आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरी कसोटी: सलामीला लंकेची निराशा, भारताकडे २५३ धावांची आघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - सुपरस्टार खेळाडू कुमार संगकाराच्या शेवटच्या कसोटीत यजमान श्रीलंका टीमने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १४० धावांची खेळी केली. यजमान टीमचे सलामीवीर घरच्या मैदानावर सपशेल अपयशी ठरले. त्यांना भारतीय गोलंदाजीमुळे समाधानकारक खेळी करता आली नाही. दिवसअखेर मैदानावर श्रीलंकेचा थिरिमाने २८ आणि कर्णधार मॅथ्यूज १९ धावांवर खेळत होते. तत्पूर्वी भारतीय संघाने पहिल्या डावात ३९३ धावांची शानदार खेळी केली.
यासह टीम इंडियाला अद्याप २५३ धावांची आघाडी आहे. पाहुण्या भारताने अशा प्रकारे यजमान टीमवर दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

दुसऱ्या दिवशी भारताकडून गोलंदाजीत उमेश यादव, आर. अश्विन आणि अमित मिश्राने प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यामुळे लंकेचा दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. भारताने लंकेला तीन बाद १४० धावांत रोखण्याची किमया साधली.

संगकाराच्या ३२ धावा : शेवटच्या कसोटीत खेळत असलेल्या संगकाराला ३२ धावांची खेळी करता आली. त्याने ८७ चेंडूंचा सामना करताना चार चौकारांच्या आधारे ३२ धावा काढल्या. याशिवाय त्याने कौशल सिल्वासोबत दुसऱ्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी केली. या वेळी आर. अश्विनने संगकाराची महत्त्वाची विकेट टीम इंडियाला मिळवून दिली.
भारताच्या ३९३ धावा तत्पूर्वी भारताने शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ६ बाद ३१९ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. अश्विन (२) झटपट बाद झाल्यानंतर वृद्धिमान साहा आणि
अमित मिश्राने संघाचा डाव काहीसा सावरला. या दोघांनी संयमी खेळी करून आठव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. साहाने (५६) कसोटी करिअरमध्ये दुसरे अर्धशतक झळकावले. अमित मिश्राने २४ धावा काढून तंबू गाठला. त्यानंतर ईशांत शर्मा (२) व उमेश यादव (२) झटपट बाद झाले. श्रीलंकेकडून प्रसादने चार व मॅथ्यूजने २ गडी बाद केले.
टीम इंडियाकडून संगाला गार्ड आॅफ आॅनर
करिअरमधील शेवटची कसोटी खेळत असलेल्या कुमार संगकाराला शुक्रवारी टीम इंडियाने गार्ड आॅफ आॅनर दिला. या वेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या कुमार संगकारासोबत हस्तांदोलन केले. तसेच सर्वच खेळाडूंनी त्याचे स्वागत केले.
टाळ्यांचा कडकडाट
कुमार संगकाराच्या शेवटच्या कसोटीत चाहत्यांचाही उत्साह अधिक शिगेला पोहोचलेला असल्याचे दिसून आले. संगकारा मैदानावरून परतत असताना चाहत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटासह त्याला निरोप दिला. या वेळी मैदानावर उत्साह आणि काहीसे गंभीरतेचे वातावरण निर्माण झालेले होते.