कानपूर- अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने गुजरात लायन्सवर २ विकेटने विजय मिळवला. इंडियन प्रीमियर लीग-१० मध्ये बुधवारी गुजरात लायन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १९५ धावा काढल्या. दिल्लीने हे लक्ष्य श्रेयस अय्यरच्या तुफानी ९६ धावांच्या खेळीच्या बळावर १९.४ षटकांत ८ विकेटच्या मोबदल्यात गाठले. अखेरच्या षटकात दिल्लीला ६ चेंडूंत ९ धावा हव्या होत्या. याच षटकात श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर अमित मिश्राने थम्पीला सलग दोन चेंडूवर दोन चौकार ठोकून दिल्लीला थरारक विजय मिळवून दिला.
धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. दिल्लीचे दोन युवा तडफदार फलंदाज संजू सॅमसन (१०) आणि ऋषभ पंत (४) दोन षटकांच्या आतच तंबूत परतले. त्या वेळी दिल्लीची टीम २ बाद १५ धावा अशी संकटात होती. यानंतर करुण नायरने १५ चेंडूंत १ षटकार, ५ चौकारांसह ३० धावा ठोकल्या. मात्र, मधल्या फळीने निराशा केली. मधल्या फळीत मार्लोन सॅम्युअल्स (१) आणि कोरी अँडरसन (६) दोघेही धावबाद झाले. एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुसऱ्या टोकाने श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकले.
श्रेयसची एकाकी झुंज : एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना श्रेयसने अवघ्या ५७ चेंडूंत २ षटकार, १५ चौकारांसह ९६ धावांची खेळी केली. त्याचे शतक ४ धावांनी हुकले. पॅट कमिन्सने १३ चेंडूंत २४ धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी, अॅरोन फिंच (६९) आणि दिनेश कार्तिक (४०) यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या ९२ धावांच्या खेळीच्या बळावर गुजरात लायन्सने दिल्लीविरुद्ध ग्रीन पार्क मैदानावर ५ बाद १९५ धावा काढल्या. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय घेतला होता. गुजरातने ५६ धावांत ३ विकेट गमावल्या. यानंतर कार्तिक आणि फिंच यांनी ९.४ षटकांत ९२ धावांची भागीदारी केली. फिंचने ३९ चेंडूंत ४ षटकार, ६ चौकारांसह ६९ धावा ठोकल्या. गुजरातचा सलामीवीर ईशान किशनने २५ चेंडूंत १ षटकार, ५ चौकारांच्या साह्याने ३४ धावा काढल्या. फिंचने रवींद्र जडेजासोबत पाचव्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली. जडेजाने नाबाद १३ आणि जेम्स फाॅकनरने नाबाद १४ धावा काढल्या. दिल्लीकडून मो. शमीने ३६ धावांत १ विकेट, पॅट कमिन्सने ३८ धावांत १ विकेट, अमित मिश्राने २७ धावांत १ विकेट घेतली