आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ind-Nz T20 :भारताचा न्यूझीलंडवर पहिला विजय; आशीष नेहराचा क्रिकेटला अलविदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शिखर धवन आणि रोहित शर्माच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने तब्बल १० वर्षांनी न्यूझीलंडला टी-२० सामन्यात पहिल्यांदा पराभूत केले. तीन सामन्याच्या मालिकेतील पहिल्या लढतीत भारताने न्यूझीलंडवर ५३ धावांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे फिरोजशहा कोटला मैदानावरील पहिलाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना झाला, त्यात भारताने बाजी मारली. सलामीवीर शिखर धवन सामनावीर ठरला. 

फिरोजशहा कोटला मैदानावरील सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २०२ धावा उभारल्या.  सलामीवीर रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ५५ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकार खेचत ८० धावा कुटल्या. त्याला ट्रेंट बोल्टने टॉम लॅथम करवी झेल बाद केले. दुसरा सलामीवीर शिखर धवनने अर्धशतक ठोकले. त्याने ५२ चेंडूंत १० चौकार आणि २ उत्तुंग षटकार लगावत ८० धावा काढल्या. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेला युवा फलंदाज हार्दिक पांड्या भोपळाही फोडू शकला नाही. सोढीने त्याला लॅथमच्या हाती झेल बाद करत आल्यापावली परत तंबूत पाठवले. चौथ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने अखेरच्या क्षणी फलंदाजी येत फटकेबाजी केली. त्याने अवघ्या ११ चेंडूंत ३ षटकार खेचत नाबाद २६ धावा करत संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. महेंद्रसिंग धोनीने २ चेंडंूत एक चौकारासह नाबाद ७ काढल्या. 

न्यूझीलंडच्या ईश सोढीने ४ षटकांत २५ धावा देत २ गडी बाद केले. ट्रेंट बोल्टने एक विकेट घेतली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना बळी घेण्यासाठी संघर्ष करावा लागला. 
 
नेहराचे पर्व समाप्त
आपल्या घरच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय करिअरमधील अखेरचा सामना खेळणाऱ्या वेगवान गोलंदाज आशिष नेहराला न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यापूर्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व कर्णधार विराट कोहलीच्या हस्ते विशेष तयार करण्यात आलेले स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. नेहराने आपल्या सर्व सहकाऱ्यांचे अाभार व्यक्त केले. या सामन्यासाठी आंबेडकर स्टेडियमकडील बाजूस नेहराचे खास नाव देण्यात आले.
 
शिखर - रोहितची विक्रमी भागीदारी
शिखर धवन आणि रोहित शर्माने १५८ धावांची भागीदारी रचली. जोडीने ९८ चेंडूंचा सामना करताना १५८ धावांची भागीदारी केली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी कोणत्याही विकेटसाठी झालेली आतापर्यंत सर्वात मोठी भागीदारी ठरली. या जोडीने रोहित व विराट कोहलीच्या २०१५ मधील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठीच्या १३८ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला.  
 
 न्यूझीलंडला संथ फलंदाज भोवली 
प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव  २० षटकांत ८ बाद १४९ धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंडला संथ फलंदाजी भोवली. विलियम्सन २८, लॅथमने सर्वाधिक ३९ धावा आणि सॅटनरने २७ धावा केल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. भारताकडून यजुवेंद्र चहल आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ गडी बाद केले. हार्दिक पांड्याने एक विकेट घेतली. 
 
अय्यर ७० वा खेळाडू
आशिष नेहरा व श्रेयस अय्यरसाठी बुधवारचा दिवस विशेष ठरला. नेहरा अापला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता, तर दुसरीकडे अय्यरने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले. तो भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा ७० वा खेळाडू बनला आहे. 
 
पुढे पाहा, संबंधित PHOTOS...
 
बातम्या आणखी आहेत...