आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय जखमी; राहुलला संधी, उद्यापासून भारत-श्रीलंकेत पहिली कसोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाले - भारत आणि श्रीलंकेदरम्यान १२ ऑगस्टपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होत आहे. या कसोटीत सलामीवीर मुरली विजय खेळू शकणार नाही. मुरली विजयच्या पायचे स्नायू दुखावले असून पहिल्या कसोटीपूर्वी फिट होण्याची शक्यता नाही. टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांनी ही माहिती दिली.
३२ कसोटींत ६ शतकांसह २३३८ धावा काढणारा मुरली विजय वर्ल्डकपपूर्वी ऑस्ट्रेलियात चांगलाच यशस्वी ठरला होता. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताकडून विराट कोहलीनंतर (६९२ धावा) मुरली विजय (४८२ धावा) सर्वाधिक यशस्वी फलंदाज होता. पावसाच्या मोसमात खेळाडू मैदानावर पाय घसरून पडण्याची शक्यता असते. अशात आम्ही मुरली विजयसाठी जोखीम घेऊ शकत नाही. मुरली विजय गाले कसोटीतून बाहेर होणे हा मोठा धक्का असल्याचे शास्त्री म्हणाले.

पराभवाला घाबरत नाही
१९९३ नंतर भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा सरासरी २५ ते २६ वय असलेल्या भारतीय तरुण संघापुढे मोठे आव्हान उभे आहे. मात्र, तरुण संघ असला तरीही हा संघ सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळणार आहे. सामना अनिर्णीत राखण्यापेक्षा जिंकण्यासाठी खेळणार आणि पराभवाला न घाबरणारा असल्याचे आत्मविश्वासपूर्ण उद््गार शास्त्री यांनी काढले. खेळपट्टी पाहून ४ गोलंदाज खेळवायचे की ५, याबाबत मंगळवारी दुपारीच निर्णय घेऊ, असे सांगत शास्त्री यांनी आपल्यासमोरील अन्य आव्हानांची माहितीही पत्रकारांना दिली.

अश्विन की भज्जी ?
मंगळवारी दुपारी खेळपट्टी पाहूनच अंतिम संघ निवडणार. खेळपट्टी टणक आहे. त्यात ओलसरपणा किती आहे, गवत किती आहे ते पाहून गोलंदाज किती व कोणते खेळवायचे ते ठरवणार. हरभजन व अश्विन हे दोन वेगळ्या शैलीचे ऑफस्पिनर आहेत. हरभजन ओपन चेस्टेड, टॉप स्पिन गोलंदाजी करणारा, तर अश्विन पारंपरिक, क्लासिकल ऑफस्पिनर आहे. त्यामुळे दोघेही एकत्र खेळणे वावगे नाही, असे शास्त्री म्हणाले.

भारताला क्रमवारीत प्रगतीची संधी
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेला भारताविरुद्ध मालिका २-१ अशी जिंकून भारताचा पाचवा क्रमांक हस्तगत करण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. मात्र भारताने श्रीलंकेविरुद्ध मालिका ३-० अशी जिंकली तर १०४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर उडी मारता येईल. मालिका २-१ अशी जिंकल्यास मात्र भारताला चौथ्या क्रमांकावर राहण्याचे समाधान मिळेल. लंकेने ३-० ने विजय मिळवला तर ते चौथ्या स्थानी येतील.

वैयक्तिक क्रमवारीत उभय संघांतर्फे ८७४ गुणांसह सर्वोत्तम सातव्या क्रमांकावर असलेला कुमार संगकारा आपली अखेरची कसोटी मालिका खेळत आहे. अँजेलो मॅथ्युज १४ व्या क्रमांकावर आहे. भारताकडून कोहली १० व्या क्रमांकावर आहे. विजय (२१), रहाणे (२२), पुजारा (२५) स्थानी आहे.

राहुलला मिळणार संधी
टीम इंडियाच्या सलामीची मदार आता शिखर धवन आणि लोकेश राहुल यांच्यावर असेल. राहुलने सिडनी कसोटीत ११० धावांची खेळी करून आपला दावा मजबूत केला होता. राहुलने २ कसोटीत ३२.५० च्या सरासरीने १३० धावा काढल्या. श्रीलंका अध्यक्षीय संघाविरुद्ध २३ वर्षीय युवा सलामीवीर के. राहुलने ४३ आणि ४७ धावांचे योगदान दिले.

रवी शास्त्री यांनी दिलेली माहिती अशी
आम्ही सकारात्मक खेळणार. जिंकण्यासाठीच खेळणार. अनिर्णीत राखण्याचा प्रयत्न करणार नाही. भले त्या प्रयत्नात हरलो तरी बेहत्तर, पण सकारात्मक खेळणार.

५ गोलंदाज खेळवण्याची कल्पना यासाठी मांडली की विजयी होण्यासाठी २० विकेट्स काढाव्या लागतात. त्यामुळे जिंकण्यासाठी ५ काय, ६ गोलंदाजही खेळवू.
खेळपट्टीवर पहिल्याच दिवशी चेंडू वळणार असेल तर ५ गोलंदाज खेळवण्यात अर्थ नसतो. कारण पाचव्या गोलंदाजाची गरज भासत नाही. त्याच्या वाट्याला कमी गोलंदाजी येते. अशा खेळपट्टीवर फलंदाजांनी धावा काढणेही महत्त्वाचे असते.

आम्ही ८० च्या दशकात जिंकलो होतो. मात्र, त्यानंतर श्रीलंकेकडे महेला जयवर्धने, संगकारा असे रथी-महारथी फलंदाज निर्माण झाले. त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे मुरलीधरनसारखा प्रतिस्पर्ध्याला एकटा लोळवणारा गोलंदाज झाला. आता मात्र तशी परिस्थिती नाही. मात्र, होम कंडिशन्सचा फायदा त्यांना निश्चितच होईल.
जुलै, ऑगस्टमध्ये येथे पाऊस असतोच. त्यामुळे ४ दिवसांचीच कसोटी आहे, असे समजून योजना आखली आहे.

विराट कोहलीच्या फॉर्मची काळजी करीत नाही. कारण त्याने ऑस्ट्रेलियात केलेली फलंदाजी मी पाहिली आहे. चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्याची त्याची क्षमता आहे.

५ गोलंदाज खेळवल्यामुळे एक फलंदाज कमी होतो. गोलंदाजांना मोठ्या धावसंख्येचे पाठबळ देण्यासाठी फलंदाजांना एकाची उणीव भरून काढावी लागते.