आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताची न्यूझीलंडवर १९७ धावांनी मात, मिशेल सँटनरने ७१ धावा काढून अर्धशतक ठोकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर - टीम इंडियाने कानपूर येथे न्यूझीलंडला पहिल्या कसोटीत १९७ धावांनी पराभूत केले. यासह भारताने ५०० व्या कसोटीत विजय मिळवण्याची कामगिरी केली. रवींद्र जडेजाने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. जडेजाने सामन्यात ६ विकेट घेताना एक अर्धशतकही ठोकले. या विजयानंतर यजमान भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरी कसोटी येत्या शुक्रवारपासून कोलकात्यात खेळवली जाईल.

भारताने ग्रीनपार्क स्टेडियमवर दुसऱ्या डावात ५ बाद ३७७ धावा काढून न्यूझीलंडपुढे विजयासाठी ४३४ धावांचे लक्ष्य ठेवले. पाचव्या दिवशी जेवणाच्या ब्रेकनंतर न्यूझीलंडचा डाव २३६ धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून ल्युक रोंचीने ८० तर सँटनरने ७१ धावांचे योगदान दिले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. भारताकडून ऑफस्पिनर आर. अश्विनने ६ विकेट घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमीने रिवर्स स्विंगच्या मदतीने दोघांना बाद केले.

पाचव्या आणि अखेरच्या दिवशी न्यूझीलंडने ४ बाद ९३ वरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. रोंची आणि सँटनरने किवींकडून संघर्ष केला. सकाळी तासभर भारताला यश मिळाले नाही. भारत दौऱ्यासाठी अखेरच्या क्षणी न्यूझीलंड संघात सामील झालेल्या रोंचीने संघर्ष केला. त्याने अर्धशतकही पूर्ण केले. रोंचीने भारतीय गोलंदाजांना सलगपणे त्रस्त केले. रोंची हळूहळू शतकाकडे वाटचाल करत होता. मात्र, ८० धावांवर असताना त्याची एकाग्रता भंग झाली. जडेजाला क्रॉस शॉट मारण्याच्या नादात त्याचा उडालेला झेल अश्विनने घेतला. रोंचीने सँटनरसोबत शतकी भागीदारी केली.
अश्विनचे दहा बळी
जेवणाच्या ब्रेकनंतर अश्विनने तिन्ही विकेट घेऊन ५०० व्या कसोटीत भारताचा विजय निश्चित केला. पहिल्या डावात ४ विकेट घेणाऱ्या अश्विनने दुसऱ्या डावातील ६ विकेटसह सामन्यात १० गडी बाद केले. जडेजाने सामन्यात ६ गडी बाद करताना अर्धशतकही ठोकले. जडेजाने पहिल्या डावात ४२ तर दुसऱ्या डावात नाबाद ५० धावा काढल्या. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे जडेजाला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला.

सँटनरची झुंज अपयशी
रोंची बाद झाल्याचा दबाव सँटनरने घेतला नाही. त्याने आपला खेळ कायम ठेवला. त्याने सुद्धा अर्धशतक पूर्ण केले. त्याला साथ देणाऱ्या वॉटलिंगला मो. शमीने रिवर्स स्विंगवर पायचित केले. पुढच्या चेंडूवर मार्क क्रेगला शमीने त्रिफळाचित करून पॅव्हेलियनमध्ये परतवले. जेवणाच्या ब्रेकपर्यंत न्यूझीलंडचा स्कोअर ७ बाद २०५ धावा होता. तेव्हा भारताच्या विजयाला ३ विकेटची गरज होती.
मार्क क्रेग मालिकेबाहेर
कानपूर कसोटीतील पराभवानंतर न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला. त्यांचा ऑफस्पिनर मार्क क्रेग स्नायू दुखावल्यामुळे पूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी अनुभवी ऑफस्पिनर जतीन पटेलला संघात सामील करण्यात आले आहे. जतीन पटेलने न्यूझीलंडकडून १९ कसोटीत ५२ बळी घेतले आहेत. पटेलने अखेरचा कसोटी सामना २०१३ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.

