आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रैनाचे शतक; भारत अ संघाचा मालिका विजय, बांगलादेश अ संघावर ७५ धावांनी मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेश अ संघाविरुद्ध मालिका विजयानंतर ट्रॉफीसह टीम इंडियाचे खेळाडू. - Divya Marathi
बांगलादेश अ संघाविरुद्ध मालिका विजयानंतर ट्रॉफीसह टीम इंडियाचे खेळाडू.
बंगळुरू - सुरेश रैनाच्या दमदार शतकानंतर गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या बळावर भारत अ संघाने तिसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेश अ संघावर डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ७५ धावांनी मात केली. या विजयासह भारत अ संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद २९७ धावांचा डोंगर उभा केला. बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना वरुणराजाने व्यत्यय आणला. पावसामुळे बांगलादेश अ संघाला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे सुधारित ३२ षटकांत २१७ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, बांगलादेश अ संघाला ३२ षटकांत ६ बाद १४१ धावा काढता आल्या.
रैना, सॅमसन तळपले : तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने ६ बाद २९७ धावा काढल्या. भारत अ संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर मयंक अग्रवाल ४ धावा काढून बाद झाला. यानंतर कर्णधार उन्मुक्त चंदने ६८ चेंडूंत ४१ धावांचे योगदान िदले. या सामन्यात संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. कर्णधार आणि प्रशिक्षकाचा विश्वास सार्थ ठरवताना सॅमसनने ९० धावा ठोकल्या. त्याने ९९ चेंडूंचा सामना करताना १० चौकार आणि १ षटकार मारला. त्याचे शतक १० धावांनी हुकले. गेल्या काही सामन्यांत अपयशी ठरत असलेल्या सुरेश रैनाने या वेळी संधी साधली. रैनाने ९४ चेंडूंत १ षटकार, ९ चौकारांच्या साह्याने १०४ धावा झोडपल्या.
बांगलादेशचा संघर्ष
बांगलाकडून सौम्या सरकार १ आणि रोनी तालुकादार ९ धावा काढून बाद झाले. पाहुणा संघ ३ बाद २४ धावा, असा संकटात सापडला होता. कर्णधार मोमिनुल हक (३७) आणि लिंटन दास (२१) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. दोघे बाद झाल्यानंतर शब्बीर रहेमानने नाबाद ४१ धावा काढून प्रयत्न केले. त्याने ५२ चेंडूंमध्ये १ षटकार, ४ चौकार मारताना ही खेळी साकारली.
संक्षिप्त धावफलक
भारत अ संघ : रैना १००, उन्मुक्त चंद ४१ धावा. शफीउल इस्लाम ५६/२ बळी. बांगलादेश अ संघ : शब्बीर रहेमान ४१, मोमिनुल हक ३७ धावा. एस.अरविंद १४/२ बळी.