आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला संघाचा मालिका विजय,पाचव्या वनडेत न्यूझीलंडवर ९ विकेटने मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनानंतर सलामीवीर कामिनीच्या नाबाद ६२ धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने मालिकेतील पाचव्या वनडेत न्यूझीलंडवर ९ विकेटने विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिला संघाने पाच सामन्यांची मालिका ३-२ ने जिंकली. भारतीय महिला संघाने सुरुवातीला न्यूझीलंडला ४१ षटकांत ११८ धावांत गुंडाळले. यानंतर २७.२ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात १२१ धावा काढून ९ विकेटने विजय मिळवला.

धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर मानधना अवघ्या १३ धावा काढून बाद झाली. यानंतर सलामीवीर कामिनी आणि तिस-या क्रमांकावर फलंदाजीस आलेली दीप्ती शर्मा यांनी नाबाद राहून भारताला विजय मिळवून दिला. कामिनीने ७८ चेंडूंचा सामना करताना १३ चौकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावा काढल्या.

दीप्ती शर्माने तुलनेने संथ फलंदाजी केली. मात्र, तिने विकेट गमावली नाही. दीप्तीने ७८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावांचे योगदान दिले. दिप्ती शर्माने अष्टपैलू कामगिरी केली. या दोघींच्या शानदार फलंदाजीने भारताला २८ व्या षटकात विजय मिळाला. दोन्ही संघांनी मालिकेत प्रत्येकी दोन सामने जिंकल्याने ही लढत निर्णायक ठरणार होती. झालेही तसेच.

दमदार गोलंदाजी
झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड आणि दीप्ती शर्मा यांच्या प्रत्येकी २ विकेटच्या बळावर न्यूझीलंड महिला संघाला भारताने अवघ्या ११८ धावांत गुंडाळले. न्यूझीलंडकडून सलामीवीर आणि कर्णधार बॅट्स हिने सर्वाधिक ४२ धावांचे योगदान दिले. डिव्हाइनने १८ तर पीटरसनने २२ धावा काढल्या. या तिघींशिवाय इतर फलंदाजांना तर दोनअंकी धावासुद्धा काढता आल्या नाही. इतरांनी फक्त हजेरी लावण्याचे काम केले. भारताकडून झुलनने १७ धावांत २, राजेश्वरीने १५ धावांत २, दीप्तीने २२ धावांत २ तर एकता आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : सर्वबाद ११८. (बॅट्स ४२, २/१७ झुलन, २/१५ राजेश्वरी, २/२२ दीप्ती). भारत : १ बाद १२१.(कामिनी नाबाद ६२, दीप्ती शर्मा नाबाद ४४).
छायाचित्र: विजयानंतर ट्रॉफीसह भारतीय महिला संघ.