आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंका दौरा : टीम इंडिया दबावात नाही : मुरली विजयः कोहली खेळवणार पाच गोलंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - कर्णधार विराट कोहलीने संघात पाच नियमित गोलंदाजांना स्थान देण्याची रणनीती आखल्यामुळे सहा तज्ज्ञ फलंदाजांना संघाला तारण्यासाठी खडतर परिश्रम घ्यावेच लागतील, असा विचार क्रिकेटतज्ज्ञ व्यक्त करत असतानाच सलामी फलंदाज मुरली विजयने मात्र आम्हा फलंदाजांवर पुढच्या आठवड्यापासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत कोणतेही अतिरिक्त दडपण राहणार नसल्याची खात्री दिली आहे.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत दणकेबाज १५० धावांची खेळी केल्यामुळे विजयचे श्रीलंकेतील कसोटी मालिकेत सलामी फलंदाज म्हणून स्थान कायम राहिले.

कोहलीच्या पाच गोलंदाजांना घेऊन खेळण्याच्या योजनेमुळे आघाडीच्या फळीतील फलंदाजांवर चांगलेच दडपण येईल, असे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता दडपणाचा प्रश्नच येत नाही. कसोटीत प्रत्येक फलंदाजाला त्याची भूमिका नैसर्गिकपणे पार पाडावीच लागते. एखाद्याने मोठी खेळी केली तर ती संघासाठी जमेची बाजू असते. लंकेविरुद्ध खेळताना आम्ही बहुतेक वेळा चांगल्या स्थितीत असतो. त्यामुळे त्यांच्या देशात खेळणे आमच्यासाठी तुल्यबळ आव्हान असेल, असे मुरली म्हणाला.

खांद्यावर मोठी जबाबदारी असताना मैदानात येऊन चांगले खेळणे ही एक समाधानाची बाब होय. जर सामन्यावर नियंत्रण मिळवायचे असेल तर संपूर्ण सांघिक खेळ करावाच लागतो. सामन्याआधी योजना तयार करून त्यानुसार खेळणेच संघाच्या हिताचे ठरते, असेही सलामी फलंदाजाने स्पष्ट केले. अन्य एक सलामी फलंदाज शिखर धवनने बांगलादेशविरुद्ध आक्रमक १७३ धावा तडकावल्या होत्या. तोही लोकेश राहुलसोबत अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत दावेदार आहे.

टीम इंडियाचा सराव
कर्णधार कोहलीच्या नेतृत्वात श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर टीम इंडियाने अधिक विश्रांती न घेता लगेचच सराव केला. सर्व खेळाडूंनी मंगळवारी नेटवर इनडोअर सराव केला. कोहली, विजय, धवन, लोकेश राहुल, पुजारा, रहाणे, रोहित यांनी फलंदाजीचा कसून सराव केला. भारतीय संघ पाच वर्षांनंतर श्रीलंकेत पोहोचला आहे.