आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरी कसोटी आजपासून नागपुरात; मालिकेत आघाडीचे भारताचे प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नागपुरातील खेळपट्टी अगदी पहिल्या दिवसापासूनच फिरकीपटूंना सहकार्य करणार, असे संकेत मिळत असल्यामुळे बुधवारपासून नागपुरातील जामठा येथील व्हीसीए मैदानावर सुरू होणाऱ्या भारत-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या फिरकीपटूंच्या बोटातील कसबच सामन्याचे भवितव्य ठरवणार, अशी दाट शक्यता आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत १-० ने पुढे आहे.

गेल्या काही कसोटी सामन्यांचा विचार करता भारतीय फिरकीपटूंनी खेळपट्टीवर अधिराज्य गाजवत सामन्याचा तीन दिवसांत निकाल लावल्याची उदाहरणे ताजीच आहेत. नागपुरातील कसोटीही याच मार्गाने जाण्याची शक्यता असल्याचे मत मैदानावरील तज्ज्ञांनी खेळपट्टी बघून व्यक्त केले आहे. त्यामुळेच दोन वेगवान गोलंदाज व तीन फिरकीपटू अशा नियमित पाच गोलंदाजांसह टीम इंडिया मैदानात उतरणार. फिरकी ही भारताची जमेची बाजू असल्यामुळे एक फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू संघात असेलच, असे संकेत विराट कोहलीने दिले आहेत.
पहिल्या दोन कसोटी द. आफ्रिकेची फलंदाजी दुबळी ठरली. पहिल्या दोन कसोटीत आफ्रिकेने १८४, १०९ आणि २१४ धावा काढल्या. द. आफ्रिकेसाठी तिसरी कसोटी "करा किंवा मरा'ची असून, भारतीय फिरकीचे आव्हान त्यांच्यापुढे असेल. २००६ पासून विदेश भूमीवर द. आफ्रिकेने एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारताने नागपूरात विजय मिळवला तर हा त्यांचा विक्रम यावेळी अडचणीत येऊ शकतो.

द. आफ्रिकन गोलंदाजीचा आधारस्तंभ डेल स्टेन दुखापतीतून पूर्णत: सावरला नसल्यामुळे तो तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही. ही टीम इंडियासाठी जमेची बाजू आहे. स्टेनने जामठा येथील खेळपट्टीवर ६ फेब्रुवारी २०१० रोजी ५१ धावांत भारताला ७ हादरे देत द. आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता.

टीम इंडियाचे फिरकीचे त्रिकूट
तिकडे अश्विनसह अमित मिश्रा आणि रवींद्र जडेजा हे तिघे फिरकी डिपार्टमेंट सांभाळणार असल्यामुळे भारताला या कसोटीतही विजयाची आशा आहे. द. आफ्रिकाही सामन्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघत असून कर्णधार हाशिम आमला, डिव्हिलर्स, डुमिनी, प्लेसिस असे तगडे फलंदाज या खेळपट्टीवर चालतील, अशी अपेक्षा बाळगून आहे.

नागपुरातील खेळपट्टीवर याआधी इंग्लंडचे फिरकीपटू स्वान आणि माँटी पानेसरने चांगलाच धुमाकूळ घातला होता. महेंद्रसिंग धाेनीच्या खेळीमुळे भारताने कशीबशी ही कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवले होते. तेव्हापासून भारतीय फिरकीपटूंना कसे सहकार्य मिळेल, याकडेच खेळपट्टी तयार करताना लक्ष दिले जाते. खेळपट्टी भारतीय फिरकीपटूंना लाभदायक ठरेल, अशीच आशा आहे.

फिरकीपटूंना मदत मिळणार
खेळपट्टी चांगलीच कोरडी दिसत असून गवतही फारसे नसल्यामुळे या खेळपट्टीवर सामन्याच्या पहिल्याच दिवशी चहापानानंतर फिरकीपटूंना मनाप्रमाणे चेंडू वळवता येतील, अशी माहिती क्युरेटर अमर कार्लेकर यांनी दिली. खेळपट्टीचे हे स्वरूप बघता दोन्ही संघ तीन तज्ज्ञ फिरकीपटूंसह मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
दोन्ही संघ असे
भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, रविचंद्रन अश्विन, वरुण अॅरोन, ईशांत शर्मा, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, के. एल. राहुल, अमित मिश्रा, गुरकिरत सिंग.
द. आफ्रिका : हाशिम आमला (कर्णधार), एबी डिव्हिलर्स (उपकर्णधार), एस. वॅन जायल, डीन एल्गर, फाफ डू प्लेसिस, जे.पी. डुमिनी, डॅन विलास (यष्टिरक्षक), किल अॅबाेट, कॅगिसो राबाडा, मोर्ने मोर्केल, इम्रान ताहिर, टेम्बा बावुमा, एम. डी. लँगे, सायमन हार्मर, डेल स्टेन, वेरोन फिलँडर, डी.एल. पिड.
भारतासाठी जमेची बाजू
- मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा (अष्टपैलू) हे तिन्ही फलंदाज फाॅर्मात. धवनही आला लयीत.
- रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा हे फिरकी त्रिकूट चांगलेच यशस्वी. हे तिघे भारताचे शक्तिस्थान.
- द. आफिकेचा स्पीडस्टार डेल स्टेन संघाबाहेर ही भारतासाठी जमेची बाजू.
- पाच तज्ज्ञ गोलंदाज, एक अष्टपैलू व सहा फलंदाजांसह उतरणार मैदानात.
द.आफ्रिकेची उजवी बाजू
- हाशिम आमला, डिव्हिलिर्स, सलामीवीर एल्गर फाॅर्मात, आमलाने २०१० मध्ये जामठ्यावर सर्वाधिक वैयक्तिक नाबाद २५३ धावा तडकावल्या होत्या.
- मोर्ने मोर्केल स्टेनच्या जागी खेळणार. के. राबाडाच्या जोडीने वेगवान गोलंदाज. डुमिनीही संघात परतला.
- इम्रान ताहिर, सायमन हार्मर, डीन एल्गर हे फिरकीपटू फाॅर्मात. हे तिघेही नागपुरात खेळू शकतात.