आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Youth Team Champion, Sarfaraj Of Half Fifty

सरफराजचे अर्धशतक; भारतीय युवा टीम विजेता, बांगलादेशवर ७ विकेटने मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - कोच राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या १९ वर्षांखालील युवा संघाने तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये बांगलादेशचा ७ विकेटने पराभूत करून विजेतेपद पटकावले. युवा खेळाडू सरफराज खानच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर भारताने फायनलमध्ये अवघ्या १३.३ षटकांत विजय मिळवला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ३६.५ षटकांत सर्वबाद ११६ धावा काढल्या. भारताने हे लक्ष्य ३ विकेटच्या मोबदल्यात सहजपणे गाठले.

विजयासाठी आवश्यक असलेल्या ११८ धावांचा पाठलाग करताना भारतीय युवा संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर वाॅशिंग्टन सुंदर १२ धावा काढून बाद झाला. त्याला सईद सरकाने त्रिफळाचीत केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या अमनदीप खरेला तर भोपळाही फोडता आला नाही. त्याला शून्यावर मेहंदी हसन मिराजने बाद केले. भारतीय संघ ५.१ षटकांत २ बाद ३८ धावा असा अडचणीत होता. सलामीवीर ऋषभ पंतने १६ चेंडूंत १ षटकार, ४ चौकार ठोकून २६ धावा ठोकल्या. भारताच्या ४२ धावा झाल्या असताना ऋषभ बाद झाला. यानंतर आलेल्या सरफराज खानने कर्णधार रिकी भुईसोबत भारताला सहज विजय मिळवून दिला. रिकी भुईने नाबाद २०, तर सरफराज खानने नाबाद ५९ धावा काढल्या.

गोलंदाज तळपले : तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाने बांगलादेशला ३६.५ षटकांत अवघ्या ११६ धावांत गुंडाळले. पाहुण्या बांगलादेशकडून नजमूल हुसेन शांतोने सर्वाधिक ४५ धावांचे योगदान दिले. जोयराज शेखने २८ धावा, तर यष्टिरक्षक फलंदाज जाकेर अलीने २४ धावांचे योगदान दिले. या तिघांना वगळात उर्वरित फलंदाजांना दोनअंकी धावसंख्यासुद्धा गाठता आली नाही. त्यांचे सात फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. भारताकडून मयंक डगरने ३२ धावांत ३ गडी बाद केले. शुभम मावीने २१ धावांत २, तर महिपाल लोमरोरने ११ धावांत २ गडी बाद केले. आवेश खान आणि अहेमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारतीय फिरकीच्या माऱ्यापुढे बांगलादेशचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले.
सरफराजचे अर्धशतक
युवा खेळाडू सरफराज खानने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन २७ चेंडूंत नाबाद ५९ धावा ठोकल्या. त्याने या खेळीत ३ षटकार आणि ९ चौकार खेचून बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. त्याने २१८.५१ च्या स्ट्राइक रेटने ही फलंदाजी केली.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश : ३६.५ षटकांत सर्वबाद ११६. (नजमूल ४५). भारत : १३.३ षटकांत ३ बाद ११७ धावा. (सरफराज खान नाबाद ५९, ऋषभ पंत २६, रिकी भुई नाबाद २०).