रांची - दीप्ती शर्माच्या (२३ धावांत ४ विकेट) जबरदस्त गोलंदाजीनंतर कर्णधार मिताली राजच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारतीय महिला संघाने श्रीलंकेला ६ विकेटने पराभूत केले. या विजयासह भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय महिला संघाने श्रीलंकेला ५० षटकांत ९ बाद १७८ धावांवर रोखले. यानंतर भारताने ४३.१ षटकांत ४ बाद १७९ धावा काढून विजय मिळवला.
भारताकडून कर्णधार मिताली राजने नाबाद अर्धशतक ठोकले. मितालीने ५३ धावांचे योगदान दिले. भारताची सलामीची जोडी स्मृती मानधना (४६) आणि कामिनी (२६) यांनी ६७ धावांची अर्धशतकी सलामी दिली. तत्पूर्वी, श्रीलंकेने सुरंगिकाच्या ४३ आणि विराकोड्डीच्या ३७ धावांच्या खेळीच्या बळावर दीडशेचा टप्पा ओलांडला. भारताकडून दीप्ती शर्माने २३ धावांत ४ विकेट घेतल्या.