आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टी-२० मालिका बरोबरीत, दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 10 धावांनी पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरारे- झिम्बाब्वे दौऱ्यात "अजिंक्य' राहण्याची संधी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने गमावली. टी-२० मालिकेतील आणि दौऱ्यातील अखेरच्या सामन्यात भारताचा पराभव झाला. यजमान झिम्बाब्वेने टीम इंडियाला १० धावांनी पराभूत करत मालिकेतील एकमेव विजय मिळवला. झिम्बाब्वेच्या या विजयामुळे टी-२० मालिका १-१ ने बरोबरीत सुटली.

पहिल्या सामन्यात भारताने ५४ धावांनी विजय मिळवला होता. दुसऱ्या लढतीत यजमान झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १४५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला २० षटकांत ९ बाद १३५ धावांवर रोखून १० धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

भारताची गचाळ सुरुवात
विजयासाठी आवश्यक असलेल्या १४६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. भारताचा सलामीवीर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे अवघ्या ४ धावांवर धावबाद होऊन परतला. यानंतर मुरली विजय (१३) आणि रॉबिन उथप्पा (४२) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५३ धावांची भागीदारी करून विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. भारताच्या ५७ धावा झाल्या असताना विजय बाद झाला. विजय बाद होताच भारताचा डाव गडगडला. १ बाद ५७ अशा सुस्थितीत असलेल्या भारताची अवस्था ५ बाद ६९ अशी संकटग्रस्त झाली. विजयनंतर मनीष पांडे क्रेमरच्या गोलंदाजीवर शून्यावर पायचीत होऊन परतला. ६१ च्या स्कोअरवर उथप्पाने नांग्या टागल्या. भारताच्या ६९ धावा झाल्या असताना केदार जाधव धावबाद झाला.
यानंतर स्टुअर्ट बिन्नी आणि संजू सॅमसन यांनी डाव सावरला. दोघांनी भारताचा स्कोअर १०० च्या पुढे नेला. बिन्नी २३ चेंडूंत २ चौकारांसह २४ धावा काढून बाद झाला. संजू सॅमसनने २४ चेंडूंत एका चौकारासह १९ धावांचे योगदान दिले. अक्षर पटेलने १३ धावा जोडल्या. भारताकडून उथप्पाने सर्वाधिक ४२ धावा काढल्या. त्याने २५ चेंडूंत ९ चौकारांसह ही खेळी केली. इतरांचे अपयश भारताला भोवले.

झिम्बाब्वेची गचाळ सुरुवात
झिम्बाब्वेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर मसकदजा १९ धावा काढून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर सिकंदर राजा (८) मोहित शर्माचा बळी ठरला. चौथ्या क्रमांकाच्या सीन विल्यम्सने १७ धावा, तर कॉव्हेंट्रीने ४ धावांचे योगदान दिले.

भुवनेश्वर, मोहित चमकले
भारताकडून गोलंदाजीत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. युवा गोलंदाज संदीप शर्माने एकाला, तर स्टुअर्ट बिन्नी व फिरकीपटू अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. संदीप शर्मा सर्वाधिक महागडा ठरला. त्याने ४ षटकांत ३९ धावा मोजल्या.

चामू चिभाभाचे अर्धशतक
एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुसऱ्या टोकाने सलामीवीर चामू चिभाभाने अर्धशतक ठोकले. त्याने ५१ चेंडूंचा सामना करताना ९ चौकारांसह ६७ धावा काढल्या. त्याने ही खेळी १३१.३७ च्या स्ट्राइक रेटने केली. १९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने त्याला त्रिफाळचीत केले. चिभाभाशिवाय मसकदजा (१९) आणि सीन विल्यम्स (१७) यांनाच दोनअंकी धावसंख्या गाठता आली.

धावफलक
झिम्बाब्वे धावा चेंडू ४ ६
मसकदजा झे. उथप्पा गो. संदीप १९ १७ १ १
चिभाभा त्रि. गो. भुवनेश्वर ६७ ५१ ९ ०
सिकंदर राजा झे. सॅमसन गो. मोहित ०८ ०७ १ ०
सीन विल्यम्स झे. व गो. अक्षर १७ १८ १ ०
कॉव्हेंट्री पायचीत गो. बिन्नी ०४ १० ० ०
इरविन त्रि. गो. भुवनेश्वर ०७ ०९ १ ०
वॉलर नाबाद ०६ ०६ ० ०
उत्सेया झे. अक्षर गो. मोहित ०१ ०२ ० ०

क्रेमर नाबाद ०० ०१ ० अवांतर : १६. एकूण : २० षटकांत ७ बाद १४५ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-२८, २-४८, ३-८५, ४-११३, ५-१३२, ६-१३९, ७-१४२. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-२६-२, संदीप शर्मा ४-०-३९-१, स्टुअर्ट बिन्नी २-०-१४-१, मोहित शर्मा ४-०-२८-२, विजय २-०-९-०, अक्षर ४-०-२३-१.

भारत धावा चेंडू ४ ६
अजिंक्य रहाणे धावबाद ०४ ०३ १ ०
मुरली विजय त्रि. गो. क्रेमर १३ ११ ० १
उथप्पा झे. व गो. विल्यम्स ४२ २५ ९ ०
मनीष पांडे पायचीत गो. क्रेमर ०० ०३ ० ०
केदार जाधव धावबाद ०५ ०६ ० ०
स्टुअर्ट बिन्नी झे. चिभाभा गो. क्रेमर २४ २३ २ ०
सॅमसन झे. वॉलर गो. मोफू १९ २४ १ ०
अक्षर झे. विल्यम्स गाे. मुझराबानी १३ १५ १ ०
भुवनेश्वर कुमार धावबाद ०९ ०६ ० ०
मोहित शर्मा नाबाद ०३ ०३ ० ०
संदीप शर्मा नाबाद ०१ ०१ ० ०

अवांतर : ०२. एकूण : २० षटकांत ९ बाद १३५ धावा. गडी बाद क्रम : १-४, २-५७, ३-५७, ४-६१, ५-६९, ६-१०५, ७-११७, ८-१२४, ९-१३१. गोलंदाजी : उत्सेया ३-०-१८-०, मुझराबानी ३-०-२३-१, मोफू ३-०-२६-१, चिभाभा १-०-९-०, विल्यम्स ४-०-३१-१, क्रेमर ४-०-१८-३, राजा २-०-९-०.