आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाकडून श्रीलंकेचा धुव्वा! विराटचे 30 वे शतक; धाेनी, बुमराहने केला विश्वविक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलंबाे -  युवा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह (२/४५) अाणि महेंद्रसिंग धाेनीच्या (१०० यष्टिचीत पूर्ण) विश्वविक्रमी कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने पाचव्या वनडेत शानदार विजय संपादन केला. भारताने मालिकेत शेवटच्या सामन्यामध्ये यजमान श्रीलंकेवर मात केली. भारताने ४६.३ षटकांंत ६ गडी राखून सामना जिंकला. यासह भारताने पाच वनडे सामन्यांची मालिका ५-० ने जिंकली. दुसरीकडे कसाेटीपाठाेपाठ वनडेतही यजमान श्रीलंकेचा धुव्वा उडाला. यजमान श्रीलंकेचा घरच्या मैदानावर सुफडा साफ करणारा भारत हा पहिला विदेशी संघ ठरला. तसेच भारताने अाता सहाव्यांदा पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत प्रतिस्पर्धीला क्लीन स्वीप देण्याचा पराक्रम गाजवला.
 
भुवनेश्वर कुमारच्या (५/४२) धारदार गाेलंदाजीमुळे कंबरडे माेडलेल्या श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २३८ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात विराट काेहली (नाबाद ११०) अाणि केदार जाधवच्या (६३) झंझावाती फलंदाजीच्या बळावर भारताने  ४ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. जसप्रीत बुमराह मालिकावीर व भुवनेश्वर सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.  
 
सर्वात कमी डावात शतक; सचिनचा विक्रम माेडला 
विराट काेहलीने पाचव्या वनडेत नाबाद शतकी खेळी केली. त्याने ११६ चेंडूंत ९ चाैकारांच्या अाधारे नाबाद ११० धावांचे याेगदान दिले. त्याचे हे करिअरमधील ३० वे शतक ठरले. यासह त्याने सर्वात कमी डावात ३० शतकांचा सचिनचा विक्रम माेडला. त्याने १९४ वनडेच्या १८६ डावांत हे यश संपादन केले. सचिनच्या नावे २६७ धावांत ३० शतकांची नाेंद अाहे.   
 
धाेनीचे वेगवान यष्टिचीतचे शतक 
भारताच्या यष्टिरक्षक महेंद्रसिंग धाेनीने यष्टिचीतमध्ये वेगवान शतक ठाेकले. त्याने कमीत कमी वनडे खेळाडू हा पल्ला गाठला. त्याने २००४ ते २०१७ दरम्यान ३०१ व्या वनडेमध्ये हे यश संपादन केले. यासह त्याने श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकले. संगकाराच्या नावे ४०४ वनडेत ९९ यष्टिचीत अाहेत. अाता धाेनी हा अव्वल ठरला. अशी कामगिरी करणारा ताे जगातील पहिला यष्टिरक्षक ठरला अाहे.
 
बुमराहचा विक्रम;  अॅडम्स, मकायला टाकले मागे 
भारताच्या युवा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराहने पाचव्या वनडेत दाेन गडी बाद केले. यासह त्याने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत एकूण १५ विकेट घेतल्या. यासह त्याने नवा विश्वविक्रम केला. अशा प्रकारची कामगिरी करणारा ताे जगातील पहिला वेगवान गाेलंदाज ठरला. यामध्ये त्याने न्यूझीलंडच्या अांद्रे अॅडम्स अाणि अाॅस्ट्रेलियाच्या क्लिंट मकायला (प्रत्येकी १४ बळी) पिछाडीवर टाकले.
 
हायलाइटस‌्
- ६ गड्यांनी भारतीय संघ विजयी  
- ४६.३ षटकांत जिंकला सामना  
- ५ विकेट घेतल्या भुवनेश्वर कुमारने
- ११० नाबाद धावांचे काेहलीचे याेगदान  
- ६३ धावांची केदार जाधवची खेळी  
- १०० यष्टिचीतचा धाेनीने गाठला पल्ला  
- १५ बळी बुमराहने मालिकेत घेतले
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, पाचव्या वन डे सामन्यातील छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...