आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली, पुजारा फ्लॉप! ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ संघ अवघ्या १३५ धावांत गारद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्धशतक झळकावल्यानंतर अभिवादन करताना भारताचा करुण नायर. - Divya Marathi
अर्धशतक झळकावल्यानंतर अभिवादन करताना भारताचा करुण नायर.
चेन्नई - श्रीलंकेच्या दौ-यापूर्वी आपली तयारी तपासण्यासाठी ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध खेळण्यास मैदानावर उतरलेला टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली अवघ्या १६ धावा काढू शकला. भारत अ संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजारासुद्धा (११) मोठी खेळी करू शकला नाही. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध बुधवारपासून सुरू झालेल्या दुस-या चारदिवसीय कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारत अ संघाचे हे दोन्ही वीर फ्लॉप झाले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या आक्रमक मा-यापुढे भारत अ संघाने अवघ्या १३५ धावांत गुडघे टेकले. यानंतर दिवसअखेर पाहुण्या संघाने बिनबाद ४३ धावा काढल्या.

भारताची गचाळ सुरुवात
भारत अ संघाचा कर्णधार चेतेश्वर पुजाराने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारत अ संघाची सुरुवात अत्यंत गचाळ झाली. अवघ्या ५३ धावांत भारताचे ४ खंदे फलंदाज तंबूत परतले. भारताच्या १८ धावा झाल्या असताना कर्णधार पुजाराला त्रिफळाचीत करून स्टोनिसने पहिला धक्का दिला. पुजारा अवघ्या ११ धावा काढून बाद झाला. पुजाराने ३६ चेंडूंचा सामना करताना १ चौकार मारला. सलामीवीर अभिनव मुकुंदही मोठी खेळी करू शकला नाही. तो अवघ्या १५ धावा काढून बाद झाला. तिस-या क्रमांकावर खेळण्यास आलेला भारताचा स्टार
खेळाडू विराट कोहलीवर भारत अ संघाची मदार होती. तो मोठी खेळी करून संघाला संकटातून दूर करेल, असे वाटत होते. मात्र, तोसुद्धा १६ धावा काढून चालता झाला. कोहली बाद झाला त्या वेळी भारत अ संघाच्या २४.२ षटकांत ३ बाद ५२ धावा झाल्या होत्या. पाचव्या क्रमांकावर खेळण्यास आलेला श्रेयस अय्यर अवघ्या दोन धावांनंतर तंबूत परतला. कोहलीला एगरने पायचीत केले. तर श्रेयस अय्यरला ओ किफेने त्रिफळाचीत करून धक्का दिला.

करुणचे अर्धशतक
भारत अ संघ संकटात असताना चौथ्या क्रमांकावर आलेल्या करुण नायरने चिवट खेळी करताना अर्धशतक ठोकले. त्याने १५३ चेंडूंचा सामना करताना ५ चौकारांच्या साहाय्याने ५० धावा काढल्या. त्याच्या अर्धशतकामुळेच भारत अ संघाला शंभरी ओलांडता आली. अन्यथा नामुष्की सहन करावी लागली असती. नमन ओझा १०, बाबा अपराजित १२, एस. गोपाल ५, वरुण अॅरोन ०, शार्दूल ठाकूरला ४ धावाच काढता आल्या.

ऑस्ट्रेलियन चमकले
ऑस्ट्रेलिया अ संघाने बुधवारी दमदार गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून दिवस गाजवला. गुरविंदर संधूने २५ धावांत ३ विकेट, तर फेकेते आणि ओ किफे यांनी प्रत्येकी २ गड्यांना तंबूत पाठवले.

... चांगली सुरुवातही
भारत अ संघाला १३५ धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाने चांगली सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया अ संघाने १३ षटकांत बिनबाद ४३ धावा काढल्या.
५० धावा करुण नायरने काढल्या
०३ विकेट गुरिंदर संधूने घेतल्या
०२ विकेट फेकेते, किफे, एगरने घेतल्या
१६ धावांवर कोहली झाला बाद