आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India's First Innings Runs 215, All Out In 78.2 Overs

दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या ९ षटकांत २ बाद ११ धावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवरील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फिरकीपटूंनी पहिल्या डावात दिवसअखेर द. आफ्रिकेला अर्ध्या तासाच्या खेळात दोन हादरे देत फास आवळले. सोबतच त्यांच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्याला जशास तसे उत्तर देत भारताची बाजू कसोटीत भक्कम केली. पहिल्या दिवसाचा खेळ उभय संघातील गोलंदाजांनी गाजवला, विशेषत: फिरकीपटूंनी. दिवसभरात एकूण १२ विकेट पडल्या.
टीम इंडियाचा पहिला डाव २१५ धावांवर संपुष्टात आल्यानंतर द. आफ्रिकेने पहिल्या दिवसअखेर ९ षटकांत २ बाद ११ धावा फलकावर लावल्या. एस. वॅन जायल व इम्रान ताहिर या दोन्ही तळाकडील फलंदाजांकडून डावाची सुरुवात करण्याची पाहुण्यांची रणनीती भारतीय फिरकीपटूंनी (अश्विन व जडेजा प्रत्येकी एक बळी) ९ षटकांत उधळून लावली. त्यामुळे खुद्द कर्णधार हाशिम आमलाला फलंदाजीस येऊन विकेट्स वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी एल्गर ७ आणि आमला खातेही न उघडता खेळत होते.
भारताची चांगली सुरुवात
तत्पूर्वी, आव्हानात्मक खेळपट्टीवर भारताने पहिल्या डावाची सुरुवात समाधानकारक केली. पहिल्या तासात एकही फलंदाज न गमावता ५० धावा फलकावर लावल्या. ही जोडी जलपानानंतर फिरकीपटू एल्गरने फोडली. फॉर्म मिळवण्यासाठी संघर्ष करणारा शिखर धवन वेगाने धावा करण्याच्या नादात गोलंदाज डीन एल्गरच्या हाती झेल देऊन १२ धावांवर परतला. त्यानंतर एल्गरच्या जागी बदलून आलेला वेगवान मोर्ने मोर्केलने दुसऱ्या स्पेलमध्ये इनफॉर्म फलंदाज मुरली विजयला पायचीत करून भारताला हादरा दिला. त्या वेळी विजयने तीन चौकार व एका उत्तुंग षटकारासह ४० धावा केल्या होत्या. सकाळी भारताने खेळपट्टी रंग पाहता ईशांत शर्माच्या रूपाने एकाच वेगवान गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देत रोहित शर्माचाही संघात समावेश केला.
भारताच्या मधल्या फळीने गुडघे टेकवले
जेवणाच्या ब्रेकच्या वेळी भारताने २७ षटकांत ८५ धावा केल्या होत्या. कर्णधार कोहली ११ अन् पुजारा १८ धावांवर खेळत होते. उपाहारानंतर लगेच चेतेश्वर पुजारा २१ धावा करून परत फिरला. फिरकीपटू सायमन हार्मरने त्याला पायचीत केले. त्यानंतर आलेल्या रहाणेलाही (१३) सूर गवसला नाही. मोर्केलने बेमालूम इनकटरद्वारे त्याची उजवी यष्टीच उखडून त्याला त्रिफळाचीत केले. कर्णधार विराट २२ धावांवर असताना मोर्केलच्या आऊटस्विंगचा तो बळी ठरला. रोहित शर्माही केवळ दोन धावा करून बाद झाला. तो संधीचा फायदा उचलू शकला नाही.
जडेजा, साहामुळे भारत दोनशेच्या पुढे पोहोचला
चहापानाच्या वेळी भारताने ५५ षटकांत ६ फलंदाज गमावून १४९ धावा केल्या होत्या. तळाचे फलंदाज रवींद्र जडेजाच्या ३२ आणि यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या ३४ धावांमुळे भारताला दोनशेचा टप्पा ओलांडता आला. दोघांनी ४७ धावांची उपयुक्त भागीदारी केली. आर. अश्विनने नवव्या क्रमांकावर येऊन १५ धावा जोडल्या. मिश्राने ३ धावा काढल्या.
ऑफस्पिनर हार्मरच्या ४, तर मोर्केलच्या ३ विकेट
द. आफ्रिकेकडून डेल स्टेनच्या अनुपस्थितीत ऑफ ब्रेक सायमर हार्मरने ७८ धावांत ४, तर द्रुतगती गोलंदाज मोर्ने मोर्केलने ३५ धावांत तीन बळी घेतले. मोर्केल दुसऱ्या व तिसऱ्या स्पेलमध्ये चांगलाच यशस्वी ठरला. त्यामुळे आफ्रिकेला डेल स्टेनची उणीव जाणवली नाही. शिवाय रबाडा, एल्गर आणि इम्रान ताहिरने प्रत्येकी एक फलंदाज टिपला.
खेळपट्टी आव्हानात्मक : बांगर
फलंदाजांसाठी व्हीसीए जामठा स्टेडियमवरील खेळपट्टी ही आव्हानात्मक आहे. अशा स्थितीत भारतीय संघाने उभारलेली धावसंख्या समाधानकारक म्हणावी लागेल, असे मत टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, सामन्‍यातील फोटो..