मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे रविवारी एमसीजीवर खेळवला जाईल. पाच सामन्यांच्या मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया सध्या २-० ने पुढे आहे. मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी
टीम इंडियाला रविवारचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. टीम इंडियासाठी हा सामना "करा किंवा मरा' असाच ठरणार आहे. दुसरीकडे यजमान ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून मालिका विजय निश्चित करण्याच्या प्रयत्नात मैदानावर उतरेल. दोन्ही संघांच्या गोलंदाजांनी मालिकेत सुमार प्रदर्शन केले आहे. कर्णधार धोनी आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांसमोर नव्या रणनीतीने खेळण्याचे आव्हान असेल.
पहिल्या वनडेत भारताचा ५ विकेटने पराभव झाला, तर दुसऱ्या वनडेत ७ विकेटने हरलो. कर्णधार धोनीने पराभवाचे खापर फिरकीपटूंवर फोडले आहे. फिरकीपटूंच्या महागड्या गोलंदाजीचा फटका भारताला बसला. दोन्ही सामन्यांत ३०० प्लस धावा काढल्यानंतरही भारताचा पराभव झाला. भारताला खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात शानदार प्रदर्शन करण्याची गरज आहे. भारताने मागच्या दोन्ही सामन्यांत चांगली फलंदाजी केली असली तरीही ३०८ किंवा ३०९ हा स्कोअर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियासाठी आव्हानात्मक ठरलेला नाही. आपल्या चुका सुधारताना यजमान संघाचा कर्णधार स्मिथविरुद्ध खास रणनीती करून भारताला खेळावे लागेल.
ऑस्ट्रेलियाचीही गोलंदाजी दुबळी
पर्थमध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज स्कॉट बोलेंड महागडा ठरत आहे. दुसरीकडे युवा जोएल पॅरिसलाही दोन सामन्यांत केवळ एक विकेट मिळाली आहे. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलही खास फॉर्मात नाही. तो फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत फेल हाेत आहे. फक्त जेम्स फॉकनरने दोन्ही सामन्यांत प्रत्येकी २ गडी बाद केले.
आणखी धावा काढाव्या लागतील
कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मते तिसऱ्या सामन्यात ३३० किंवा ३४० धावांचे लक्ष्य ठरवून खेळावे लागेल. असे केले तरच आम्ही जिंकू शकतो. या वेळी टीम इंडियाची मधली फळी आणि तळाच्या फलंदाजांनाही धावा काढण्याचे आव्हान असेल. यासाठी सर्व त्यांना मेहनत घ्यावी लागेल.
हेझलवूडला विश्रांती
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) जोश हेझलवूडला भारताविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिकेतून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी जॉन हेस्टिंगला संघात सामील करण्यात आले आहे. अागामी न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी सज्ज होण्यासाठी त्याला विश्रांती दिल्याचे लेहमन म्हणाले.
संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मनीष पांडे, ईशांत शर्मा, उमेश यादव, बरिंदर सरण, ऋषी धवन, गुरकिरत मान.
ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), अॅरोन फिंच, शॉन मार्श, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, मॅथ्यू वेड, जेम्स फॉकनर, जॉन हेस्टिंग, स्कॉट बोलेंड, जोएल पॅरिस.
पुढे वाचा, विजयासाठी दिलीप वेंगसरकर यांचा सल्ला