आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनी होणार \'पुणे\'कर ? पुणे टीमला मिळणार खेळाडू निवडण्याची पहिली संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दोन नव्या टीम पुणे आणि राजकोट येत्या १५ डिसेंबर रोजी प्लेअर्स ड्राफ्टमध्ये आपापल्या टीमचे खेळाडू निवडतील. या बोली प्रक्रियेत सर्वांच्या नजरा दोन खास खेळाडूंवर असतील. हे दोन खास खेळाडू म्हणजे चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि दुसरा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारा सुरेश रैना. बोली प्रक्रियेच्या वेळी संजीव गोयंका यांची न्यू रायझिंग अर्थात पुणे संघाला पहिला खेळाडू निवडण्याची संधी असेल. धोनी की रैना ? या दोघांपैकी कोणाला निवडावे, असा प्रश्न पुण्यापुढे असेल. मात्र, पुणे टीम धोनीला प्राधान्य देऊन निवडेल, अशी शक्यता आहे.

दमदार महेंद्रसिंग धोनी
धोनीने आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून ते मागच्या आयपीएलपर्यंत चेन्नईचे नेतृत्व केले आहे. तो चेन्नईचा खास चेहरा आहे. महेंद्रसिंग धोनीने २००८ पासून २०१५ पर्यंत चेन्नईकडून खेळताना १२९ सामन्यांत नेतृत्व केले आहे. हा विक्रम आहे. या काळात त्याने १३९.२७ च्या स्ट्राइक रेटने २९८६ धावा काढल्या. यात त्याने १५ अर्धशतके ठोकली. धोनीने आयपीएलमध्ये ५६ झेल घेतले असून २३ यष्टिचीतही त्याच्या नावे आहे.

यशस्वी कर्णधार धोनी
माहीच्या नेतृत्वात चेन्नईने २०१०, २०११ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले. सुरुवातीपासून चेन्नईचा रेकॉर्ड पाहिला तर २००८, २०१२, २०१३, २०१५ मध्ये चेन्नई उपविजेता ठरली. २००९ मध्ये चेन्नई सेमीफायनलमध्ये हरली. इतकेच नव्हे तर चेन्नईने २०१०, २०१४ मध्ये धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन्स टी-२० चा किताबही जिंकला.

सुरेश रैनातही आहे दम
धोनीप्रमाणे रैनासुद्धा चेन्नईचा सुरुवातीपासून सदस्य आहे. रैनाने १३९.७९ च्या स्ट्राइक रेटने १३२ सामन्यांत १३९.७९ धावा काढल्या आहेत. आयपीएलमध्ये धावांबाबत रैना सर्वात पुढे आहे. यात रैनाने १ शतक आणि २५ अर्धशतके झळकावली. रैना उत्तम क्षेत्ररक्षक आहे. त्याने आयपीएलमध्ये ७४ झेल घेताना २४ बळीही मिळवले आहेत. रैना आक्रमक डावखुरा फलंदाज असून कमी चेंडूंत वेगाने धावा काढण्यात तो तरबेज आहे. तो उत्तम टी-२० चा खेळाडू आहे.
धोनी, रैनापैकी कोण ?
खेळाडू निवडण्याची पहिली संधी पुणे टीमला असेल. मिळालेल्या माहितीनुसार संजीव गोयंका धोनीला प्राधान्य देऊ शकतात. असे असले तरीही काही गोष्टी धोनीच्या बाजूने नाहीत. धोनीने या जुलैमध्ये वयाची ३४ वर्षे पूर्ण केली. वाढते वय त्याला अडसर ठरू शकते. शिवाय गेल्या काही दिवसांपासून धोनीचा फॉर्म हरवत असल्याचे दिसले. दुसरीकडे २९ वर्षीय रैना छोट्या स्वरूपात फॉर्मात आहे. रैनाने आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्व सामने खेळले असून फिटनेसबाबत तो फिट आहे. या दोघांत पुणे कोणाला निवडतात हे पाहणे रोमांचक ठरेल.

यामुळे धोनीची दाट शक्यता
यंदा धोनी पुण्याकडूनच खेळण्याची शक्यता अधिक आहे. धोनी आजही टी-२०, वनडेतील सर्वोत्तम खेळाडू आहे. तो उत्तम फिनिशर आहे. शिवाय धोनी पुण्यात आला तर त्यांच्या नेतृत्वाचा प्रश्नही सुटेल. कर्णधारासाठी पुण्याला धोनीशिवाय दुसरा उत्तम पर्याय मिळू शकणार नाही. कर्णधार म्हणून धोनीचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. यामुळे धोनीला निवडण्याची संधी पुणे फ्रँचायझी टीम सोडेल, असे मुळीच वाटत नाही.
धोनी, रैनाची आयपीएल कामगिरी
खेळाडू सामने धावा १०० ५० झेल यष्टिचीत
धोनी १२९ २९८६ ० १५ ५६ २३
रैना १३२ ३६९९ १ २५ ७४ ००
बातम्या आणखी आहेत...