आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत अ विरुद्ध कांगारूंचा सराव पेपर आजपासून, मुंबईत रंगणार तीन दिवसीय लढत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - युवा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारत अ संघ शुक्रवारपासून मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर पाहुण्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीनदिवसीय सराव सामन्यात खेळेल. या सामन्यात दमदार प्रदर्शन करून भारताच्या कसोटी संघासाठी दारे ठोठावण्याची संधी भारत अ संघातील कर्णधार पंड्यासह इतर युवा खेळाडूंकडे असेल.
 
औरंगाबादचा युवा खेळाडू आणि महाराष्ट्र रणजी संघाची रनमशीन अंकित बावणेला या सामन्यात संधी मिळू शकते. दुसरीकडे पाहुण्या ऑस्ट्रेलियासाठी येत्या २३ फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध सुरू होत असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी हा एकमेव सराव सामना आहे. या सराव लढतीत चांगले प्रदर्शन करून कसोटीसाठी आत्मविश्वास उंचावून खेळण्याच्या प्रयत्नात स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघ असेल.   

हार्दिक पंड्यावर मर्यादित षटकांचा खेळाडू म्हणून असा शिक्का बसलेला आहे. या सराव लढतीत चांगले प्रदर्शन करून हा शिक्का पुसण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पंड्याने चांगले प्रदर्शन केले तर कर्णधार विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळेच्या पुढच्या रणनीतीचा तो एक महत्त्वाचा सदस्य ठरू शकतो. ऑस्ट्रेलियासारख्या जगातील सर्वाेत्तम संघाविरुद्ध रणजित दमदार प्रदर्शन करणाऱ्या युवा खेळाडूंना भारत अ संघात स्थान मिळाले आहे.  

ऑस्ट्रेलियासाठीसुद्धा हा सराव सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. कोच डॅरेन लेहमन या सराव लढतीत वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क यांना आजमावून भारतीय खेळपट्ट्यांवर हे कसे प्रदर्शन करतात याचा अंदाज घेऊ शकतील. भारताविरुद्ध मालिका जिंकायची असेल तर ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंना दमदार प्रदर्शन करावे लागेल. यामुळे पाहुणा संघ या सराव लढतीत नॅथन लॉयन, स्टीव्ह  ओकिफे आणि  ग्लेन मॅक्सवेल यांना संधी देऊ शकतो. युवा फलंदाज मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकोम्ब हे भारतीय भूमीवर प्रथमच खेळणार आहेत. त्यांच्या कामगिरीकडेसुद्धा संघ व्यवस्थापनाचे लक्ष असेल.  

भारत अ संघ मजबूत : भारत अ संघाकडून सलामीला रणजी सत्रात १३०० पेक्षा अधिक धावा काढणारा गुजरातचा सलामीवीर प्रियांक पांचाळसोबत अखिल हिरवाडकर खेळू शकतो. तिसऱ्या क्रमांकावर मुंबईचा श्रेयस अय्यरचे स्थान पक्के आहे. मधल्या फळीत ऋषभ पंत, ईशन किशन, अंकित बावणे हे खेळू शकतात. 
 
दोन्ही संघ असे 
भारत अ संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), अखिल हिरवाडकर, प्रियांक पांचाळ, श्रेयस अय्यर, अंकित बावणे, ऋषभ पंत, ईशान किशन, शादाब नदीम, क्रिश्नप्पा गोथम, कुलदीप यादव, नवदीप सैनी, अशोक डिंडा, मो. सिराज, राहुल सिंग, बाबा इंद्रजित.
 
ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एश्टन एगर, जॅक्सन बर्ड, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, उस्मान ख्वाजा, नॅथन लॉयन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन ओ किफे, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्विपसन.
 
बातम्या आणखी आहेत...