आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Live Update India Vs England, 4th Test, Day 1 At Mumbai Wankhede Stadium

IND vs ENG: पहिल्या दिवसअखेर इंग्लंड 5 बाद 288 अशा स्थितीत, अश्विनचे 4 बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलामीवीर किटन जेनिंग्स आणि मोईन अलीला एकाच षटकात बाद केल्यानंतर अश्विन-विराटने असा आनंद व्यक्त केला. - Divya Marathi
सलामीवीर किटन जेनिंग्स आणि मोईन अलीला एकाच षटकात बाद केल्यानंतर अश्विन-विराटने असा आनंद व्यक्त केला.
मुंबई- २४ वर्षीय फलंदाज किटन जेनिंग्जने (११२) आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शानदार कामगिरी करताना शतक ठोकण्याचा पराक्रम केला. चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा ऑफस्पिनर आर. अश्विनच्या चेंडूवर हल्ला चढवताना त्याने शतक ठोकले. अखेरीस अश्विननेच त्याला बाद केले. अश्विनने चार गडी बाद केले. मात्र, दिवसअखेर इंग्लंडने ५ बाद २८८ धावा काढल्या. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी जोस बटलर १८ आणि बेन स्टोक्स २५ धावांवर खेळत होते.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बटलर आणि स्टोक्सपुढे इंग्लंडचा स्कोअर ४०० प्लस करण्याचे आव्हान असेल. यात इंग्लंड यशस्वी झाले तर पाहुणी टीम यजमान संघाला बॅकफूटवर ढकलू शकते. इंग्लंडने जेवणाच्या ब्रेकपर्यंत १ बाद ११७ धावा काढल्या होत्या. चहापानाच्या वेळेपर्यंत या स्कोअरमध्ये ७९ धावांची भर पडली. चहापानापर्यंत इंग्लंडने २ बाद १९६ धावा काढल्या होत्या. इंग्लंडने अखेरच्या सत्रात ९२ धावा काढल्या. अखेरच्या सत्रात इंग्लंडने २ विकेटसुद्धा गमावल्या.

किटन जेनिंग्ज चमकला
डावखुरा फलंदाज जेनिंग्जने २१९ चेंडूंचा सामना करताना ११२ धावा काढल्या. या खेळीत त्याने १३ चौकार मारले. त्याने कर्णधार अॅलेस्टर कुकसोबत (४६) पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची सलामी दिली. यानंतर जो. रुटसोबत (२१) दुसऱ्या विकेटसाठी ३७ धावा जोडल्या. नंतर मोईन अलीसोबत (५०) तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. जेनिंग्जने शानदार कामगिरी करताना पदार्पणात शतक ठोकले. जेनिंग्सने मैदानाच्या चारही बाजूने फटकेबाजी केली. त्याने जबाबदारीने फलंदाजी केल्याने इंग्लंडला अडीचशेचा टप्पा ओलांडता आला. जेनिंग्ज-मोईन अलीच्या भागीदारीने डाव सावरला.

आर. अश्विनच्या फिरकीची कमाल
इंग्लंडने एकवेळ २ बाद २३० धावा काढून मजबूत स्थिती गाठली होती. मात्र, ७१ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अश्विनने मोईन अलीला आणि चौथ्या चेंडूवर शतकवीर जेनिंग्जला बाद करून सामना फिरवला. अश्विनने यानंंतर ८१ व्या षटकात बेयरस्ट्रोला बाद करून त्याचीही विकेट घेतली. अश्विनने ७५ धावांत ४ गडी बाद केले.

भुवनेश्वरच्या थ्रोवर मैदानी पंच राफेल जखमी
४९ व्या षटकात इंग्लिश फलंदाज किटन जेनिंग्जने अश्विनच्या गोलंदाजीवर स्क्वेअरलेगवर उभे असलेले पंच राफेल यांच्या बाजूने चेंडूला मारले. भुवनेश्वरने चेंडू रोखल्यानंतर पुजाराच्या दिशेने चेंडू फेकला. चेंडू पंचांच्या मागच्या बाजूला लागला. यानंतर राफेल मैदानात कोसळले. राफेल मैदानात कोसळताच दुसरे पंच ब्रुस ओक्सेनफोर्ड त्यांच्याजवळ गेले आणि आपल्या कॅपने राफेलला सावली दिली. राफेल यांना नंतर रुग्णालयात नेण्यात आले.

आणखी काही विकेट हव्या होत्या : अश्विन
आणखी दोन किंवा एखादी विकेट मिळाली असती तर आम्ही अधिक समाधानी असतो, असे भारताचा आघाडीचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन याने इंग्लंडविरुद्ध भारत यांच्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.

७१ व्या षटकापर्यंत २ बाद २३० अशा सुस्थितीत असलेल्या इंग्लंडचे दिवसअखेर आणखी ५८ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाज टिपले हेही नसे थोडके. खेळपट्टीकडून चेंडूला अधिक ‘टर्न’ मिळत आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र, वेग हळूहळू कमी कमी होत जाईल असा अंदाज आहे. मालिकेत आतापर्यंत मिळालेल्या खेळपट्ट्यांमध्येही चेंडूला अधिक उसळी देणारी खेळपट्टी आहे. त्यामुळे चेंडू (झेल) खेळाडूंपर्यंत पोहोचत होते ही समाधानाची गोष्ट आहे, असे अश्विन म्हणाला.

क्षेत्ररक्षकांनी सोडलेले झेल याबाबत मी ५०-५० टक्के प्रमाण मानेन. काही झेल कठीण होते, तर काही ‘हाफ चान्सेस’ होते. त्यामुळे सर्वच झेल होते असे नाही. जेनिंग्जचा करुणने सोडलेला झेल कठीण होता, असेही अश्विनने नमूद केले.

तेव्हा ‘प्राण कंठाशी’...
कसोटी पदार्पणाचा दिवस तणावपूर्व होता. पहाटे जागे झालो तेव्हापासूनच दडपण होते. प्रत्यक्ष डावाला सुरुवात केली आणि धावांचे खाते उघडण्याआधीच झेल उडाला. त्या वेळी ‘प्राण कंठाशी’ आले होते. झेल सुटला आणि सुटकेचा श्वास सोडला, असे शतकवीर किटन जेनिंग्ज याने सांगितले.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, मुंबई कसोटीतील पहिल्या दिवसाची क्षणचित्रे...
बातम्या आणखी आहेत...