आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहली वर्ल्ड टी-२० संघाचा कर्णधार, नेहराचीही निवड ‌! महिला संघात एकही भारतीय नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - भारतीय फलंदाजीचा कणा आणि "रनमशीन' विराट कोहलीची आयसीसी वर्ल्ड टी-२० इलेव्हन संघाच्या कर्णधारपदी निवडी झाली आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरानेसुद्धा अकरा खेळाडूंत स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी वर्ल्ड टी-२० संघ जाहीर केला.

आयसीसीच्या तज्ज्ञ खेळाडूंच्या निवड समितीने वर्ल्डकपमध्ये खेळाडूंची कामगिरी, फॉर्म, फिटनेस, वातावरण आदींचा विचार करून पुरुष आणि महिला संघ निवडला आहे. रविवारी झालेल्या पुरुष आणि महिलांच्या फायनलमध्ये वेस्ट इंडीजने दुहेरी यश मिळवले होते.
आयसीसीच्या प्लेइंग इलेव्हन संघात दोन भारतीय खेळाडूंशिवाय उपविजेत्या इंग्लंडचे चार खेळाडू, विजेत्या वेस्ट इंडीजचे दोन खेळाडू, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, द. आफ्रिकेचा प्रत्येकी एक खेळाडू सामील आहे. बांगलादेशचा मुशाफिजूर रेहमानला १२ वा खेळाडू म्हणून निवडण्यात आले. पाक, श्रीलंकेचा एकही खेळाडू निवडला गेला नाही. महिला संघात तर एकही भारतीय खेळाडूची निवड होऊ शकली नाही. वेस्ट इंडीजची महिला खेळाडू स्टेफनी टेलर आयसीसी संघाची कर्णधार ठरली आहे.

यांनी निवडले संघ :ज्योफ अॅलरडाइस, विंडीजचा माजी खेळाडू इयान बिशप, इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेन, भारताचा माजी खेळाडू संजय मांजरेकर, माजी ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू मेल जोन्स आणि लिसा स्थालेकर यांनी टी-२० संघ निवडला.
कोहलीची निवड यामुळे
विराट कोहलीने आयसीसी वर्ल्डकप टी-२० स्पर्धेत मालिकावीरचा पुरस्कार पटकावला. त्याने जबरदस्त प्रदर्शन करताना १३६.५० च्या सरासरीने आणि १४५.७७ च्या स्ट्राइक रेटने सुपर-१० मध्ये सर्वाधिक २७३ धावा ठोकल्या. त्याने तीन अर्धशतके झळकावली. कोहलीने स्पर्धेत २९ चौकार आणि ५ षटकार मारले. बांगलादेशच्या तमिम इक्बालने (क्वालिफायर सामने मिळून) स्पर्धेत सर्वाधिक २९५ धावा काढल्या. या शानदार प्रदर्शनामुळे त्याची कर्णधारपदी निवड झाली.
नेहराची निवड यामुळे झाली
नेहराने आपल्या अनुभवाची प्रचिती देताना स्पर्धेत भारताला प्रत्येक सामन्यात लवकर विकेट मिळवून दिल्या. स्पर्धेत त्याने ५ विकेट घेतल्या. इकॉनॉमी रेटने अाशिष नेहराची गोलंदाजी सरस आणि फायद्याची ठरली.

काेहली, टीम इंडियाचे अव्वल स्थान कायम, विंडीज दुसऱ्या स्थानी
काेलकाता | यजमान भारतीय संघ अाणि स्फाेटक फलंदाज विराट काेहलीने अायसीसीच्या टी-२० क्रमवारीतील अापले अव्वल स्थान कायम ठेवले. दुसरीकडे विश्वविजेत्या वेस्ट इंडीज संघाने क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर धडक मारली. नुकताच विंडीजने टी-२० चा वर्ल्डकप जिंकला. त्यामुळे या टीमला क्रमवारीमध्ये माेठी प्रगती साधता अाली. विंडीजचे एकूण १२५ गुण झाले अाहेत. हा संघ सध्या अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडियापासून अवघ्या एका गुणाने पिछाडीवर अाहे. भारताचे १२६ गुण अाहेत. यामुळे अाता न्यूझीलंड टीमची क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. या टीमला क्रमवारीत एका स्थानाचा फटका बसला.
सॅम्युअल्सनेही फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये प्रगती साधली. त्याने अव्वल २० मध्ये धडक मारली.
आयसीसीचा पुरुष टी-२० संघ असा
विराट कोहली (कर्णधार, भारत), जेसन रॉय (इंग्लंड), क्विंटन डिकॉक (द. आफ्रिका), जो. रुट (इंग्लंड), जोस बटलर (इंग्लंड), शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया), आंद्रे रसेल (वेस्ट इंडीज), मिशेल सँटनर (न्यूझीलंड), डेव्हिड विली (इंग्लंड), सॅम्युअल बद्री (वेस्ट इंडीज), आशिष नेहरा (भारत). १२ वा खेळाडू : मुशाफिजूर रेहमान (बांगलादेश).

आयसीसी महिला संघ
स्टेफनी टेलर (कर्णधार, वेस्ट इंडीज), सुझी बेट्स (न्यूझीलंड), चार्लोट एडवर्ड््स (इंग्लंड), मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया), सोफी डेव्हाइन (न्यूझीलंड), रिचेल प्रिस्ट (न्यूझीलंड), डेंड्रा डोटिन (वेस्ट इंडीज), मेगन स्कूट (ऑस्ट्रेलिया), सुने लूस (द. आफ्रिका), ले कास्पेरेक (न्यूझीलंड), अन्या श्रुबसोल (इंग्लंड). १२ वी खेळाडू : अनम अमीन (पाकिस्तान).