आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातातोंडाशी आलेला विजयाचा घास गमावला, श्रीलंकेविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गाले कसोटीत यजमान श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा ६३ धावांनी लाजिरवाणा पराभव झाला. विजयासाठी अवघ्या १७६ धावांची गरज असताना कोहली ब्रिगेडने अवघ्या ११२ धावांत गुडघे टेकले. टीम इंडियाने हातातोंडाशी आलेला विजयाचा घास गमावला. टीम इंडियाच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी कर्णधार कोहली आणि खेळाडूंवर जोरदार टीका केली. श्रीलंकेला पहिल्या डावात १८३ धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने ३७५ धावा काढल्या. भारताने पहिल्या डावात तब्बल १९२ धावांची घेऊन विजयाकडे आगेकूच केली. दुसऱ्या डावात भारताला अवघे १७६ धावांचे लक्ष्य मिळाले. भारताला हे छोटे लक्ष्यसुद्धा गाठता आले नाही. २०० पेक्षा कमी धावांचा पाठलाग करताना कसोटीत भारताचा हा दुसरा पराभव ठरला. यापूर्वी १९९७ वेस्ट इंडीजविरुद्ध भारताचा पराभव झाला होता.

टर्निंग पॉइंट : हेराथची गोलंदाजी
दुसऱ्या डावात खेळपट्टी फिरकीला साथ देत होती. पहिल्या डावात एकही गडी बाद करू न शकणाऱ्या रंगना हेराथने दुसऱ्या डावात आग ओकणारी गोलंदाजी केली. डावखुरा फिरकीपटू हेराथने ८१ धावांत ८ गडी बाद करून टीम इंडियाचे कंबरडे मोडले. रहाणेने थोडा संघर्ष केला. मात्र, फलंदाजांचे अपयश भारताला भोवले. हेराथची गोलंदाजी टर्निंग पॉइंट ठरली. दुसऱ्या डावात सुमार गोलंदाजी टीम इंडियाने दुसऱ्या डावात गचाळ फलंदाजी केली असली तरीही त्यापूर्वी सुमार गोलंदाजीने घात केला. भारताच्या निष्प्रभ गोलंदाजीमुळेच लंकेने दुसऱ्या डावात ३६७ धावा काढल्या. दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने १३ षटके गोलंदाजी करून ७७ धावा मोजल्या आणि केवळ एक विकेट घेतली. अॅरोननही ७ षटकांत ३९ धावा मोजल्या. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर अनुभवी हरभजन फ्लॉप ठरला. त्यातुलनेत आर. अश्विन, हेराथ हे फिरकीपटू यशस्वी ठरले. लंकेच्या दुसऱ्या डावात अनुभवी हरभजन, ईशांत आणि अॅरोनच्या गोलंदाजीचे अपयश भारताला संकटात पोहोचवणारे ठरले.
नेतृत्वावर प्रश्नचिन्ह ?
युवा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. चेतेश्वर पुजारा संघात असताना सलग फ्लॉप होत असलेल्या रोहित शर्माला संघात का निवडले, हे न कळण्यासारखे आहे. रोहित बांगलादेशातही फ्लॉप ठरला होता. त्या वेळीसुद्धा वरिष्ठ खेळाडूंनी संघ निवडीवर टीका केली होती. दुसरीकडे टीम इंडियाला दुसऱ्या डावात खूप जास्त रक्षात्मक खेळ कोहलीच्या अंगलट आला.
यांच्या अपयशाने पराभव
१. रोहित शर्मा : ९ आणि ४ धावा.
२. लोकेश राहुल : ७ आणि ५ धावा
३. अजिंक्य रहाणे : ० आणि ३६ धावा.
४. हरभजनसिंग : ० आणि १ विकेट.
५. वरुण अॅरोन : १ आणि ० विकेट.
६. ईशांत शर्मा : १ आणि ० विकेट.
रोहित शर्माची निवड का ?
चेतेश्वर पुजाराच्या जागी मधल्या फळीत खेळणाऱ्या रोहित शर्माने पहिल्या डावात ९ तर दुसऱ्या डावात अवघ्या ४ धावा काढल्या. भारताने पहिल्या डावात ३७५ धावा काढल्या असल्या तरीही त्या कोहली आणि धवनच्या शतकामुळे शक्य झाल्या. मागच्या १९ डावांत रोहित शर्माला एकही शतक ठोकता आलेले नाही. या काळात त्याची सर्वोत्तम कामगिरी ५३ धावा इतकी राहिली आहे. सलग अपयशी ठरत असलेला रोहित शर्मा संघात का ? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.