आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

3rd Test Ind v Eng: संकटमोचक अश्विनने जडेजासह डाव सावरला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहली - रविचंद्रन अश्विनच्या आणखी एका संकटमोचक खेळीने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले. भारतीय संघ ५ बाद १५६ धावा असा संकटात सापडला होता. यानंतर अश्विनने नाबाद अर्धशतक ठोकून भारताचा डाव सावरला. दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत भारताने ६ बाद २७१ धावा काढल्या होत्या. त्या वेळी अश्विन ५७ आणि जडेजा ३१ धावांवर खेळत होते. कोहली बाद झाल्यानंतर अश्विन-जडेजाने नाबाद ६७ धावांची भागीदारी केली. टीम इंडिया इंग्लंडच्या पहिल्या डावातील २८३ च्या स्कोअरपासून केवळ १२ धावांनी मागे आहे. भारताकडून अश्विनशिवाय कर्णधार कोहली (६२) आणि चेतेश्वर पुजारा (५१) यांनी अर्धशतके ठोकली.

या खेळीच्या वेळी अश्विनने २०१६ मध्ये कसोटीत ५०० धावा पूर्ण केल्या. या वर्षी अश्विनने ५६ विकेटसुद्धा घेतल्या आहेत. ३३ वर्षांनी एखाद्या भारतीय अष्टपैलू खेळाडूने एका कॅलेंडर वर्षात ५०० धावा आणि ५६ विकेट घेण्याची कामगिरी केली. याआधी कपिलदेवने १९८३ मध्ये (५७९ धावा, ७५ विकेट) अशी कामगिरी केली होती. कपिलने १९७९ मध्ये (६१९ धावा आणि ७४ विकेट) सुद्धा अशी कामगिरी केली होती. कसोटीच्या इतिहासात एखाद्या अष्टपैलूने कॅलेंडर वर्षात ५०० धावा आणि ५० पेक्षा जास्त विकेट घेण्याची ही दहावी वेळ ठरली आहे.

विजयला (१२) स्टोक्सने यष्टिरक्षक बेयरस्ट्रोकरवी झेलबाद केले. आठ वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या पार्थिव पटेलला ४२ धावांवर रशीदने पायचित केले. यानंतर पुजारा-कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी केली. चहापानाच्या ब्रेकपर्यंत भारताने २ बाद १४८ धावा काढल्या.

८ धावांत ३ विकेट गमावल्या
चहापानानंतर लगेचच आदिल रशीदने पुजाराला बाद केले. शॉर्टपिच चेंडूला पूल करण्याच्या नादात पुजाराने स्टोक्सच्या हाती झेल दिला. यानंतर त्याने अजिंक्य रहाणेला शून्यावरच पायचीत करून भारताला धक्का दिला. त्या वेळी भारताच्या १५२ धावा झाल्या होत्या. चार धावांनंतर पहिली कसोटी खेळणारा करुण नायर (४) धावबाद झाला. कोहलीने यानंतर अश्विनसह भारताला २०० चा टप्पा गाठून दिला. मात्र, स्टोक्सने कोहलीला बेयरस्ट्रोकरवी झेलबाद करून भारताला अडचणीत आणले. कोहलीने १२७ चेंडूंत ९ चौकारांसह ६२ धाव काढल्या. कोहली २०४ च्या स्कोअरवर बाद झाला. यानंतर अश्विन-जडेजाने दमदार फलंदाजी करताना भारताचा डाव सावरला.

इंग्लंडच्या २८३ धावा : तत्पूर्वी, सकाळी इंग्लंडने ८ बाद २६८ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. इंग्लंडचा डाव २८३ धावांत आटोपला. मो. शमीने आदिल रशीद (४) आणि गॅरेथ बेट्टीला (१) बाद केले. जेम्स अँडरसन १३ धावांवर नाबाद राहिला. मो.शमीने ३ विकेट घेतल्या.

कोहली पुन्हा टॉप स्कोअरर : भारतीय कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. त्याने तिन्ही स्वरूपांत मिळून या वर्षी २३३९ धावा काढल्या आहेत. इंग्लंडच्या जो. रुटला (२३००) त्याने मागे टाकले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, काही निवडक फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...