आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Swapnil Gugale And Ankit Bawane Set New Record Of Highest Partnership In Ranji

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

70 वर्षांनंतर अंकित-स्वप्निलच्या विक्रमाने जागतिक स्तरावरची दुसरी सर्वाेच्च भागीदारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्राचा युवा कर्णधार स्वप्निल गुगळे (नाबाद ३५१) आणि अंकित बावणे (नाबाद २५८) यांनी शुक्रवारी झंझावाती फलंदाजीच्या बळावर रणजी चषकात भागीदारीच्या विक्रमाची नाेंद केली. या दाेन्ही युवा फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ५९४ धावांच्या विक्रमी अभेद्य भागीदारीने वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेला दिल्लीविरुद्धचा रणजी सामना गाजला. महाराष्ट्राचा कर्णधार गुगळेने पहिला डाव दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ६३५ धावसंख्येवर घोषित केला. गुगळेने वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही केला. तिहेरी शतक झळकावणारा स्वप्निल हा दहावा रणजीपटू ठरला. तसेच महाराष्ट्राचा चाैथा युवा फलंदाज ठरला. विक्रमी भागीदारी करणाऱ्या जाेडीला राेखण्यासाठी ९ गाेलंदाजांची
फाैज अपयशी ठरली.
प्रत्युत्तरात दिल्ली संघाने पहिल्या डावात बिनबाद २१ धावांची खेळी केली. दिवसअखेर उन्मुक्त चंद (४) अाणि माेहित शर्मा (१४) हे दाेघे मैदानावर खेळत अाहेत.

महाराष्ट्र संघाने कालच्या २ बाद २९० धावांवरून दुसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान, अंकित बावणे अाणि गुगळेने अापला दबदबा कायम ठेवताना दिल्लीच्या युवा गाेलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. यासह त्यांनी टीमच्या धावसंख्येला वेगाने गती दिली.
यापूर्वी सौराष्ट्राविरुद्ध रणजी सामन्यात महाराष्ट्राच्या भाऊसाहेब निंबाळकरांना डॉन ब्रॅडमनचा प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील वैयक्तिक उच्चांक ४६२ मोडण्याची संधी त्या वेळी साधता आली नव्हती. कारण निंबाळकर त्या वेळी ४४३ धावांवर खेळत होते. सौराष्ट्राचा संघ नंतर मैदानावर परतलाच नाही. महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक उच्चांकाला गवसणी घालण्याची संधी डाव घोषित केल्याने साधता आली नाही. मात्र, गुगळे-बावणे यांची ५९४ धावांची अभेद्य भागीदारी ही आहे.
पाटा खेळपट्टीवर गाेलंदाजांची धुलाई
वानखेडे स्टेडियमच्या ‘पाटा’ खेळपट्टीवर गुगळे व अाैरंगाबादच्या अंकित बावणे या जोडीने दिल्लीच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. तिसऱ्या विकेटसाठी या जोडीने १६४.५ षटकांत ३.६० च्या सरासरीने नाबाद ५९४ धावांची भागीदारी नोंदवली. २ बाद ४१ धावसंख्येवरून एकत्र आलेली ही जोडी दिल्लीकरांना अखेरपर्यंत फोडता आली नाही. कर्णधार गुगळेने ५२१ चेंडूंत ३७ चौकार व ५ षटकारांसह (६७.३७ च्या स्ट्राइक रेटने) नाबाद ३५१ धावा फटकावल्या. चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या अंकित बावणेनेही आपली २५८ धावांची मॅरेथॉन खेळी १८ चौकार व २ षटकारांनी सजविली होती.

