आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs New Zealand, 2nd Test Rohit Sharma Helps India Take A Sizeable Lead

दुसरी कसोटी/तिसरा दिवस : भारताच्या ८ बाद २२७ धावा; ३३९ धावांची आघाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - रोहित शर्माचे (८२) अर्धशतक आणि विकेटकीपर वृद्धिमान साहाच्या(नाबाद ३९) खेळीच्या बळावर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत सुस्थितीत पोहोचली आहे. रोहित शर्मा आणि साहा यांनी टीम इंडिया संकटात सापडली असताना सातव्या विकेटसाठी १०३ धावांची शतकी भागीदारी करून भारताचा डाव सावरला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत भारताने दुसऱ्या डावात ८ बाद २२७ धावा काढल्या होत्या. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर भारताकडे आता एकूण ३३९ धावांची मजबूत आघाडी झाली आहे. साहा ३९ तर त्याच्यासोबत भुवनेश्वर कुमार ८ धावांवर खेळत होते.

रोहित आणि साहा यांनी भारताला ६ बाद १०६ धावा अशा संकटमय स्थितीतून सावरले. रोहितने १३२ चेंडूंचा सामना करताना ८२ धावांची शानदार खेळी केली. यात त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. पहिल्या डावात नाबाद अर्धशतक ठोकणाऱ्या साहाने दुसऱ्या डावात ८७ चेंडूंचा सामना करताना नाबाद ३९ धावा काढल्या. या दोघांच्या फलंदाजीमुळे भारत विजयाच्या स्थितीत पोहोचला आहे. या मैदानावर चौथ्या डावात फलंदाजी करणे सोपे नाही. विदेशी संघाचा या मैदानावरील चौथ्या डावातील सर्वोच्च स्कोअर २३३ धावा आहे. या धावा इंग्लंडने १९६१-६२ मध्ये काढल्या होत्या.

पहिल्या डावात ११२ धावांची आघाडी घेणाऱ्या भारताची दुसऱ्या डावात सुरुवात निराशाजनक झाली. ४३ धावांपर्यंत भारताने ४ विकेट गमावल्या होत्या. मुरली विजय ७, धवन १७, पुजारा ४ तर अजिंक्य रहाणे १ धावा काढून बाद झाले. विजय, पुजारा व रहाणे यांना हेनरीने बाद केले. बोल्टने धवनचा बळी घेतला. यानंतर कोहली व रोहितने पाचव्या विकेटसाठी ४८ धावांची उपयुक्त भागीदारी केली. कोहलीने ६५ चेंडूंत ७ चौकारासह ४५ धावाची खेळी केली. त्याचे अर्धशतक थोडक्याने हुकले. त्याला बोल्टने बाद केले. अश्विन (५) बाद झाल्यानंतर भारताच्या ६ बाद १०६ धावा झाल्या.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने ७ बाद १२८ धावांवरून पुढे खेळताना २०४ धावा काढल्या. जितेन पटेलने ४७ चेंडूंत ४७ धावा काढल्या. त्यामुळे न्यूझीलंडला सन्मानजनक स्कोअर गाठून िदला.

रोहितचे अर्धशतक
रोहितने चहापानाच्या ब्रेकनंतर ८९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४ चौकार व २ षटकार मारले. रोहितला शतकाची संधी होती. त्याचे शतक १८ धावांनी हुकले. ८२ धावांवर असताना सँटनरच्या गोलंदाजीवर ल्यूक रोंचीने त्याचा झेल घेतला. रोहित बाद झाल्यानंतर भारताच्या अष्टपैलू रवींद्र जडेजाने सँटनरला डीप मिडविकेटवर षटकार मारला. मात्र, याच षटकात तो झेलबाद झाला.

शिखर धवन जखमी
सलामीवीर शिखर धवन जखमी झाला. त्याने पहिल्या डावात १ तर दुसऱ्या डावात १७ धावांचे योगदान दिले. त्याला दुसऱ्या डावात बोल्टने बाद केले. ड्रेसिंग रुममध्ये परतल्यानंतर धवनने वेदना होत असल्याची तक्रार केली. त्याला रुग्णालयात एक्सरेसाठी पाठवण्यात आले. त्याच्या अंगठ्याचे एक्सरे यायचे आहे. शिवाय त्याचा खांदा सुद्धा दुखत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...