आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs NZ: हार्दिकनेच अपेक्षा वाढवल्या अन् संपवल्याही, भारत अवघ्या 6 धावांनी पराभूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत दिल्लीत फिरोजशहा कोटला मैदानावर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या झुंजार खेळीनंतर भारताचा ६ धावांनी पराभव झाला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २४२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात धावांचा पाठलाग करताना भारताने ४९.२ षटकांत सर्वबाद २३६ धावा काढल्या. या विजयासह पाहुण्या न्यूझीलंड संघाने मालिकेत १-१ ने बरोबरी केली. मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना २३ ऑक्टोबर रोजी मोहालीत होईल.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केन विल्यम्सनच्या (११८) शतकाच्या बळावर ९ बाद २४२ धावा काढल्या. किवींचे इतर फलंदाज अपयशी ठरले. धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया २४३ धावांचे हे लक्ष्य सहज गाठेल, असे वाटत होते. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताला २३६ धावांवर रोखून रोमांचक विजय मिळवला. भारताकडून केदार जाधवने सर्वाधिक ४१ धावा काढल्या. त्याने ३७ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि २ चौकार मारले.
त्याच्याशिवाय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ३९ आणि तळाचा फलंदाज हार्दिक पंड्याने ३६ धावांचे योगदान दिले. धोनीने संथ फलंदाजी करताना ६५ चेंडूंत ३ चौकारांसह ही खेळी केली.
तत्पूर्वी भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा १५ धावा काढून बोल्टच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. टीम इंडियाची रनमशीन विराट कोहलीला फिरकीपटू मिशेल सँटनरने विकेटकीपर रोंचीकरवी झेलबाद करून न्यूझीलंडला मोठे यश मिळवून दिले. कोहली बाद झाला त्या वेळी भारताच्या २ बाद ४० धावा झाल्या होत्या. अजिंक्य रहाणेने ४९ चेंडूंत २८ धावा, मनीष पांडेने १९ धावा, तर अक्षर पटेलने १७ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून टीम साऊथीने सर्वाधिक ३ गडी बाद केले.

विल्यम्सनचे शतक; न्यूझीलंडच्या २४२ धावा-

न्यूझीलंडने विल्यम्सनच्या शतकाच्या बळावर ९ बाद २४२ धावा काढल्या. गुप्तिल शून्यावर उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर विल्यम्सन आणि लँथम यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. विल्यम्सनने १०९ चेंडूंत करिअरचे आठवे वनडे शतक ठोकले. न्यूझीलंडकडून या दौऱ्यावर हे कसोटी, वनडे मिळून पहिले शतक ठरले. विल्यम्सनने ११८ धावांचे योगदान दिले.

१३ वर्षांनी भारताचा पराभव-

तेरा वर्षांपूर्वी न्यूझीलंडने भारताला भारतात कटक येथील वनडेत ४ विकेटने हरवले होते. तेव्हापासून दोन्ही देशांत भारतात ८ वनडे सामने झाले. यात भारताने सलग सात सामने जिंकले. मात्र, गुरुवारी नवी दिल्लीत झालेला सामना न्यूझीलंडने जिंकून भारतीय भूमीवर पराभवाची मालिका खंडित केली. या दौऱ्यात न्यूझीलंडचा हा पहिला विजय ठरला.

मिश्रा, बुमराहच्या प्रत्येकी ३ विकेट
न्यूझीलंडची पहिली विकेट शून्यावर, दुसरी विकेट १२० धावांवर, तर तिसरी विकेट १५८ धावांवर पडली. रॉस टेलरला (२१) मिश्राने रोहितकरवी झेलबाद केले. यानंतर मिश्राने कोरी अँडरसला (२१) पायचीत केले. यानंतर अमित मिश्राने केन विल्यम्सनला रहाणेकरवी झेलबाद करून त्याची खेळी संपुष्टात आणली. बुमराहने ३५ धावांत ३ गडी बाद केले.

स्लॉग ओव्हरमध्ये बुमराह चमकला
स्लॉग ओव्हरमध्ये सुमार गोलंदाजीचा इतिहास टीम इंडियासाठी चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र, या सामन्यात जसप्रीत बुमराहने (३ विकेट) स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करून न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवले. न्यूझीलंडची टीम एक वेळ तीनशे धावा काढेल असे वाटत होते. मात्र, मिश्रा, बुमराहने त्यांना २५० च्या अात रोखले. या सामन्यासाठी न्यूझीलंडने संघात तीन बदल केले. बुमराहने ३५ धावांत ३ गडी बाद केले.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, भारत-न्यूझीलंड संघातील वन डे सामन्यातील क्षणचित्रे.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...