आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आता 25 व्या विजयासाठी खेळणार भारत !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विराट कोहलीच्या जादुई नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग सहा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाची नजर ‘सिल्व्हर ज्युबिली’ विजयावर असेल. भारत-ऑस्ट्रेलिया चार सामन्यांच्या मालिकेला येत्या २३ फेब्रुवारीपासून पुण्यात सुरुवात होत आहे. जागतिक क्रमवारीतील नंबर वन टीम भारत आणि नंबर दोनची टीम ऑस्ट्रेलिया या दोघांत होणारी मालिका म्हणजे वर्चस्वाची लढाई असेल. कसोटीत अजूनही ‘दादा’ काेण आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील.  
आतापर्यंत ९० कसोटींत भारताचे २४ विजय   
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १९४७ पासून ९० कसोटी सामने झाले आहेत. या ९० पैकी भारताने २४ मध्ये विजय मिळवला अाहे. यापैकी ४० सामने भारताने गमावले असून एक सामना टाय झाला, तर २५ सामने ड्रॉ झाले. आगामी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हरऑल २५ वा विजय मिळवण्याच्या लक्ष्याने टीम इंडिया खेळेल. कर्णधार विराट कोहलीने या मालिकेत भारताला आणखी एक विजय मिळवून दिला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे २५ विजय पूर्ण होतील.  
 
विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटीत २०८ धावांची द्विशतकी खेळी केली होती. बांगलादेशविरुद्ध विजयानंतर विराट कोहली भारताचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी तिसऱ्या  क्रमांकाचा कर्णधार ठरला आहे. कोहलीच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत २३ कसोटीत १५ विजय मिळवले आहेत. त्याने भारताकडून नेतृत्व करताना सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत मो.अझरुद्दीनला मागे टाकले. महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली अजून त्याच्या पुढे आहेत. या दोघांच्या नावे भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक अनुक्रमे २७ आणि २१ विजय आहेत.  

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेला १९४७-४८ मध्ये सुरुवात झाली. तेव्हा ५ सामन्यांची मालिका भारताने ४-० ने गमावली. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी मालिका विजयासाठी १९७९-८० पर्यंत वाट बघावी लागली. त्या वेळी भारताने ऑस्ट्रेलियाला भारतीय भूमीवर ६ सामन्यांच्या मालिकेत २-० ने हरवले होते.
 
मागच्या दौऱ्यात सपाटून मार  
ऑस्ट्रेलियाने मागचा भारत दौरा २०१२-१३ मध्ये केला होता. त्या दौऱ्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ४-० ने धुतले. या वेळीसुद्धा भारतीय संघाचे ऑस्ट्रेलियाला यंदाही हरवण्याचे मनसुबे आहेत. कोहली ब्रिगेड सध्या तुफान फॉर्मात आहे.
 
ऑस्ट्रेलियाचा कसून सराव
आगामी बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेसाठी पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने बुधवार मुंबईत कसून सराव केला. ऑस्ट्रेलियाने सराव सामन्यासाठी ब्रेबॉर्न स्टेडियमला निवडले. स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर यांनी फलंदाजीचा सराव केला. त्यांनी अधिकाधिक फिरकी गोलंदाजी खेळून काढली. अॅश्टन एगर, जोश हेझलवूड, नॅथन लॉयन, मिशेल स्टार्क यांनी गोलंदाजी केली.  
 
ऑस्ट्रेलिया-भारत मालिका कार्यक्रम 
१७ ते १९ फेब्रुवारी     : ऑस्ट्रेलिया वि. भारत अ,  
२३ ते २७ फेब्रुवारी     :  पहिली कसोटी, पुणे  
०४ ते ०८ मार्च     :  दुसरी कसोटी, बंगळुरू  
१६ ते २० मार्च     :  तिसरी कसोटी, रांची  
२५ ते २९ मार्च     :  चौथी कसोटी, धर्मशाला.
 
बातम्या आणखी आहेत...