दुसरी माेठी भागीदारी
जागतिक क्रिकेटमधील संगकारा - जयवर्धने यांच्या नावे ६२४ धावांच्या विश्वविक्रमी भागीदारीची नाेंद अाहे. त्यापाठाेपाठ अाता स्वप्निल गुगळे अाणि अंकित बावणेने जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी रचली. त्यांनी ५९४ धावांची भागीदारी केली. त्यांना विश्वविक्रमाला माेडीत काढण्याची संधी हाेती. मात्र, कर्णधाराने डाव घाेषित केला.
विजय हजारे-गुल यांचा ७० वर्षांचा विक्रम माेडीत
१९४६-४७च्या रणजी हंगामात बडोदा संघाने होळकरविरुद्ध खेळताना विजय हजारे व गुल महंमद या जोडीच्या वतीने ५७७ धावांचा भागीदारीचा कोणत्याही विकेटसाठीचा उच्चांक केला. गेली ७० वर्षे हा विक्रम अबाधित होता. तो विक्रमही गुगळे- अंकित बावणे जोडीने शुक्रवारी माेडीत काढला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य ५९४ धावांची भागीदारी केली.
धावफलक
महाराष्ट्र पहिला डाव धावा चेंडू ४ ६
स्वप्निल गुगळे नाबाद ३५१ ५२१ ३७ ५
खडीवाले झे. उन्मुक्त गो. सैनी १० १३ ०२ ०
खुराणा पायचीत गो. सैनी ०४ ०७ ०० ०
अंकित बावणे नाबाद २५८ ५०० १८ २
अवांतर : १२. एकूण : १७३ षटकांत २ बाद ६३५ धावा (डाव घोषित). गडी बाद क्रम : १-२७, २-४१. गोलंदाजी : सैनी १४.१-२-४४-२, अवाना २९-७-९७-०, सुयल २४.५-४-८९-०, मनन ४०-३-१४८-०, वरुण ३०-१-१०७-०, एन. राणा १५-२-४१-०, मिलिंदकुमार १७-१-७७-०, चंद १-०-९-०, शौर्य २-०-१५-०.
दिल्ली पहिला डाव धावा चेंडू ४ ६
उन्मुक्त चंद नाबाद ०४ १५ १ ०
मोहित शर्मा नाबाद १४ १५ ०२ ०
अवांतर : ३. एकूण : ५ षटकांत बिनबाद २१ धावा. गोलंदाजी : अनुपम संकलेचा २-०-५-०, मोहसीन सय्यद २-१-७-०, श्रीकांत मुंढे १-०-६-०.
माझे पहिले द्विशतक आई-वडिलांना समर्पित
माझे पहिलेच द्विशतक असून ते माझ्या आई-वडिलांना सर्मपित करतो. मी फलंदाजीला आलो तेव्हा संघाच्या दोन विकेट पडल्या होत्या. केवळ मैदानावर विकेट टिकवून खेळण्याचा विचार केला व शतक झाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्याचे लक्ष्य ठेवले, खेळत राहिलो. त्यानंतर आज मोठी कामगिरी करण्याची संधी असल्याचे जाणवलेेे व माझे हे द्विशतक झाले. मी ७ वर्षांपासून रणजी खेळतोय. स्वप्निलचा खेळ माहिती होता, अामचा ताळमेळ जमला व विक्रम झाला. संघासाठी जास्तीत जास्त धावा करू शकलो याचा अानंद आहे.
- अंकित बावणे, रणजीपटू
अंकितच्या मित्रांचा जल्लोष
अंकितची लहानपणापासून खेळण्याची चिकाटी आम्ही पाहिली आहे. त्याच्या द्विशतकाचा आनंद झाला आहे. विक्रमी भागीदारी केल्याने त्याच्यातील गुणवत्ता दिसून येते. भविष्यात त्याला भारतीय संघात खेळताना पाहायला आम्हाला आवडेल, अशी प्रतिक्रिया अंकितचे मित्र अजय काळे, भरत शर्मा, स्वप्निल चव्हाण, नीरज शिंबरे आदींनी दिली.
नक्कीच आनंदाचा क्षण आहे. अंकितचे कारकीर्दीतील पहिलेच द्विशतक ठरले, या ऐतिहासिक कामगिरीचा अभिमान वाटतो. परिस्थितीनुसार संघाचा डाव घोषित करण्यात आला, अन्यथा तो त्रिशतक करू शकला असता.
- रामदास बावणे, अंकितचे वडील
बातम्या आणखी आहेत...