आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाच्या वेगवान पिचवर वनडेत टीम इंडियाची "कसोटी' !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्थ - टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना मंगळवारी पर्थच्या वेगवान पिचवर खेळवला जाईल. वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर टीम इंडियाची ही "अग्निपरीक्षा'च ठरेल. टीम इंडियातील युवा खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा पूर्ण लाभ उचलून प्रदीर्घ काळी संघाकडून खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी सामन्याच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.

धोनी म्हणाला, "ज्या युवा खेळाडूंना या दौऱ्यासाठी संधी मिळाली आहे, त्यांनी संधीचा पूर्ण फायदा उचलला पाहिजे, असे मला वाटते. सध्या देशातील क्रिकेटची व्यवस्था आधीप्रमाणे पूर्णपणे तयार क्रिकेटपटू देण्यात असमर्थ ठरत आहे. आम्ही युवा खेळाडूंना भविष्यासाठी तयार करीत आहोत,' असेही त्याने नमूद केले.

पाच गोलंदाजांसह खेळणार
धोनीने भारतीय संघाबाबत माहिती दिली. बहुदा आम्ही तीन वेगवान आणि दोन फिरकीपटूंसह खेळू शकतो. आमच्याकडे वेगवान अष्टपैलू खेळाडू नाही. यामुळे आम्ही तीन वेगवान, दोन फिरकीपटूंसह खेळू शकतो. यजमान ऑस्ट्रेलिया पाच वेगवान गोलंदाजांसह खेळेल. त्यांच्याकडे एकही फिरकीपटू नाही. वेगवान गोलंदाजी ऑस्ट्रेलियाचे शक्तिस्थान आहे, असेही माहीने स्पष्ट केले.

पराभवाची परतफेड करणार ?
मागच्या वेळेस ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर भारताचा पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करून वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. भारत या पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघात मायकेल क्लार्क, मिशेल जॉन्सन, ब्रेड हॅडिन सारखे दिग्गज होते. आता हे खेळाडू संघात नाही. भारताचा पराभवाच्या परतफेडीची संधी असेल.

परिवर्तनाचा वेळ
हा परिवर्तनाचा वेळ आहे. भारतीय संघ बदलाच्या काळातून जात आहे. युवराज टी-२० संघात आहे, मात्र वनडेत नाही. सुरेश रैनाला वनडे संघातून बाहेर करण्यात आले आहे. संघात असे बरेच युवा खेळाडू आहेत, जे आपली जागा पक्की करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही कर्णधार धोनीने म्हटले.

कोहलीची बॅट तळपेल काय ?
कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर चार कसोटी शतके ठोकली असली तरीही वनडेत तो अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलियात वनडेत त्याच्या फलंदाजीची सरासरी केवळ १५.८३ अशी आहे. ऑस्ट्रेलियात ७ वनडे खेळले आहेत. विराटची बॅट या वेळी तळपेल, अशी कर्णधार धोनीला आशा आहे.

हेही आहे महत्त्वाचे
- यजमान ऑस्ट्रेलियाने २०१५ मध्ये घरच्या मैदानावर एकही वनडे सामना गमावलेला नाही.
- भारताने मागच्या एक वर्षात विदेशात खेळलेल्या १८ सामन्यांपैकी ११ मध्ये विजय मिळवला.
- २००८ पासून ऑस्ट्रेलियात झालेल्या सहा वनडेत भारताला केवळ एकात विजय मिळाला आहे.
- भारताला आयसीसीच्या वनडे क्रमवारीतील दुसरे स्थान कायम ठेवायचे असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध या मालिकेत किमान एक तरी विजय मिळवावा लागेल.
- भारताने तीन फलंदाज शिखर धवन, विराट कोहली आणि धोनी हे आयसीसी वनडे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत टॉप-१० मध्ये आहे, तर ऑस्ट्रेलियाचा केवळ ग्लेन मॅक्सवेल टॉप-१० मध्ये आहे.

खेळपट्टीचा रंग असा
वाकाची खेळपट्टी अपेक्षेप्रमाणे वेगवान गोलंदाजांना मदतगार ठरेल. खेळपट्टीवर बाउन्स असेल.
हवामान : सूर्यप्रकाश असेल. २६ डिग्री सें. इतके तापमान असेल.
संघ खालीलप्रमाणे...
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, उमेश यादव, गुरकिरत सिंग, ऋषी धवन, बरिंदर सरां.

ऑस्ट्रेलिया : स्टिवन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅरोन फिंच, जॉर्ज बेली, शॉन मार्श, मॅथ्यू वेड, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, जेम्स फॉकनर, जोश हेझलवूड, स्कॉट बोलेंड, जोएल पॅरिस, केन रिचर्डसन.