आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका दौर्‍यात तीन कसाेटी खेळणार भारतीय संघ; १ ऑगस्टपासून दौऱ्याला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- श्रीलंकेच्या एक महिन्याच्या दौऱ्यासाठी १५ सदस्यीय टीम इंडियाची घोषणा झाली आहे. जाहीर झालेल्या भारतीय संघात उजव्या हाताचा लेगस्पिनर अमित मिश्राचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे चार वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. अमित मिश्राला लेगस्पिनर कर्ण शर्माच्या जागी सामील करण्यात आले. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात तीन कसोटी खेळेल.

राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख संदीप पाटील आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवड समितीच्या बैठकीत लेगस्पिनर कर्ण शर्मा आणि मोहंमद शमी यांच्या नावाची चर्चा झाली नाही. कारण, हे दोघेही फिट नाहीत, असे त्यांनी सांगितले. रवींद्र जडेजा फॉर्मात नाही. िवराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार असेल. यष्टिरक्षक म्हणून वृद्धिमान साहाचा समावेश करण्यात अाला आहे. भारतीय संघ १ ऑगस्टला रवाना होईल. हा दौरा १ सप्टेंबर रोजी संपेल. रवी शास्त्री यांना टीम डायरेक्टर म्हणून कायम ठेवण्यात आले आहे, असे संदीप पाटील यांनी सांगितले. तेसुद्धा लंकेच्या दौऱ्यावर जातील.

"भारतीय संघात चार वेगवान गोलंदाज उमेश, ईशांत, भुवनेश्वर आणि अॅरोन आहे. आम्ही सर्वश्रेष्ठ संघ निवडला. हा संघ दौऱ्यात चांगली कामगिरी करेल याचा आम्हाला विश्वास वाटतो,' असे संदीप पाटील म्हणाले.

गेल्या काही दौऱ्यांत भारताला श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकता अालेली नाही, या प्रश्नावर ठाकूर म्हणाले, हा संघ चांगला आहे आणि या वेळी भारत विजय मिळवेल, असे त्यांनी नमूद केले. निवड समितीच्या बैठकीत कसोटी कर्णधार विराट कोहलीसुद्धा उपस्थित होता.

भारतीय संघ असा
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, हरभजनसिंग, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वरकुमार, वरुण अॅरोन.
चार वर्षांपूर्वी अखेरची कसोटी खेळला...

३२ वर्षीय अमित मिश्राने आपला अखेरचा कसोटी सामना २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे खेळला. मिश्राने आपल्या कारकीर्दीत १३ कसोटीत ४३.३० च्या सरासरीने ४३ बळी घेतले. त्याने २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहली येथे कसोटी पदार्पण केले होते. मागच्या ७ वर्षांत लेगस्पिनर अमित मिश्रा केवळ १३ कसोटी खेळू शकला.

मिश्रा आमच्या योजनेचा भाग
अमित मिश्रा आमच्या योजनेत होताच. मागच्या वर्षी तो रिझर्व्ह होता. आम्ही श्रीलंकेतील परिस्थिती बघता त्याची निवड केली. प्रज्ञान ओझाच्या नावाचीही चर्चा झाली. मात्र, आम्हाला १५ खेळाडूच निवडायचे होते. यामुळे आम्ही मिश्राला प्राधान्य दिले. हरभजनसिंगही फॉर्मात आहे. यामुळे त्याची निवड झाली. - संदीप पाटील, निवड समितीचे प्रमुख.
ऑस्ट्रेलिया-अ विरुद्ध कोहली खेळणार
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला श्रीलंकेच्या दौऱ्यापूर्वी स्वत:चा फॉर्म तपासायचा आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध भारत अ संघाकडून २९ जुलै ते १ ऑगस्टपर्यंत होणाऱ्या चारदिवसीय सामन्यात खेळण्याची विनंती त्याने बीसीसीआयकडे केली आहे. बीसीसीआयने त्याची विनंती मान्य केली आहे. ही माहिती सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली. चेतेश्वर पुजाराच संघाचा कर्णधार असेल, असे त्यांनी सांगितले. बांगलादेशात झालेल्या मालिकेनंतर कोहलीने झिम्बाब्वे दौऱ्यातून विश्रांती घेतली. श्रीलंकेविरुद्ध मालिकेपूर्वी सराव गरजेचा वाटल्याने कोहलीने निवड समितीकडे विनंती केली.

आयपीएलचे दोन्ही संघ सध्या निलंबित
पत्रकार परिषदेत आयपीएल संबंधीही प्रश्न झाले. "चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांना सध्या निलंबित करण्यात आले आहे, बरखास्त नव्हे. आम्ही एक समिती गठित केली आहे. ही समिती जस्टिन लोढा यांच्या अहवालाचा अभ्यास करून सहा यानंतर या दोन्ही संघांबाबत निर्णय होईल. त्यापूर्वी भविष्याबाबत बोलणे योग्य नाही,' असेही ते म्हणाले.
दौर्‍याचा कार्यक्रम असा
वॉर्मअप मॅच ६ ते ८ ऑगस्ट.
पहिली कसोटी १२ ते १६ ऑगस्ट.
दुसरी कसोटी २० ते २४ ऑगस्ट.
तिसरी कसोटी २८ अाॅगस्ट ते १ सप्टेंबर.