आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंबळे म्हणाला, गोलंदाजांची कामगिरी सुधारण्यावर लक्ष- प्रशिक्षण शिबिराला सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झालेला अनिल कुंबळे आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी सिद्ध झाला असून आपण सर्वप्रथम गोलंदाजांची कामगिरी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्याने बुधवारी बंगळुरू येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

सुरुवातीला गोलंदाजांना समजून घेणे, त्यांच्या समस्या जाणणे, त्यांच्या चुका दाखवून त्या सुधारणे याकडे लक्ष देणार आहे. गोलंदाजीमध्ये तरी मी स्वत: त्यांना मदत करू शकतो. वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन करण्यासाठी गरज आहे. सध्या विंडीज दौऱ्यावर कुणालाही नेणे शक्य नाही. भविष्य काळात त्या गरजेचा विचार होऊ शकतो, असे कुंबळे म्हणाला.

आपण खेळत असताना ज्या अपेक्षेने प्रशिक्षकाकडे पाहत होतो त्याच अपेक्षा पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करीन. पूर्वतयारीत सुसूत्रता असावी. कप्तानाला मार्गदर्शन करणे आणि संघाला डावपेच समजावणे याकडे माझे प्रथम लक्ष राहील. खेळणारे ११ खेळाडूच नव्हे, तर राखीव फळीतील ६-७ खेळाडूंनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेणार, असेही त्याने म्हटले.

मी भारतासाठी सर्व प्रकारच्या सर्व स्तरावरील संघांत खेळलो. वेळप्रसंगी मलाही वगळण्यात आले होते. ते दु:ख त्या वेळच्या भावनांची मला कल्पना आहे. अशा वेळी प्रशिक्षकाने त्या खेळाडूला संदेश पाठवला की, घाबरू नकोस, तू अजूनही संघाचा एक भाग आहे. त्यामुळे त्या खेळाडूला धीर येतो, असे कुंबळेने सांगितले.

पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये आल्याचा आनंद
पुन्हा एकदा खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये येणे ही अत्यंत आनंदाची घटना आहे. भारतीय क्रिकेटला उंचीवर नेण्यासाठी ज्या भूमिकेतून मदत करणे शक्य आहे ते सर्व काही मी करीन. युवा क्रिकेटपटूंना कसोटीसाठी तयार करण्याचे माझे काम आहे. आजच्या क्रिकेटपटूंचा ओढा टी-२० कडे अधिक आहे. त्यांना कसोटीचे महत्त्व समजावून त्यासाठी तयार करण्याचे आव्हान असल्याचे कुंबळेने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...