आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Firt Test Match India Good Started, Shri Lanka All Out In First Day,

अश्विनच्या फिरकीची चमक : टीम इंडियाने श्रीलंकेला १८३ धावांत गुंडाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाले - टीम इंडियाने पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी यजमान श्रीलंकेला दबावात आणले. भारताने आर. अश्विनच्या घातक गोलंदाजीच्या बळावर श्रीलंकेला अवघ्या १८३ धावांत गुंडाळले. यानंतर दिवसअखेर २ बाद १२८ धावा काढल्या. अश्विनने ४६ धावांत ६ गडी बाद करून घातक गोलंदाजी केली. यानंतर सलामीवीर शिखर धवन (नाबाद ५३) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद ४५) यांनी तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य शतकी भागीदारी केली.
भारताचा सलामीवीर लोकेश राहुल (७) आणि रोहित शर्मा (९) हे दोघे लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. तत्पूर्वी, भारताकडून ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने कमालीची गोलंदाजी केली. ४६ धावांत ६ विकेट ही श्रीलंकेच्या भूमीवर कसोटीत कोणत्याही भारतीय गोलंदाजाची आतापर्यंतची सर्वश्रेष्ठ कामगिरी ठरली आहे. यापूर्वी ३१ जुलै २००८ रोजी ऑफस्पिनर हरभजनसिंगने गाले येथेच १०२ धावांत ६ गडी बाद केले होते.

श्रीलंकेची गचाळ सुरुवात : सकाळी लंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर करुणारत्ने (९) आणि कुशल सिल्वा (५) हे दोघे लवकर बाद झाले. सलामीच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच लंकेला तिसरा हादरा बसला. १२ धावांच्या अंतराने लाहिरू थिरिमाने १३ धावा काढून बाद झाला. अश्विनने त्याला टिपले.
संगकाराही टिकला नाही : यजमान श्रीलंकेकडून चौथ्या क्रमांकावर सर्वात अनुभवी कुमार संगकारा खेळण्यास आला. तो कारकीर्दीतील अखेरच्या कसोटी मालिकेत खेळत आहे. संगकारा मैदानावर येताच प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. मात्र, संगकारासुद्धा लवकर बाद झाला. त्याला केवळ ५ धावा काढता आल्या.त्यालाही अश्विनने बाद केले.

०६ विकेट घेतल्या आर. अश्विनने
५३ धावा काढून खेळत आहे शिखर धवन
४५ धावांवर नाबाद आहे कोहली
०२ विकेट अमित मिश्राच्या

धवन-कोहलीची शतकी भागीदारी
टीम इंडिया २ बाद २८ धावा अशी संकटात सापडली असताना सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी १०० धावांची अभेद्य भागीदारी केली. शिखर धवनने १०३ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार मारले, तर कर्णधार कोहलीने ७७ चेंडूंत ७ चौकार ठोकले. धवन आणि कोहली या जोडीने रोहित बाद झाल्यानंतर अधिक घाई न करता खेळपट्टीवर टिकून खेळण्यावर जोर दिला. दोघांनी जोखीम टाळली. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर आणि दुबळ्या चेंडूवर त्यांना हल्ला चढवला. मात्र, विकेट गमावली नाही.

अश्विनने यांना टिपले
अश्विनने थिरिमाने (१३), कुमार संगकारा (५), मॅथ्यूज (६४), मुबारक (०), धम्मिका प्रसाद (०), रंगना हेराथ (२३) यांना आपल्या सापळ्यात अडकवले. अश्विनच्या फिरकीसमोर लंकन गोलंदाजांनी थयथयाट करीत विकेट गमावल्या. याशिवाय अमित मिश्राने २० धावांत चांदिमल (५९) आणि थारिंडू कुशल (०) यांना बाद केले. ईशांत शर्माने ३० धावांत १ तर वरुण अॅरोनने ६८ धावांत १ विकेट घेतली.

मॅथ्यूजने दिली झुंज
यानंतर श्रीलंकेकडून कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने ६४ तर दिनेश चांदिमलने ५९ धावांची खेळी करून डाव सावरला. या दोघांच्या अर्धशतकामुळे श्रीलंकेला १५० धावांचा टप्पा ओलांडता आला. उर्वरित फलंदाज अश्विन आणि अमित मिश्राच्या फिरकीसमोर टिकू शकले नाहीत.

दुसरा नीचांक
श्रीलंकेचा डाव १८३ धावांत आटोपला. भारताविरुद्ध कसोटीत श्रीलंकेचा हा दुसऱ्या क्रमांकाचा नीचांक ठरला आहे. १९९४ मध्ये भारताविरुद्ध श्रीलंकेचा डाव ११९ धावांत आटोपला होता.

धावफलक
श्रीलंका पहिला डाव धावा चेंडू ४ ६
करुणारत्ने झे. रहाने गो. ईशांत ०९ १९ ० ०
सिल्वा झे. धवन गो. अॅरोन ०५ २४ १ ०
थिरिमाने झे. रहाणे गो. अश्विन १३ ३८ २ ०
संगकारा झे. राहुल गो. अश्विन ०५ १२ ० ०
मॅथ्यूज झे. रोहित गो. अश्विन ६४ ९२ ६ १
मुबारक झे. राहुल गो. अश्विन ०० ०७ ० ०
चांदिमल झे. रहाणे गो. मिश्रा ५९ ७७ ९ ०
प्रसाद पायचीत गो. अश्विन ०० ०६ ० ०
हेराथ त्रि. गो. अश्विन २३ २४ ४ ०
कुशल झे. रोहित गो. मिश्रा ०० ०१ ० ०
प्रदीप नाबाद ० ०१ ० ०
अवांतर : ५, एकूण : ४९.४ षटकांत सर्वबाद १८३ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१५, २-१५, ३-२७, ४-५४, ५-६०, ६-१३९, ७-१५५, ८-१७९, ९-१७९, १०-१८३. गोलंदाजी : ईशांत शर्मा ११-३-३०-१, वरुण अॅरोन ११-०-६८-१, अश्विन १३.४-२-४६-६, अमित मिश्रा ६-१-२०-२, हरभजनसिंग ८-१-१७-०.

भारत पहिला डाव धावा चेंडू ४ ६
लोकेश राहुल पायचीत गो. प्रसाद ०७ ०७ ० ०
शिखर धवन नाबाद ५३ १०३ ६ ०
राेहित शर्मा पायचीत गो. मॅथ्यूज ०९ २४ १ ०
विराट कोहली नाबाद ४५ ७७ ७ ०
अवांतर : १४, एकूण : ३४ षटकांत २ बाद १२८ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-१४, २-२८. गोलंदाजी : प्रसाद ७-०-२२-१, प्रदीप ८-१-३२-०, मॅथ्यूज ४-१-१२-१, कुशल ८-०-४१-०, रंगना हेराथ ७-१-१५-०.