आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाचा कसून सराव, आफ्रिकेला तोंड देण्यासाठी खेळाडुंनी गाळला घाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली - फ्रीडम मालिकेत टी-२० आणि वनडे सिरीज गमावल्यानंतर टीम इंडिया कसेाटी जिंकण्यासाठी जोरदार मेहनत घेत आहे. कोहली ब्रिगेडने मंगळवारी चंदिगडच्या आय.एस. बिंद्रा स्टेडियमवर जवळपास पाच तास कसून सराव केला. दक्षिण आफ्रिकेनेही तीन तास सराव केला. टीम इंडियाने मैदानावर येताच वेळ न दवडता सरावाला सुरुवात केली. सुरुवातीला झेल घेण्याचा सराव आणि नंतर नेटवर फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव केला. भारत आणि द. आफ्रिका यांच्यात ५ नोव्हेंबरपासून पहिली कसोटी मोहालीत होणार आहे.

सरावाच्या वेळी टीम डायरेक्टर रवी शास्त्रीसुद्धा उपस्थित होते. शास्री यांनी सर्वच खेळाडूंना फलंदाज आणि गोलंदाजीचा सराव करण्यास सांगितले. संघात फुलटाइम गोलंदाज असो वा पार्टटाइम गोलंदाज, सर्वांनी नेटवर गोलंदाजीचा सराव केला. रोहित शर्मा आणि मुरली विजय यांनीसुद्धा गोलंदाजी आणि फलंदाजीचा कसून सराव केला.

कोहलीने केला सर्वाधिक फलंदाजीचा सराव
भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीला हे चांगले ठाऊक आहे की, भारताला हा सामना जिंकायचा असेल तर त्याला धावा काढाव्या लागतील. यावर अंमलबजावणी करण्यासाठी कोहलीने नेटवर सर्वाधिक वेळ फलंदाजी केली. याशिवाय रवी शास्त्री आणि फलंदाज कोच संजय बांगर यांचे लक्ष चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मुरली विजय यांच्यावरही होते. आफ्रिकन आक्रमणाचा सामना करण्यासाठी टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांनी खेळाडूंना बऱ्याच टिप्स दिल्या. त्याचा निश्चितपणे फायदा यजमान टीमला कसाेटी मालिकेत हाेईल.

अश्विन पूर्णपणे फिट
रविचंद्रन अश्विन आपल्यासाठी सर्वाधिक धोकादायक गोलंदाज असल्याचे आफ्रिकेने आधीच स्पष्ट केले आहे. यामुळे स्वत:ला सिद्ध करण्याची जबाबदारी आता अश्विनवरही आहे. मंगळवारी अश्विनने नेटवर जोरदार सराव केला. त्याच्या गोलंदाजीवरून तो पूर्णपणे फिट असल्याचे दिसत होते. नंतर त्याने फलंदाजीचाही सराव केला. पहिल्या कसोटीत त्याचा सहभाग जवळपास निश्चित आहे. या सामन्यात यजमान भारतीय संघाची मदार फिरकीवर असेल. यामुळे अश्विनसोबत जडेजानेही गोलंदाजी केली. रोहित, मुरली विजयनेही गोलंदाजीत सरावादरम्यान हात आजमावले.

भारतीय संघ दबावात नाही : रवी शास्त्री
मोहाली | मुंबई वनडेत पिच क्युरेटर सुधीर नाईक यांच्याशी हुज्जत घालणारे रवी शास्त्री मोहालीत कूल दिसले. भारतीय संघ उत्साहित आहे. नव्या कर्णधारासह नव्या मैदानावर सुरुवात करण्यास आम्ही सज्ज आहोत. आमच्या खेळाडूंवर कसलाही दबाव नाही, असे शास्त्री यांनी म्हटले. मुंबईतील वादाबाबत विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. जे काही झाले तो इतिहास आहे. तो विषय संपला आहे. मोहालीची पिच झाकलेली असल्याने मी पाहू शकलो नाही, असेही शास्त्री यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेत रवी शास्त्री यांनी मांडलेले मुद्दे असे
>अश्विन पूर्णपणे सावरला आहे. तो फिट आहे. त्याने नेटवर जोरदार सराव केला. आम्हाला त्याच्याकडून खास आशा आहेत.
>कोहली युवा आणि उत्साहाने भरलेला आहे. संघाचे नेतृत्व सांभाळून त्याला बराच वेळ झाला आहे. जगातल्या नंबर वन टीमविरुद्ध नेतृत्व करताना त्याला अनुभव मिळेल.
> आपल्या गोलंदाजीच्या ताकदीनुसार पिच तयार करण्याचा अधिकार आम्हाला आहे. यात काहीच चुकीचे नाही.
> गरज पडल्यास आम्ही पाच गोलंदाजांसह मोहालीत खेळू शकतो.

हसीकडून आफ्रिकेला टिप्स
दोन दिवस नेटवर कसून सराव करणाऱ्या द. आफ्रिकन संघाला अॉस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकेल हसीने चांगलीच मदत केली. हसीने त्यांना फलंदाजीच्या टिप्स दिल्या. खेळपट्टीवर अधिकाधिक वेळ टिकून खेळण्याचा सल्ला देताना भारतीय खेळपट्टीवर विकेट कशा मिळवायच्या, याच्या टिप्सही त्याने आफ्रिकन गोलंदाजांना दिल्या. भारतात चांगली कामगिरी करणाऱ्या विदेशी फलंदाजांत मायकेल हसी एक आहे. आफ्रिकेला हसीची मदत फायद्याची ठरत आहे. हसी आफ्रिकेसोबत असणे हे आम्हाला लाभदायक आहे, असे आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गरने म्हटले.

सेहवागची उणीव
आताची टीम इंडिया खूप प्रतिभावान आहे. मात्र, भारताकडे अाता वीरेंद्र सेहवागसारखा एकही आक्रमक फलंदाज नाही.
डेल स्टेन