राजकोट- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा वनडे रविवारी राजकोटच्या मैदानावर खेळवला जाईल. सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर दुपारी १.३० वाजता ही लढत होईल. हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचे प्रयत्न दोन्ही संघांचे असतील. ए.बी. डिव्हिलर्सच्या खेळीच्या बळावर द. आफ्रिकेने पहिला वनडे तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या खेळीच्या बळावर भारताने इंदुरात दुसरा वनडे जिंकला. दोन्ही संघ मालिकेत १-१ ने बरोबरीत आहेत.
टी-२० मालिका २-० ने गमावल्यानंतर आणि पहिल्या वनडेतील पराभवानंतर
टीम इंडिया आणि कर्णधार धोनीवर सर्वत्र टीका सुरू झाली. यानंतर टीम इंडियाने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर कर्णधार धोनीच्या नाबाद ९२ धावांच्या जबरदस्त खेळीच्या बळावर विजय मिळाला. कर्णधार धोनीच्या या प्रदर्शनाशिवाय अजिंक्य रहाणेने (२ अर्धशतके) दोन सामन्यांत फॉर्म दाखवला आहे. रोहित शर्माही लयीत आहे. टीम इंडियाचे उर्वरित फलंदाज फॉर्मात नाहीत. सलामीवीर शिखर धवन व विराट कोहलीची बॅट खूप दिवसांपासून शांत आहे. गत सामन्यात धोनी खेळला म्हणून ठीक झाले; अन्यथा भारताला २०० धावांचा टप्पासुद्धा गाठणे कठीण झाले होते.
भारतीय गोलंदाजीत मात्र सुधारणा दिसली आहे. फॉर्मशी संघर्ष करणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वरने गत सामन्यात ३ बळ घेतले. सुमार कामगिरीमुळे चर्चेत आलेल्या अक्षर पटेलनेही ३.९० च्या चांगल्या इकॉनॉमी रेटने १० षटकांत ३९ धावांत ३ गडी बाद केले होते.
धावांचा पाऊस पडणार : या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडेल. दव या वेळी मोठे कारण ठरणार नाही, असे सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पिच क्युरेटर रसिक मकवाना यांनी सांगितले.
भारताची मजबूत बाजू
१.रोहित शर्मा (१५३), धोनी (१२३) आणि अजिंक्य रहाणे (१११) हे तिघे लयीत आहेत.
२.भुवनेश्वर कुमारने इंदूर सामन्यात शानदार पुनरागमन करताना ३ विकेट घेतल्या.
३.फिरकीपटू अक्षर पटेल, हरभजनसिंग मॅच विजेती कामगिरी करू शकतात.
भारताची दुबळी बाजू
१. गत दोन वनडेत कोहलीने २३ धावा तर धवनने एकूण ४६ धावांचे योगदान दिले.
२. सुरेश रैनाने मागच्या दोन सामन्यांत केवळ ३ धावा काढल्या आहेत. फॉर्मात नाही.
आफ्रिकेची मजबूत बाजू
१.डिव्हिलर्स (१२३), फॉप डुप्लेसिस (११३) आणि जे.पी. डुमिनी चांगल्या लयीत आहेत.
२.फिरकीपटू इम्रान ताहिर, स्पीडस्टार डेल स्टेन मुख्य शस्त्र आहेत. स्टेनने इंदुरात ३ गडी बाद केले होते.
३.फरहान बेहर्दिन, कॅसिगो रबाडा तळाला चांगली फलंदाजी करण्यास सक्षम आहेत.
द. आफ्रिकेची दुबळी बाजू :
१.हाशिम आमला, क्विंटन डी. कॉकची बॅट शांत. फॉर्मात नाहीत.
२.डेव्हिड मिलरकडून अपेक्षेनुरूप कामगिरी झालेली नाही.
३.मोर्ने मोर्कल भारतीय खेळपट्ट्यांवर कमाल करू शकलेला नाही.
>आम्ही सामने जिंकत नव्हतो तेव्हा ड्रेसिंग रूममध्ये सामान्य वातावरण होते. इंदुरात धोनीच्या कॅप्टन इनिंगमुळे संघात सकारात्मक ऊर्जा आली आहे. आमच्या संपूर्ण टीममध्ये त्या सामन्यानंतर आत्मविश्वास भरला आहे.
- भुवनेश्वर कुमार.
राजकोटमध्ये इंग्लंड विजयी
सौराष्ट्र क्रिकेट मैदानावर आतापर्यंत एकच सामना झाला आहे. येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात २०१३ मध्ये सामना झाला. इंग्लंडने ही लढत ९ धावांनी जिंकली होती.
दोन्ही संभाव्य संघ असे
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, हरभजनसिंग, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहित शर्मा, अमित मिश्रा.
द. आफ्रिका: डिव्हिलर्स (कर्णधार), हाशिम आमला, क्विंटन डी.कॉक, डुप्लेसिस, डुमिनी, डेव्हिड मिलर, फरहान बेहर्दिन, क्रिस मोरिस, कॅगिसो रबाडा, डेल स्टेन, मोर्ने मोर्कल, इम्रान ताहिर.