आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Live Update India Vs England, 3rd Test, Day 3 At Mohali Chandigarh I.S. Bindra PCA Stadium

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताचा इंग्लंडवर 8 गड्यांनी दणदणीत विजय, टीम इंडियाची मालिकेत 2- 0 ने आघाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विजयानंतर जल्लोष करताना विराट कोहली आणि पार्थिव पटेल. - Divya Marathi
विजयानंतर जल्लोष करताना विराट कोहली आणि पार्थिव पटेल.
मोहाली - टीम इंडियाचे फिरकीचे त्रिकूट रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि जयंत यादव तसेच सलामीवीर पार्थिव पटेलच्या (नाबाद ६७) दमदार प्रदर्शनाच्या बळावर भारताने तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीच इंग्लंडवर ८ गड्यांनी विजय मिळवला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा रवींद्र जडेजा (९० धावा, ४ विकेट) मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. सामन्याचा विजयी चौकार पार्थिव पटेलने बेट्टीच्या गोलंदाजीवर मारला. आता दोन्ही संघांत चौथी कसोटी येत्या ८ डिसेंबरपासून मुंबईत होईल.

भारताने इंग्लंडला दुसऱ्या डावात २३६ धावांत रोखले. यानंतर भारताला विजयासाठी अवघे १०३ धावांचे छोटे लक्ष्य मिळाले. टीम इंडियाने २०.२ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात १०४ धावा काढून शानदार विजय मिळवला. या विजयाने भारताने मोहालीत विजयी चौकार मारला. आठ वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या पार्थिव पटेलने नाबाद ६७ आणि चेतेश्वर पुजाराने २५ धावांचे योगदान दिले. मागच्या २२ वर्षांपासून टीम इंडिया मोहालीत अपराजित आहे. भारताने येथे हा विक्रम या वेळीही कायम ठेवला. कोहलीच्या टीम इंडियाने येथे विजयी चौकार मारला. भारताने या सामन्याच्या आधी येथे ऑस्ट्रेलियाला दोन वेळा आणि द. आफ्रिकेला एक वेळा हरवले.
- ०४ वेळा मोहालीत भारत विजयी. कांगारूंना २, आफ्रिकेला १ वेळा हरवले
- ०८ वर्षांनी कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या पार्थिवची मॅचविजेती खेळी
- २२ वर्षांपासून मोहालीत कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडिया अपराजित
रुट, हमीदची अर्धशतके
इंग्लंडकडून जो. रुट (७८) आणि हसीब हमीद (नाबाद ५९) यांनी अर्धशतके ठोकली. या दोघांशिवाय इंग्लंडचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करू शकला नाही. बोटाला दुखापत झाल्यामुळे हमीद खालच्या क्रमांकावर फलंदाजीस अाला. त्याने अर्धशतक ठोकले. जेवणाच्या ब्रेकपर्यंत इंग्लंडने १५७ धावांत ७ विकेट गमावल्या होत्या.
फिरकीपटूंच्या ७ विकेट
दुसऱ्या डावात आर. अश्विनने ८१ धावांत ३ विकेट, डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने ६२ धावांत २ विकेट, ऑफस्पिनर जयंत यादवने २१ धावांत २ विकेट आणि मो. शमीने ३७ धावांत २ गडी बाद केले.
शमीच्या बाउन्सरची कमाल
मो. शमीने आपल्या धारदार बाउन्सरने इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना त्रस्त केले. वोग्स (३० धावा) असाच शमीच्या एका ताशी १४३ िकमी वेगाने आलेल्या बाउन्सरवर यष्टिरक्षक पार्थिवच्या हाती झेल देऊन बाद झाला. मो. शमीने १४३.४ च्या ताशी वेगाने आणखी एक बाउन्सर टाकला आणि आदिल रशीदला (०) बाद केले. रशीदकडे चेंडूला हुक करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्याच्या हुकवर उमेश यादवने सोपा झेल घेतला. दिवसाची अखेरची विकेट अँडरसनच्या रूपाने पडली. अँडरसनला अश्विन आणि जडेजाने धावबाद केले.
१५ वर्षांनी ना शतक, ना ४ विकेट; तरीही जिंकलो
- एखाद्या कसोटीत भारतीय फलंदाजाने शतक ठोकले नाही किंवा एखाद्या भारतीय गोलंदाजाने डावात चार गडी बाद केले नाही...तरीही टीम इंडिया जिंकल्याचे फक्त दुसऱ्यांदा घडले आहे. याआधी २००१ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध असे झाले होते.
- गेल्या २२ वर्षांपासून टीम इंडिया मोहालीत अपराजित आहे. भारताचा येथे पहिला अाणि अखेरचा पराभव १९९४ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध झाला होता. तेव्हापासून भारताने येथे ७ कसोटी सामने जिंकले आणि ५ ड्रॉ केले.
- कसोटीत दोन अर्धशतके ठोकणारा हसीब हमीद इंग्लंडचा पहिला टीनेजर फलंदाज ठरला आहे. त्याने पहिल्या कसोटीतही अर्धशतक काढले होते.
- इंग्लंडच्या जो. रुटने यावर्षी ११ वेळा ५० प्लसची खेळी केली आहे. इतर कोणत्याही फलंदाजाच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. एखाद्या फलंदाजाने एका कॅलेंडर वर्षांत ११ किंवा यापेक्षा अधिक अर्धशतके ठोकण्याची कामगिरी यापूर्वी फक्त चार वेळा झाली.
- मागच्या १० वर्षांत भारताने भारतात २५ कसोटीत टॉस गमावले. तरीही यातील १७ मध्ये विजय मिळवला. फक्त एकात पराभव. सात सामने ड्रॉ केले. कोणत्याही संघाच्या देशातील कामगिरीत हे सर्वोत्तम प्रदर्शन.
- ४४२६ दिवसांनंतर (१२ वर्षे, ४४ दिवस) पार्थिव पटेलने कसोटीत अर्धशतक ठोकले. कोणत्याही भारतीय फलंदाजाच्या दोन कसोटी अर्धशतकातील हे सर्वांत अधिक अंतराचा विक्रम लाला अमरनाथच्या (१२ वर्षे, १९० दिवस) आहे.
इंग्रज अतिआनंदात
टॉस जिंकल्यानंतर इंग्लंडचे खेळाडू खूपच आनंदात होते. जणू काही त्यांनी सामनाच जिंकला आहे, असे वाटत होते. टॉस जिंकल्यानंतर मैदानावर उतरून सामना जिंकायचा असतो. त्यांच्या या चुकीने आम्हाला विजयासाठी प्रेरित केले. - विराट कोहली, विजयानंतर.

ठरवले तसेच झाले..
चेंडू जास्त वळत नव्हता. यामुळे मी आणि कर्णधार कोहलीने ५ षटके निर्धाव पडली पाहिजेत, असे ठरवले. परिणामी पहिल्या डावात स्टोक्स आणि दुसऱ्या डावात रुटची विकेट मिळाली. आम्ही ठरवले तसेच झाले. - रवींद्र जडेजा, सामनावीर.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या सामन्‍यातील काही खास बाबी
बातम्या आणखी आहेत...