आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND Vs AUS: तिस-या दिवसअखेर भारताच्या 4 बाद 213 धावा, पुजारा- रहाणे जोडी हिट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभेद्य ९३ धावांची भागीदारी करून डाव सावरणारे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा. - Divya Marathi
अभेद्य ९३ धावांची भागीदारी करून डाव सावरणारे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा.
बंगळुरू  - चेतेश्वर पुजारा (नाबाद ७९) आणि अजिंक्य रहाणे (नाबाद ४०) यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ९३ धावांच्या केलेल्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने पुनरागमन केले आहे. दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत टीम इंडियाने दुसऱ्या डावात ४ बाद २१३ धावा काढल्या होत्या. पहिल्या डावात ८७ धावांनी मागे पडलेल्या भारताकडे आता एकूण १२६ धावांची आघाडी आहे. खेळपट्टीची स्थिती पाहता चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला धावांचा पाठलाग करणे अत्यंत कठीण जाऊ शकते. रहाणे-पुजारामुळे भारताने सामन्यात पुनरागमन केले असले तरीही टीम इंडियावरील संकट अजून दूर झालेले नाही. भारताचा पराभव टळू शकेल इतका स्कोअर अजून झालेला नाही. या दोघांकडून मंगळवारी अशाच दमदार प्रदर्शनाची आशा असेल. भारताकडून सलामीवीर लोकेश राहुलने पुन्हा एकदा शानदार खेळ करताना ५१ धावा काढल्या.   
 
मालिकेत प्रथमच सत्रात एकही विकेट नाही :  पुजारा-रहाणेने नाबाद ९३ धावांची भागीदारी केली. मालिकेत दोन्ही संघांकडून ही कोणत्याही विकेटसाठी झालेली आतापर्यंतची सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. याआधी मॅट रेनशॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ८२ धावांची सर्वोत्तम भागीदारी केली होती. मालिकेत कोणत्याही एका सत्रात एकही विकेट न पडण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात एकही विकेट पडली नाही. भारताकडून दुसऱ्या डावात अभिनव मुकुंदने १६ धावा, तर विराट कोहली १५ धावा काढून बाद झाले. मधल्या फळीत खेळण्यास आलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा २ धावा काढून बाद झाला.   
 
चहापानाच्या ब्रेकपर्यंत भारताने १२२ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. चहापानानंतर भारताने एकही विकेट गमावली नाही. ऑस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने ५७ धावांत सर्वाधिक  ३ गडी बाद केले. स्टीव्ह ओकिफने १ गडी बाद केला.   
 
ऑस्ट्रेलियाने ३९ धावांत ४ विकेट गमावल्या :  तत्पूर्वी सकाळी ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवशी सकाळी ६ बाद २३७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. कांगारूंनी तिसऱ्या दिवशी ३९ धावांत ४ विकेट गमावल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २७६ धावांत आटोपला. मिशेल स्टार्क २६ आणि मॅथ्यू वेड ४० धावा काढून बाद झाले. स्टार्कला अश्विनने, तर वेडला जडेजाने बाद केले. जडेजाने यानंतर नॅथन लॉयन (०) आणि जोश हेझलवूड (१) यांना बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपवला.  
 
कोहली अपयशी; तिसऱ्या पंचाच्या निर्णयावरही नाखुश   
भारतीय कर्णधार विराट कोहली मालिकेत सलग चौथ्यांदा फेल झाला. ३५ व्या षटकात हेझलवूडच्या गोलंदाजीवर दुसऱ्या चेंडूवर कोहलीला पंच नायजल लाँग यांनी पायचीत दिले. कोहलीने रिव्ह्यू घेतला. चेंडू आधी बॅटला व नंतर पॅडला लागल्याचा कोहलीचा दावा होता. मात्र, रिव्ह्यूने चेंडू आधी बॅटवर लागला की पॅडवर हे स्पष्ट होत नव्हते. मैदानावरील पंचाचा निर्णय बदलण्यासाठी ठोस पुराव्याची गरज असते. यामुळे मैदानी पंच नायजल लाँग यांनी आपला निर्णय कायम ठेवला. कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा नाराज दिसत होता.   
 
१० च्या सरासरीने कोहलीने या मालिकेत धावा काढल्या. करिअरमध्ये एका मालिकेतील सर्वांत सुमार प्रदर्शन.
 
राहुलच्या १००० धावा पूर्ण   
- लोकेश राहुलने कसोटीच्या २५ व्या डावात आपल्या १००० धावा पूर्ण केल्या. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो १९ वा सलामीवीर ठरला. त्याने  वयाच्या २५ व्या वर्षी ही कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो तिसरा युवा भारतीय फलंदाज ठरला.   
- कोहली आणि पुजारा यांनी या सत्रात १००० धावा पूर्ण केल्या आहेत. याआधी २००३-०४ च्या सत्रात वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविडने एकत्र ही कामगिरी केली होती.  
 
जडेजाचा विक्रम 
रवींद्र जडेजाने ६ गडी बाद केले. त्याने कसोटीत सातव्यांदा एका डावात ५ गडी बाद करण्याचा विक्रम केला. यासह त्याने भारताकडून  ईशांत शर्मा, इरफान पठाण, व्यंकटेश प्रसाद, शिवलाल यादव यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, बंगळुरू कसोटीतील क्षणचित्रे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...