आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयवर पकड मिळवण्यासाठी दिग्गजांचे प्रयत्न, पवारांसह चारजन दावेदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा दुसऱ्यांदा स्वीकारलेले जगमोहन दालमिया हा एन. श्रीनिवासन यांची मक्तेदारी रोखण्यासाठी आणि शरद पवार यांना पुन्हा अध्यक्ष होऊ न देण्यासाठी स्वीकारलेला एक "तडजोड' पर्याय होता. त्या वेळीदेखील विस्मृतीच्या विकाराने पछाडलेल्या दालमिया यांची वर्णी अध्यक्षपदावर लागल्यानंतर त्यांचा मुलगा आणि सौरव गांगुली यांनी दालमिया यांचा कारभार रिमोट कंट्रोल पद्धतीने हाकण्यास सुरुवात केली. मात्र, गुरुवारी सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याचे पडसाद बीसीसीआयच्या देशातील प्रतिनिधींवर प्रकर्षाने उमटले आहेत.
दालमिया यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती लोढा यांनी आश्चर्य व्यक्त केल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. मात्र, प्रत्यक्षात बीसीसीआयच्या कारभाराशी निगडित असणाऱ्या अनेकांना दालमिया यांची असमर्थता लक्षात आली. दालमिया यांच्या नावाने कारभार प्रत्यक्षात अन्य कुणी हाकत असल्याचेही आतापर्यंत जगजाहीर झाले आहे. त्यामुळे श्रीनिं यांच्याबाबतचा निर्णय न्यायालयाने जाहीर केल्यानंतर राजकारणाला रंग येणार आहे.
जेटलींची भूमिका महत्त्वाची
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बौद्धिक रसद पुरवणारे व अनुभवी अरुण जेटली यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. या खेळामध्ये जेटली हे फार मुरलेले आणि अनुभवी आहेत. क्रिकेट मंडळातील राजकारण आणि कच्चे दुवे त्यांना माहिती आहेत. यामुळे नवा अध्यक्ष ठरवताना अथवा निवडताना त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकेल. याचा लाभ उचलण्याचा प्रयत्न एमसीएचे अध्यक्ष शरद पवारही करतील. त्यामुळे यात आता कोण सरस ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तसेच याबाबत तर्क-वितर्क काढले जात आहेत.

चौघे दावेदार
आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्यासाठी श्रीनिवासन, शरद पवार यांच्यापाठोपाठ आताचे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर आणि राजीव शुक्लाही पॅड बांधून सज्ज होणार, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. हे चौघे प्रमुख दावेदार आहेत.

सद्य:स्थितीतून मार्ग कसा काढणार?
दालमिया यांच्या निधनानंतरच्या १५ दिवसांच्या आत बीसीसीआय सचिव अनुराग ठाकूर यांना १४ दिवसांची मुदत देऊन विशेष सर्वसाधारण सभेची सूचना द्यावी लागेल. या सभेत पूर्व विभागातील प्रतिनिधींना २०१७ पर्यंतचा कार्यकाळ पूर्ण करण्याकरिता अध्यक्षाचे नाव सुचवावे लागेल. हे नाव पूर्व विभागातील सदस्याचेच असणे मात्र आवश्यक नाही. मात्र, तो विद्यमान कार्यकारिणी सदस्य असणे गरजेचे आहे व त्याने किमान दोन वार्षिक सर्वसाधारण सभांना उपस्थिती राखलेली असली पाहिजे.