हेही आहे महत्त्वाचे
} अश्विनने या कसोटीत १० विकेट घेतल्या. अश्विनने ३७ कसेाटीत ५ वेळा १० विकेट घेऊन हरभजनच्या विक्रमाची बरोबरी केली. आता त्याच्या पुढे फक्त अनिल कुंबळे आहे. कुंबळेने ८ वेळा अशी कामगिरी केली आहे. अश्विन लवकरच हा विक्रम आपल्या नावे करू शकतो.
} विराट कोहलीने आतापर्यंत एकही कसोटी न गमावता ११ सामन्यांत नेतृत्व केले आहे. याबाबत त्याने धोनीची बरोबरी केली. पराभूत न होता सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करण्याचा विक्रम भारताकडून सुनील गावसकर यांच्या नावे आहे. गावसकर यांनी पराभूत न होता १८ कसोटीत नेतृत्व केले होते. कपिल देवने १७, अझरुद्दीनने १४ कसोटीत नेतृत्व केले.
} रविचंद्रन अश्विनने ३७ कसोटीत १९ व्यांदा ५ विकेट घेतल्या. ३७ कसोटीत इतक्या वेळा ५ विकेट घेण्यात त्याच्यापेक्षा फक्त दोनच गोलंदाज पुढे आहेत.
} ल्युक रोंचीच्या नावे आता दोन कसोटीत दोन अर्धशतके आहेत. त्याने इंग्लंडविरुद्ध ८८ तर भारताविरुद्ध ८० धावांची खेळी केली. त्याची सरासरी ५९.२५ अशी आहे.
मी अजून शिकतोय..
^
मी नेतृत्वात अजूनही शिकतोय. मी जवळपासच्या लोकांकडून सल्ला घेत असतो. सुरुवातीच्या काही सामन्यांत आम्ही आक्रमक होतो. धावाही लुटवल्या. मात्र, विकेट मिळत नाही, तेव्हा थोडा संयम ठेवण्याची गरज असते हे मी शिकलो.
- विराट कोहली, भारतीय कर्णधार.
धावफलक
भारत पहिला डाव ३१८. न्यूझिलंड पहिला डाव २६२
भारत दुसरा डाव ५ बाद ३७७.
न्यूझीलंड दुसरा डाव (लक्ष्य ४३४) धावा चेंडू ४ ६
लँथम पायचित गो. अश्विन ०२ १५ ०० ०
गुप्तिल झे. विजय गो. अश्विन ०० ०५ ०० ०
विल्यम्सन पायचित गो. अश्विन २५ ५९ ०३ ०
रॉस टेलर धावबाद १७ ३६ ०२ ०
रोंची झे. अश्विन गो. जडेजा ८० १२० ०९ १
सँटनर झे. रोहित गो. अश्विन ७१ १७९ ०७ २
वॉटलिंग पायचित गो. शमी १८ ३० ०४ ०
क्रेग त्रि. गो. शमी ०१ ०२ ०० ०
सोडी त्रि. गो. अश्विन १७ ३८ ०२ १
बोल्ट नाबाद ०२ ३० ०० ०
वॅग्नर पायचित गो. अश्विन ०० १२ ०० ०
अवांतर : ०३. एकूण : ८७.३ षटकांत सर्वबाद २३६ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२, २-३, ३-४३, ४-५६, ५-१५८, ६-१९४, ७-१९६, ८-२२३, ९-२३६, १०-२३६. गोलंदाजी : मो. शमी ८-२-१८-२, आर. अश्विन ३५.३-५-१३२-६, रवींद्र जडेजा ३४-१७-५८-१, उमेश यादव ८-१-२३-०, विजय २-०-३-०.
बातम्या आणखी आहेत...