आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Tour Of Bangladesh, Only Test: Bangladesh V India At Fatullah,

कसोटी पहिला दिवस: धवन-मुरली सुपरहिट! टीम इंडियाच्या बिनबाद २३९ धावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलामीवीर शिखर धवनने तिसरे कसोटी शतक झळकावले - Divya Marathi
सलामीवीर शिखर धवनने तिसरे कसोटी शतक झळकावले
फातुल्ला - सलामीवीर शिखर धवनचे तिसरे कसोटी शतक आणि मुरली विजयच्या नाबाद ८९ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यांच्या पहिल्या दिवशी बिनबाद २३९ धावा काढल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे बुधवारी ५६ षटकांचाच खेळ होऊ शकला. बांगलादेशचे गोलंदाज आपल्या घरच्या मैदानावर प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत.
धवनने वनडे स्टाइल फलंदाजी केली. त्याने अवघ्या १५८ चेंडूंचा सामना करताना २१ चौकारांच्या साहाय्याने नाबाद १५० धावा ठोकल्या. सलामीवीर मुरली विजयने रक्षात्मक फलंदाजी करताना १७८ चेंडूंत नाबाद ८९ धावा काढल्या. त्याने धवनला चांगली साथ दिली.

फिरकीला विकेट नाही
संथ आणि सपाट खेळपट्टीवर बांगलादेशच्या फिरकीपटूंना संघर्ष करावा लागला. सकिब-अल-हसन (९ षटकांत ३४ धावा), तैजुल इस्लाम (१२ षटकांत ५५ धावा), जुबेर हुसेन (७ षटके, ४१ धावा), शुवागता होम (१३ षटके, ४७ धावा) भारतीय फलंदाजांना रोखू शकले नाहीत. या चारही फिरकीपटूंना एकही विकेट मिळाली नाही.

धवनला जीवदान : डावाच्या २४ व्या षटकात पाऊस येण्यापूर्वी फिरकीपटू तैजुलच्या चेंडूवर शुवागता सोमने शॉर्ट मिडविकेटवर धवनचा सोपा झेल सोडला. धवन त्या वेळी ७३ धावांवर होता.
धवनच्या खेळात सुधारणा : कसोटीत शिखर आत्मविश्वास दाखवत नव्हता. मात्र, त्याने कठोर मेहनत घेतली. कसोटीचा आत्मविश्वास त्याने मिळवला. त्याच्या खेळात सुधारणा झाली आहे, असे त्याचे कोच मदन शर्मा यांनी सांगितले.
चार तास पावसाचा खोळंबा
पावसामुळे जवळपास ४ तास खेळ होऊ शकला नाही. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर धवन आणि विजय लयीत आले. विजयने शाहिदला चौकार मारून अर्धशतक पूर्ण केले. यानंतर शिखर धवनही आक्रमक झाला. शंभरीच्या जवळ आल्यानंतरही त्याने गोलंदाजांवर दया दाखवली नाही. चौकार ठोकून तो नव्वदीत पोहोचला.
दोघांची द्विशतकी भागीदारी अशीही
धवन आणि विजय यांनी कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा २०० धावांपेक्षा अधिकची भागीदारी केली. यापूर्वी दोघांनी २०१३ मध्ये मोहाली येथे २८९ धावांची भागीदारी केली होती. दोघांनी सकाळपासून सकारात्मक खेळ केला. दोघांनी यजमान गोलंदाजांविरुद्ध सहज धावा काढल्या. धवनने या द्विशतकी भागीदारीत आक्रमक खेळ केला.
धावफलक
भारत पहिला डाव धावा चेंडू ४ ६
मुरली विजय नाबाद ८९ १७८ ८ १
शिखर धवन नाबाद १५० १५८ २१ ०
अवांतर : ०, एकूण : ५६ षटकांत बिनबाद २३९ धावा. गोलंदाजी : मोहंमद शाहिद १२-२-५२-०, सौम्य सरकार २-०-७-०, शुवागाता होम : १३-०-४७-०, सकिब अल हसन ९-१-३४-०, तैजुल इस्लाम १२-०-५५-०, जुबेर हुसेन ८-०-४१-०, इम्रुल कायेस १-०-३-०.