूर्णत्वास नेण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करतो. त्याने स्वत:च्या फलंदाजीवर आता पुन्हा लक्ष केंद्रित केले असून २०१९ पर्यंत एकदिवसीय क्रिकेट खेळत राहण्याचे लक्ष्य स्वत:पुढे ठेवले आहे.

त्यासाठी तो आपल्या गुरूंशी आणि ज्येष्ठ क्रिकेटपटूंशी नव्याने चर्चा करीत आहे. बांगलादेशविरुद्ध तिसर्‍या सामन्याआधी तो रवी शास्त्रींशी चर्चा करत होता. शास्त्रींनी त्या वेळी त्याला त्याचा एक कच्चा दुवा दाखवून दिला. धोनी फलंदाजी करताना चेंडू पॉइंटला किंवा स्क्वेअरलेगला ‘पुश’ करून एकेरी धाव घेण्यात धन्यता मानतो. शास्त्री म्हणत होते, तुझ्या मनगटात एवढी ताकद आहे की फिरकी गोलंदाजांना तू सरळ खेळून दूरवर मोठे फटके मारून सळो की पळो करू शकतोस. तू एकेरी धावा काढण्याऐवजी समोर सरळ फटके खेळ. शास्त्री यांचा सल्ला धोनीने तत्काळ अमलात आणला व तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशच्या फिरकी गोलंदाजांना समोर फटकावले. सामन्यानंतर त्याने आपल्या मार्गदर्शकांकडे आपल्याला जुना आत्मविश्वास त्यामुळे मिळाला असल्याची कबुली दिली. धोनीने २०१९ पर्यंत खेळत राहायचे असल्यास त्याला वनडे संघाचे कप्तान करू नये, असे अनेक ज्येष्ठ क्रिकेटपटूंचे मत आहे.

अचूकतेवरही भर द्यावा : धाेनी
वेगापेक्षाही गोलंदाजांनी अचूकतेवरही भर दिला पाहिजे, असेही धोनीचे मत आहे. अलीकडे उमेश यादव व वरुण अ‍ॅरोन यांच्या वेगाने कौतुक केले जात होते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना धोनीने मत व्यक्त केले की, नव्या पिढीतील संदीप शर्मा, अनुरित सिंग, अक्षर पटेल यांच्यासारख्या कमी वेगात चेंडू टाकणार्‍या, परंतु टप्पा अचूक असणार्‍या गोलंदाजांना ‘डेथ ओव्हर्स’मध्ये गोलंदाजी करायला लावणे मला आवडेल.