आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराव सामना: रहाणे, धवन बरसले ! पहिल्या दिवसअखेर भारताच्या ६ बाद ३१४ धावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शतकी खेळीदरम्यान चौकार खेचताना भारताचा अजिंक्य रहाणे. - Divya Marathi
शतकी खेळीदरम्यान चौकार खेचताना भारताचा अजिंक्य रहाणे.
कोलंबो- श्रीलंकेच्या दौऱ्यावर टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली आहे. दौऱ्यातील पहिल्या आणि एकमेव सराव सामन्याच्या पहिला दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला. अजिंक्य रहाणेचे (नाबाद १०९) शतक आणि सलामीवीर शिखर धवनच्या (६२) अर्धशतकाच्या बळावर भारताने दिवसअखेर ७९ षटकांत ६ बाद ३१४ धावा काढल्या.

श्रीलंका अध्यक्षीय इलेव्हन संघाने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस बोलावले. त्यांचा हा निर्णय चुकला. भारताच्या सलामीवीरांनी शतकी सलामी दिली. सलामीवीर लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी २९.४ षटकांत १०८ धावांची सलामी दिली. लोकेश राहुल ४३ धावा काढून बाद झाला. त्याने ९६ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार मारले. तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास आलेला रोहित शर्मा पुन्हा अपयशी ठरला. त्याला केवळ ७ धावा काढता आल्या. रजिथाने त्याला त्रिफळाचित केले. यानंतर कर्णधार विराट कोहलीवर भारताचा डाव सावरण्याची जबाबदारी होती. धवन-कोहली खेळपट्टीवर होते आणि सर्वांच्या नजरा या दोघांच्या कामगिरीवर होत्या. कोहली विशेष कामगिरी करू शकला नाही. अवघ्या ९ चेंडूंत ८ धावा काढून कोहलीही चालता झाला. रजिथाच्या गोलंदाजीवर सिरिवर्धनाने त्याचा झेल घेतला. बिनबाद १०७ अशा सुस्थितीत असलेली टीम इंडिया ३ बाद १३० धावा अशी संकटात सापडली. अवघ्या ३ धावांच्या अंतराने स्थिरावलेला फलंदाज शिखर धवनही बाद झाला. धवनचा अडथळाही रजिथाने दूर केला. धवनने ६२ धावा काढल्या.

रहाणे-पुजाराची शतकी भागीदारी
धवन बाद झाल्यानंतर टीम इंडिया ३७.१ षटकांत ४ बाद १३३ धावा अशी अडचणीत सापडलेली होती. युवा फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी १३४ धावांची उपयुक्त अशी शतकी भागीदारी केली. अर्धशतकाकडे वाटचाल करणारा पुजारा ४२ धावा काढून बाद झाला. त्याने ८९ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार मारले. भारताच्या २६७ धावा झाल्या असताना पुजारा पाचव्या फलंदाजाच्या रूपाने बाद झाला. पुजारा बाद झाल्यानंतर फलंदाजीस आलेला वृद्धिमान साहा विशेष कामगिरी करू शकला नाही. अवघ्या ३ धावा काढून तो बाद झाला.

अजिंक्य रहाणेचे नाबाद शतक
मधल्या फळीत रहाणेने दमदार खेळ करत शतक ठोकले. रहाणेने ५९ चेंडूंत ५० धावा तर ११६ चेंडूंत १०० धावा काढल्या. त्याने वनडे स्टाइल शतक झळकावले. एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुसऱ्या टोकाने त्याने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवताना शंभरी गाठली. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी रहाणे १०९ तर आर. अश्विन १९ धावांवर खेळत होते. अश्विनने ३८ चेंडूंत १० धावा काढल्या. दोघांनी ११.३ षटकांत ४१ धावांची अभेद्य भागीदारी केली.

वृत्तसंस्था
श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज रजिथाने भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले. रजिथाने भारताचे तीन प्रमुख फलंदाज धवन, रोहित आणि कोहलीला बाद करून दमदार प्रदर्शन केले. या तिघांच्या विकेट एकापाठोपाठ घेऊन त्याने टीम इंडियाला अडचणीत आणले होते. त्याने १३ षटकांत २ निर्धाव टाकताना ४७ धावांत ३ गडी बाद केले. वंदारसेने ७६ धावांत २ तर गमागेने ६५ धावांत एक विकेट घेतली. टीम इंडियासाठी रजिथा घातक ठरला. त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना दोन्ही बाजूने चेंडू स्विंग केले.
बातम्या आणखी आहेत...