आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dilip Vengsarkar Comment On Lodha Committees Report For BCCI

न्या.लोढा समितीच्या शिफारशी महाराष्ट्र क्रिकेटच्या मुळावर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बीसीसीआय कारभारात बदल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या समितीने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी झालीच तर महाराष्ट्र क्रिकेटचे मोठे नुकसान होणार आहे.

भारतासाठी ११६ कसोटी सामने खेळलेले आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्षपद भूषविणारे भारताचे माजी कप्तान दिलीप वेंगसरकर यांनी एक राज्य एक संघटना, एक ‘व्होट’ आणि एकच कारभार या शिफारशीवर सडकून टीका केली आहे. सध्या बीसीसीआयवर असलेले आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांनीही प्रत्यक्षात ही संकल्पना अवास्तव असल्याचे म्हटले आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनचा व्याप, कार्य आणि व्याप्ती एवढी वाढली आहे की मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ या तीन संघटनांचे एकीकरण म्हणजे जगातील अन्य कोणत्याही देशांच्या क्रिकेट संघटनेपेक्षा मोठी व्याप्ती असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सूचना हास्यास्पद : शिर्के
अजय शिर्के बीसीसीआय किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी नव्हे तर सर्वसामान्य क्रिकेटरसिक या नात्याने बोलताना म्हणाले, ‘अहवालातील ७८ क्रमांकाचे पान त्यावरील सूचना पाहिल्यास हसावे की रडावे तेच कळत नाही. क्रिकेट मैदानावर मोकळ्या परिसरात हॉकीचे अॅस्ट्रो टर्फ टाकावे, टेनिस कोर्ट करावे, त्यायोगे निधी वाढविता येईल, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.’

शिर्के पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्र क्रिकेट संघटना ८० वर्षांपूर्वीपासून राज्याच्या विविध भागांच्या क्रिकेट गुणवत्तेला आकार देण्याचे कार्य करीत आहे, रणजी ट्रॉफीसाठी खेळाडू तयार करीत आहे. लातूर, नाशिक, धुळे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी हा विभाग वाटून घेण्यात आला आहे. तेथे क्रिकेटविषयक साऱ्या सुविधा, सोयी आम्ही पुरवितो. गरजू खेळाडूंना मोफत कोचिंगही देतो.'

...तर पूर्व, उत्तर विभागाची मते होतील
मुंबई आणि महराष्ट्राच्या क्रिकेटची ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्ट्रातून सध्या मुंबई, महाराष्ट्र, विदर्भ असे तीन संघ (३ मतसुद्धा) खेळतात. लोढा समितीच्या अहवालानुसार सर्व राज्यातून केवळ एकच संघ खेळवला तर क्रिकेट खेळणाऱ्या उत्तर, पूर्व विभागातील राज्यांची मते वाढतील आणि शेकडो गुणवंत खेळाडू देणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे नुकसान होईल.
दिलीप वेंगसरकर यांनीही या अहवालातील काही गोष्टींवर टीका केली आहे. ते म्हणाले, क्रिकेटपटूंची संघटना स्थापन करण्यासाठी कुंबळे, मोहिंदर, डायना एडुलजी यांना निवडण्याचा अधिकार समितीला कुणी दिला ? मैदानात राबणारे खेळाडू कोण आहेत, क्रिकेटसाठी खस्ता कोण खातात, हे समितीला ठाऊक आहे का? जे खेळाडू समोर दिसतात तेच कार्य करतात, असा ग्रह करून घेणे चुकीचे आहे. भारतात अनेक क्रिकेट संघटनांमध्ये अनेक खेळाडू विनामोबदला काम करीत आहेत. क्रिकेटच्या विकासाला त्यांचा हातभार अधिक लागत आहे. राज्याची एक संघटना असावी या सूचनेचाही वेंगसरकर यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, मुंबई भारतीय क्रिकेटची ‘नर्सरी’ आहे. देशाच्या क्रिकेटचे मुख्यालय मुंबईत आहे. क्रिकेटविषयक अनेक महत्त्वाच्या घडामोडी मुंबईत घडतात. असे असताना एक राज्य एक संघटना हे धोरण राबविणे हास्यास्पद आहे. जेथे क्रिकेटच नव्हते, त्यांच्यासाठी ही सूचना ठीक आहे, परंतु मुंबई, महाराष्ट्र विदर्भ यांचे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे, परंपरा आहे, इतिहास आहे. ग्रामीण भागांतून अनेक गुणवंत खेळाडू गवसले आहेत. महाराष्ट्रातून एकच संघटना झाल्यास या सर्वांवर अन्याय होईल, असे विदर्भातील क्रिकेटपटूंना वाटते. मुंबई, महाराष्ट्र यांच्यासोबत एकत्र येऊन स्पर्धा करून पुढे येणे कठीण आहे, असे या सर्वांचे ठाम मत आहे.