आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडचा ३-२ ने मालिका विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेस्टर ली स्ट्रीट - यष्टिरक्षक फलंदाज जॉन बेरेस्ट्रोच्या नाबाद ८३ धावांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध पाच वनडे सामन्यांची मालिका ३-२ ने जिंकली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २८३ धावा काढल्या. यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडसमोर डकवर्थ लुईस नियमाने विजयासाठी २६ षटकांत १९२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. इंग्लंडने हे लक्ष्य २५ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. जॉन बेरेस्ट्रो विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ६० चेंडूंत ११ चौकारांच्या साहाय्याने नाबाद ८३ धावा काढल्या.

इंग्लंडचा अ‍ॅलेक्स हेल्स अवघ्या एका धावेवर बाद झाला. तिसर्‍या क्रमांकावर आलेला ज्यो रुट ४ धावा काढून, तर चौथ्या क्रमांकावर आलेला कर्णधार इयान मोर्गन भोपळाही फोडू शकला नाही. इंग्लंडची अवस्था ५ बाद ४५ धावा अशी संकटमय झाली. यानंतर बेरेस्ट्रो आणि बिलिंग्स यांनी सहाव्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी करून डाव सावरला. बिलिंग्सने ३० चेंडूंत १ षटकार, ४ चौकारांच्या मदतीने ४१ धावा काढल्या.

गुप्तिल, विल्यमसनची अर्धशतके : तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ९ बाद २८३ धावा काढल्या. त्यांच्याकडून मार्टिन गुप्तिलने ६७, तर केन विल्यमसनने ५०, रॉस टेलरने ४७, ग्रँट एलियटने ३५, तर व्हीलरने नाबाद ३९ धावांचे योगदान दिले.
बातम्या आणखी आहेत...