अमरावती- राज्यात एकूण ११ क्रीडा प्रबोधिनी आहेत. मात्र, शासनाचे त्याकडे पूर्णत: झालेले दुर्लक्ष, अनियमित क्रीडा मार्गदर्शक अन् अशा अनेक समस्यांमुळे त्या सध्या अंितम घटका मोजत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रबोधिनीही ‘व्हेंटिलेटर’वर आहेत. त्यामुळे राज्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याच्या उद्देशाने १९९६ मध्ये स्थापन केलेल्या बहुतेक प्रबोधिनी ध्येयापासून दूर अाहेत.
शासनाने सहा महिने मानधनावर प्रबोधिनींमध्ये अनियमित कर्मचारी नियुक्त केले आहेत. दर सहा महिन्यांनी त्यांना मुदतवाढ दिली जाते. असा ढिसाळपणा १९९६ पासून सुरू आहे. मात्र, ३१ मे २०१४ रोजी शासनाने प्रबोधिनीत नियुक्त राज्य क्रीडा मार्गदर्शकांचे पदच संपुष्टात आणले. नंतर त्यांना मुदतवाढही दिली नाही. त्यानंतर ६ महिने या क्रीडा मार्गदर्शकांनी मानधनाविना काम केले. मात्र, कोणीही दखल घेतली नसल्यामुळे बेरोजगार झालेल्या या प्रशिक्षकांनी अखेर कामगार न्यायालयात धाव घेतली.याबाबत २४ व २५ जून २०१५ रोजी पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालयात बैठक घेतली. परंतु त्यातून प्रबोधिनी व राज्य क्रीडा मार्गदर्शकांना नियमित करण्याबाबत कोणताही तोडगा निघू शकला नाही. अजूनही याबाबत कोणतेही धोरण िनश्चित नसल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
महिला पर्यवेक्षक हे पदच नाही...
राज्यातील बहुतेक प्रबोधिनीतील मुलींच्या वसतिगृहांमध्ये महिला पर्यवेक्षक हे पदच नाही. त्यामुळे महिला खेळाडूंना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. महिला खेळाडूंच्या अडचणी समजून घेणारेही कोणी नाही.
यावर असा आहे पर्याय
शासन प्रबोधिनी चालवण्यास सक्षम नसेल तर सर्व प्रबोधिनी पुण्यात हलवता येऊ शकतात. पुण्याला हलवल्यानंतर राज्यातील ज्या इमारती रिक्त राहतील तेथे साईप्रमाणे डे बोर्डिंग योजना राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंसाठी सुरू करता येईल.
शासनाला कळवले
कर्मचाऱ्यांची अनुपलब्धता, प्रबोधिनीच्या अनियमित राज्य क्रीडा मार्गदर्शकांच्या मानधनाचा प्रश्न, मुलींच्या वसतिगृहांसाठी महिला पर्यवेक्षकाच्या नियुक्तीसह अन्य अनेक समस्यांबद्दल शासनाला कळवले आहे. अजूनही त्याची दखल घेतलेली नाही. नरेंद्र सोपल, सहसंचालक, क्रीडा.
नैपुण्य चाचण्या बंद
दोन वर्षांपासून राज्यात क्रीडा नैपुण्य शोध चाचण्या बंद आहेत. त्यामुळे १४ वर्षांवरील सर्व मुले या योजनेतून आपोआपच बाद झाली आहेत. कारण १४ वर्षांखालील खेळाडूंची क्रीडा नैपुण्य चाचणी घेऊन नंतरच त्याला प्रबोधिनीत प्रवेश दिला जातो.