लीड्स - कर्णधार इयान मोर्गनच्या (९२) धावांच्या झुंजार खेळीच्या बळावर यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला ३ विकेटने नमवले. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ ने बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २९९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने ४८.२ षटकांत ७ बाद ३०४ धावा काढून विजय साजरा केला.
धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून कर्णधार इयान मोर्गनने सर्वाधिक ९२ धावा काढल्या. त्याने ९२ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ८ चौकार मारले. याशिवाय जेम्स टेलर आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी ४१ धावांचे योगदान दिले. सलामीवीर जे. रॉयने ३६ धावा, तर जॉन बेयरस्ट्रोने ३१ धावा काढल्या. अखेरीस मोईन अली (नाबाद २१ धावा, २३ चेंडू, १ चौकार, १ षटकार) आणि डी.जे. विली (नाबाद ११, ९ चेंडू, १ षटकार) यांनी नाबाद २४ धावांची भागीदारी करून विजय खेचून आणला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ४, तर मिशेल मार्शने २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, जॉर्ज बेली (७५) आणि ग्लेन मॅक्सवेल (८५) यांच्या तुफानी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ७ बाद २९९ धावा काढल्या. बेली आणि मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाा ३ बाद ३० धावा अशा संकटातून सावरले. बेलीने ११० चेंडूंत ७५ धावा काढताना ६ चौकार, १ षटकार मारला. तर मॅक्सवेलने ६४ चंेडूंत ८५ धावा कुटल्या. यात त्याने १० चौकार, २ षटकार खेचले.