आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात यजमान न्यूझीलंडचा बांगलादेशवर ६ विकेटने विजय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅपियर- कर्णधार केन विल्यम्सनच्या शानदार अर्धशतकाच्या (नाबाद ७३) बळावर न्यूझीलंडने मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या बांगलादेशला ६ विकेटने हरवले. या विजयासह यजमान न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १४१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने १८ षटकांत ४ बाद १४३ धावा काढून सहज विजय मिळवला. नाबाद ७३ धावांची खेळी करणारा कर्णधार केन विल्यम्सन ‘मॅन ऑफ द मॅच’चा मानकरी ठरला.
  
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. बांगलादेशचा सलामीवीर इमरुल कायेस शून्यावरच बाद झाला. तामिमने १३ चेंडूंत ११ धावा काढल्या. सहाव्या षटकात हेनरीने शब्बीर रहेमानचा फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर झेल घेऊन बांगलादेशचा तिसरा फलंदाज तंबूत परतवला. पुढच्या चेंडूवर फर्ग्युसनने सौम्य सरकाला शून्यावर बाद करून बांगलादेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. या वेळी बांगलादेशचा स्कोअर ४ बाद ३० धावा असा होता. यानंतर मोसदिक हुसेन आणि मोहम्मदुल्लाह यांनी डाव सावरला. मोहम्मदुल्लाहने ४७ चेंडूंचा सामना कररताना ३ षटकार आणि ३ चौकारांसह ५२ धावा काढल्या, तर मोसदिकने १७ चेंडूंत २० धावांचे योगदान दिले. 
 
धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर नील ब्रुम ६ धावा काढून रुबेल हुसेनच्या चेंडूवर शकिब-अल-हसनकरवी झेलबाद झाला. न्यूझीलंडचा संघ ४ बाद ६२ धावा असा संकटात सापडला होता. यानंतर कर्णधार केन विल्म्यसनने संघाला संकटातून बाहेर काढले. त्याला कॉलिन ग्रँडहोमची चांगली साथ मिळाले. विल्यम्सनने नाबाद ७३, तर ग्रँडहोमने नाबाद ४१ धावा काढल्या. विल्यम्सनने ५५ चेंडूंचा सामना करताना २ षटकार, ५ चौकारांच्या मदतीने ७३ धावा जोडल्या, तर ग्रँडहोमने ३३ चेंडूंत ३ षटकार, ३ चौकारांसह नाबाद ४१ धावा काढल्या.
 
संक्षिप्त धावफलक :  बांगलादेश : ८ बाद १४१ धावा. न्यूझीलंड : ४ बाद १४३ धावा. (केन विल्यम्सन ७३*)
 
बातम्या आणखी आहेत...