आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणजी सेमीफायनल: झारखंडविरुद्ध गुजरातच्या ३ बाद २९३ धावा; प्रियांक पंचाळचे दमदार शतक!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- येथील जामठाच्या क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये गुजरातचा सलामीवीर प्रियांक पंचाळने शानदार प्रदर्शन करताना आणखी एक शतक ठोकले. पंचाळने नाबाद १४४ धावा ठोकल्या.  त्याच्याशिवाय कर्णधार पार्थिव पटेलने अर्धशतक ठोकले. या दोघांच्या खेळीमुळे सेमीफायनलच्या पहिल्या दिवशी गुजरातने झारखंडविरुद्ध ३ बाद २८३ धावा अशी मजबूत सुरुवात केली. दुसरीकडे राजकोट येथे सुरू असलेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये गतचॅम्पियन मुंबईविरुद्ध तामिळनाडूने शानदार प्रदर्शन करताना पहिल्या दिवशी ६ बाद २६१ धावा अशी चांगली सुरुवात केली. 
  
रणजीच्या सेमीफायनल सामन्यांना रविवारपासून सुरुवात झाली. नागपुरात सुरू असलेल्या सामन्यात पहिला दिवस गुजरातचा सलामीवीर प्रियांक पंचाळच्या नावे राहिला. त्याने या सत्रात आणखी एक शानदार शतक ठोकले. गुजरातने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मागच्या सामन्यात सलामीला येऊन ३५९ धावांची ऐतिहासिक खेळी करणारा समीत गोहेल आणि प्रियांक पंचाळ यांनी गुजरातकडून सुरुवात केली. दोघांनी ६२ धावांची सलामी दिली. 

गोहेल १८ धावा काढून बाद झाला. त्याला विकास सिंगने विराट सिंगकरवी झेलबाद केले. यानंतर प्रियांकने दुसऱ्या विकेटसाठी भार्गव मेराईसोबत ६५ धावांची भागीदारी करून डाव सावरला. मेराई ३९ धावा काढून बाद झाला. त्याचा अडथळासुद्धा विकास सिंगनेच दूर केला. मेराईने ६६ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार मारले. मेराई बाद झाला तेव्हा गुजरातचा स्कोअर २ बाद १२७ धावा असा होता. यानंतर प्रियांक पंचाळने कर्णधार पार्थिव पटेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची शतकी भागीदारी केली. या भागीदारीने गुजरातला मजबूत स्थितीत पोहोचवले. प्रियांकने या सत्रातील तब्बल पाचवे शतक  ठोकले. पार्थिव पटेल ६२ धावा काढून बाद झाला. पार्थिवला कौशल सिंगने त्रिफळाचीत केले. पार्थिवने ११५ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ६ चौकारांच्या साह्याने ही खेळी केली. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी प्रियांक पंचाळ १४४ आणि त्याच्यासोबत मनप्रीत जुनेजा १२ धावांवर नाबाद होते. झारखंडकडून विकास सिंगने ४८ धावांत २ तर कौशल सिंगने एक विकेट घेतली.   

तामिळनाडूची चांगली सुरुवात
राजकोट-
दुसऱ्या सेमीत तामिळनाडूने टॉस जिंकून मुंबईविरुद्ध प्रथम फलंदाजी घेतली. मुंबईकडून भारताचा अंडर १९ संघाचा आशिया कप विजेता सदस्य पृथ्वी शॉ आणि तामिळनाकडून व्ही.गंगाश्रीधर राजू यांनी प्रथम श्रेणीत पदार्पण केले. श्रीधर राजू १९ धावा काढून बाद झाला. त्यांचा कर्णधार अभिनव मुकुंदही ३८ धावा जोडून परतला. तामिळनाडूचा संघ २ बाद ६८ धावा असा संकटात सापडला होता. यानंतर कौशिक गांधी आणि बाबा  इंद्रजित यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११० धावांची शतकी भागीदारी करून तामिळनाडूचा डाव सावरला. यादरम्यान दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली. 

कौशिक गांधीने १३७ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांसह ५० धावा काढल्या. त्याला अभिषेक नायरने बाद केले. इंद्रजितला ६४ धावांवर शार्दूल ठाकूरने तंबूचा रस्ता दाखवला. इंद्रजितने ११४ चेंडूंत ९ चौकारांसह ६४ धावा काढल्या. दिनेश कार्तिक आणि बाबा अपराजित हे दोघे अपयशी ठरले. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी तामिळनाडूने ६ बाद २६१ धावा काढल्या होत्या. विजय शंकर ४१ धावांवर नाबाद होता. मंुबईकडून अभिषेक नायर आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.  
बातम्या आणखी आहेत...