नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात येत्या २ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या क्रिकेट मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. भारतीय संघाची घोषणा येत्या १५ सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेविरुद्ध मिळालेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर भारतीय संघ दोन ऑक्टोबरपासून द. आफ्रिकेविरुद्ध तीन टी-२०, पाच वनडे आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेसाठी १५ सप्टेंबर रोजी दिल्लीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीची बैठक आहे. या बैठकीत संघाची घोषणा शक्य आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाने खेळाडूंना एका आठवड्यात निवड समितीच्या बैठकीपूर्वी आपले फिटनेस सर्टिफिकेट जमा करण्यास सांगितले आहे. भारत आणि द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहली करेल, तर टी-२० आणि वनडे संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी असेल.